शेती-मातीतले मळभ दूर व्हावे आणि शेतीला सुगीचे दिवस यावेत. या उद्देशातून महेश गणेशराव बेदरे यांनी सुरू केलेला कृषीचा यज्ञ सोळा वर्षांपासून अखंड सुरू आहे. खर म्हणजे, स्व. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नांना पंख लावण्याचे धाडस त्यांनीच दाखविले. त्यांचा वारसा टिकवण्याची जबाबदारी नव्या पिढीने घेतली आहे. ही, खूप मोठी आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. महेश बेदरे यांनी जिद्दीने ,मेहनतीने, कोणताही मोठा राजकीय वारसा पाठिशी नसताना, काळ्या आईची ओटी भरली आहे. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगारांना
कृषी महोत्सवाने नवी पाऊलवाट दाखवून ,या बहाद्दर भूमिपुत्राने कष्टाने कोरून कृषी महोत्सवाला आकार आणला आहे. त्यांचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे.
17 व्या कृषी प्रदर्शन गेवराई जि.बीड येथे 3 जानेवारी 2024 रोजी सुरु होणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. शेतकऱ्यांनी नव्या तंत्र-मंत्राचा आधार घेऊन, शेतीला आधुनिक रूप द्यावे, या उद्देशातून कृषी महोत्सवाचा यज्ञ सुरू करण्यात आला होता. कृषी उत्सवाची सुरूवात जेष्ठ पत्रकार, संपादक स्व. गणेश [ नाना ] बेदरे यांनी केली होती. त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव महेश बेदरे नेटाने चालवून शेती-मातीत राबणाऱ्या शेतकरी बापाला उर्जा द्यायचे काम करून, बांधिलकी जोपासत आहेत. महेश बेदरे यांच्या मेहनतीला यश लाभले आहे.
गोरगरीब समाजातील शेतकर्यांच्या आयुष्यात कृषी प्रदर्शनाचा ज्ञानदीप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. टाळ्यांची तोरणं बांधलेल्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून साखर पेरणी करण्याचे काम महेश बेदरे यांनी केले आहे. ते शेतकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय झालेत.
गेवराई – बीड – संभाजीनगर [ औरंगाबाद ] – जालना – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहरातल्या भव्य दसरा मैदानावर या कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे. सलग पाच दिवस कृषी महोत्सवाची धुम पहायला, अनुभवायला मिळणार आहे.
शेतीला आधुनिक काळाशी जोडले जात आहे. सरकार, निम सरकारी संस्था, सहकार उद्योग समूह, सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. राज्यात बहुतांश शेती क्षेत्र कोरडवाहू आहे. नाविन्यपूर्ण, विकसित शेती तंत्रज्ञान ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकर्यापर्यंत गेले पाहिजे. सिंचन प्रकल्प उभे राहीले पाहिजेत. ओलिताखाली आलेली शेतजमीन, शेतकर्यांच्या आयुष्यात उजेड पाडणारी ठरेल. मागच्या दहा वीस वर्षातल्या नोंदी पाहता, राज्यभरात जवळपास 88.33 लाख कोरडवाहू शेतकरी आहेत. हे क्षेत्र ओलिताखाली आले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
सामाजिक – राजकीय चळवळीत सक्रिय काम करणाऱ्या महेश बेदरे, यांनी कृषी महोत्सवाचा हा वारसा सुरू ठेवला आहे. ज्येष्ठ नेते स्व. गणेश [ नाना ] बेदरे यांचे ते चिरंजीव आहेत. गणेश नानांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मराठवाड्यात नावलौकिक केला. अनेक पत्रकारांना त्यांनी घडविले, मार्गदर्शन केले. नव्वद च्या दशकात त्यांचे राजमुद्रा नावाचे साप्ताहिक, दैनिक अनेक वर्ष सुरू होते. स्वतःच्या मालकीचे छपाई यंत्र, साप्ताहिकाचे मालक-मुद्रक -संपादक म्हणून त्यांनी सक्रिय पत्रकारिता केली. राजकीय पटलावर कर्तृत्व गाजविले. त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय गेवराई [ जि.बीड ] चा राजकीय इतिहास पुढे जात नाही. नानांनी ,राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडली. ते गेवराई नगर परिषदचे स्वीकृत सदस्य होते. मराठवाड्यातले अनेक नामवंत पत्रकार त्यांच्या प्रेमात होते. त्यांनी सामाजिक चळवळीत हजारो माणसे जोडली. राजकारणाची उत्तम जाण असलेला ज्येष्ठ पत्रकार म्हणून नानांचा उल्लेख करता येईल. एक भूमिपुत्र म्हणून आपण काही तरी करावे, या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू असायचे. पत्रकारिता, राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक वारसा निर्माण केला. गेवराई तालुक्यातील [ जि.बीड ] शेतकऱ्यांनी शेतीच्या जोरावर, नवे तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचा उद्धार करावा. या विचारातून नानांनी कृषी महोत्सव सुरू केला. मराठवाड्याच्या सिंचनासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या स्व. शंकरराव चव्हाणांना आदरांजली अर्पण करून कृषी प्रदर्शनाचा श्रीगणेशा केला. दुर्दैवाने नाना अकाली गेले. शेतकऱ्यांचा कृषी मित्र अचानक गेल्याने पोकळी निर्माण झाली.
कृषी प्रदर्शन होणार की नाही. असा प्रश्न उभा राहीला. मात्र, त्यांचे चिरंजीव महेश बेदरे यांनी कृषी महोत्सवाचे शिव धनुष्य स्वतःच्या खांद्यावर घेतले. गेवराई च्या कृषी प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीचे नवे रूप समजावून घेता आले आहे. लहान- सहान गोष्टींची पारख करता आली. सेंद्रीय शेतीच्या संदर्भात कोणते आयुध वापरता येईल , कमी पैशात अधिक समृद्ध कसे होता येईल, पाण्याचा वापर कसा करता येऊ शकतो. ठिबक सिंचन प्रकल्प कसे उभे करायचे. शेत तळ्यांची गरजा का आणि किती ? महिलांचा शेती मध्ये असलेल्या सहभागाने, आधुनिक शेतीची सांगड घालून सधन होण्याच्या मार्गावर जाता येईल. हे , गेवराई च्या कृषी महोत्सवाने सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. शेतीला पूरक जोडधंदा उभा करता आला आहे.
सोळा वर्षात जेवढी कृषी प्रदर्शन झाली. त्या प्रत्येक वर्षात शेतीला चालनाच मिळाली आहे.
पशू प्रदर्शनाने गाय-गोठ्यासह जनावरांची, कुक्कुटपालनाची गरज अधोरेखित झाली.
शेती-मातीतले मळभ दूर व्हावे. शेतीला सुगीचे दिवस यावेत, या हेतूने महेश गणेशराव बेदरे यांनी सुरू केलेला कृषीचा यज्ञ अखंड सुरू राहीला पाहिजे. खर म्हणजे, स्व. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नांना पंख लावण्याचे धाडस दाखविले. त्यांचा वारसा टिकवण्याची जबाबदारी नव्या पिढीने घेतली आहे. ही, खूप मोठी गोष्ट आहे. काळ्या आईची ओटी भरणारा भूमिपुत्र मजबुतीने चालत राहील, यासाठी समस्त शेतकरी बापाचे त्यांना आभाळभर आशीर्वाद लाभोत, एवढीच एक सदिच्छा..! जय जवान, जय किसान..!
सुभाष सुतार, पत्रकार
बीड [ मराठवाडा ]