गेवराई – बीड :
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) नगर परिषद गेवराई व इमाम अहमद रझा एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने बिलाल उर्दू प्राथमिक शाळा, संजय नगर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष संवाद सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या स्तुतीने झाली. शाळेचे शिक्षक रगीबुररहमान इनामदार यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका सौ. गीता बाळराजे पवार (भाभी) यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, महिलांच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. तसेच महिलांना व शाळेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राघव अ. वाव्हळे, समुदाय संघटक दिनेश औटे, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा तय्यब नगरचे मुख्याध्यापक मुमताज हाश्मी, आणि आदर्श शिक्षक व प्रसिद्ध उर्दू साहित्यिक सैय्यद मुज्तबा नज्म उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आणि महिलांच्या शिक्षणावरील महत्त्वावर विचार मांडले.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी राघव वाव्हळे यांनी “महिला बचत गट” तसेच नगर परिषदेतर्फे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सह.शिक्षक रगीबुररहमान इनामदार यांनी केले, इमाम अहमद रझा एज्युकेशन सोसायटीचे सचिव काझी शमीमोद्दीन यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. काझी फरहा यास्मीन, शिक्षिका सौ. काझी एस.एस, शिक्षिका शेख मेराज युनुस आणि इतरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या संवाद सभेला विद्यार्थी, माता-पालक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आदरांजली वाहत, महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि समस्यांवर उपाय शोधण्याचा दृढ निर्धार येथे व्यक्त करण्यात आला.