बीड :
गेवराई तालुक्यातील साठेवाडी येथे श्रीमद् महावाक्य निर्वचन ज्ञानयज्ञ सोहळा 1 जानेवारीपासून सुरु झाला आहे. 35 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात कविश्वर कुलभुषण आचार्यप्रवर विद्वतरत्न श्री दुतोंण्डे बाबाजी (कुरुंदा) यांच्या अमृत वाणीतून पोथी वाचण सुरु झाले असून प्रवचन, सत्संग आदी धार्मिक कार्यक्रम देखील पार पडत आहेत. दरम्यान या सोहळ्यासाठी देशभरातून आचार्यगण, संत-महंत तसेच तपस्विनी यांच्यासह दोन हजार सदभक्तांची उपस्थिती आहे. त्यामुळे याठिकाणी भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
श्री आत्मतिर्थ प्रभू व परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या कृपाप्रसादाने तसेच आचार्यगण, संत-महंत तथा तपस्विनी यांच्या शुभचिंतनाने श्रीमद् महावाक्य निर्वचन ज्ञानयज्ञ सोहळा हा गेवराई तालुक्यातील साठेवाडी याठिकाणी सुरु झाला आहे. आत्मतिर्थ कृपा व आचार्य श्री दिपकराज मामाजी गुर्जर (पांचाळेश्वर), पंडित बाबा बिडकर (पांचाळेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली महंत पुरुषोत्तम शास्त्री (कान्हेराज बाबा कारंजेकर, दिल्ली), महंत वाडेगावकर शास्त्री (पांचाळेश्वर), महंत राक्षसभुवनकर बाबा (पांचाळेश्वर), महंत ओंकारव्यास बाबा शास्त्री (पांचाळेश्वर), महंत धनंजय दादा बिडकर (पांचाळेश्वर), महंत राजहंस दादा बीडकर (गेवराई) यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. कविश्वर कुलभुषण आचार्यप्रवर विद्वतरत्न श्री दुतोंण्डे बाबाजी यांच्या अमृत वाणीतून रोज दुपारी 3 ते 4 यावेळेत पोथी सांगितली जात असून सांगता दि.4 फेब्रुवारी होणार आहे. श्रीमुर्तीस मंगलस्नान, गीतापाठ नारायण, कुलवंदन, आचार्य गणांची मिरवणूक तसेच स्वागत, ध्वजारोहण, दिपप्रज्वलन, आरती आदी कार्यक्रमाने या सोहळ्यास दि.1 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. तर दि.4 फेब्रुवारी रोजी ध्वजारोहण, संन्यास दिक्षाविधी, धर्मसभा, कुलवंदन, आचार्य गणांची मिरवणूक व दि.5 फेब्रुवारी रोजी श्रीमुर्तीस स्नान, गीतापाठ पारायण, ध्वजारोहण, दिपप्रज्वलन, स्वागत समारंभ, समारोपीय धर्मसभा, आभार, आरती झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी या सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून प्रवचन, सत्संग व संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ साठेवाडी व पांचाळेश्वर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अखंड अन्नदान
साठेवाडी येथे जवळपास सव्वा महिना श्रीमद् महावाक्य निर्वचन ज्ञानयज्ञ सोहळा सुरू झाला आहे. देशभरातून आलेल्या संत-महंत, आचार्यगण, तपस्विनी, भक्तांची उपस्थिती आहे. पन्नास एकरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये राहण्याची, पाण्याची, जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. याठिकाणी अखंड अन्नदान सुरु राहणार आहे. चहा, नाष्टा, दुपारी व संध्याकाळी जेवन उपस्थितांसाठी आहे. याठिकाणी साठेवाडी ग्रामस्थ, स्वयंसेवकांना दिलेली जबाबदारी शिस्तबद्ध पध्दतीने पार पाडत आहेत.