सुजय विखेंना नेमके झालय काय, ते असे का वागताहेत ? असा प्रश्न अनेकांना पडलाय. कावळ्याच्या आधी येतो. माझ्या सारखे इंग्लिश बोलून दाखव ,आणि आता ; साई बाबांचे मोफत जेवण [ प्रसादालय ] बंद करा, नसता आंदोलन करतो. असे वादग्रस्त वक्तव्य माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे.
त्यांच्या वक्तव्यावरून जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. विखे यांनी नव्या वादाला तोंड फुटले आहे.
खर म्हणजे, काही जणांना शेखी मिरवायची असते. सवंग प्रसिद्धी मिळवायची असते. काहींना सवयच असते, ती सहजासहजी जात नाही. काहींना , उशिरा का होईना कळते, काहींना कळत नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, जीवन प्रवाह सहज वाहू द्यावा, उगीचच अनाठायी प्रतिक्रिया देऊ नये. सुजय विखे पाटील हे महाराष्ट्राचे उच्चविद्याविभूषित नेते, सहकार महर्षी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत.

लोकसभेत लोकांनी [ मतदार राजा ] विखेंना नाकारले आणि सर्व सामान्य कार्यकर्ता लंके यांना पसंती दिली. निलेश लंके खासदार झाले. तेव्हापासून, सुजय दादा नगर जिल्ह्यातील जनतेवर नाराज आहेत. पराभूत झाल्यावर, काही दिवसातच त्यांच्या पोटातले ओठांवर आले. लोक म्हणतात, सुजय विखे सुखदुःखात जात नाही – येत नाही. आता, या पुढे, सुखदुःखात कावळ्याची आधी येत जाईन. पराभवाने खचलेल्या, पराभव पचनी न पडलेल्या विखेंचा राग, एकदाचा बाहेर आलाच होता. सुंभ जळाला, तरी पीळ कायम असतो. अशा अर्थाची एक म्हण आहे. पैसा, सत्ता विखेच्या घरी पाणी भरते. एका परभावाने सत्तेचा उतरतोच, असे नाही. सत्तांध नेते बेभान होऊन बेताल बोलत राहतात. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पून्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादळ निर्माण केले आहे. विखे यांनी एका कार्यक्रमात बोलताना, साई संस्थान च्या मोफत प्रसादालया संदर्भात भाष्य केले आहे. मोफत जेवण बंद करा, नसता मला आंदोलन करावे लागेल. संस्थान च्या अशा फालतू उपक्रमाने भिकारी लोकांची संख्या वाढली आहे. गरीब कोणी राहीले नाही. जगभरातील भिकारी शिर्डीत येऊन जेवतात. जेवण २५ रू ला करा. जगातून लोक शिर्डीला येतात. मोफत जेवणाने भिकारी वाढू लागलेत, असा जावईशोध त्यांनी लावला. त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली जात असून, अनेक राजकीय नेत्यांनी सुजय विखेंचा समाचार घेतला आहे. भक्तांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुजय विखे यांच्या मनात नगर – शिर्डी मतदारसंघातील जनते विषयी राग आहे. या शिवाय, लोकसभा निवडणुकीत शिर्डी संस्थान कडून त्यांना काही प्रसाद हवा होता का ? तशी अपेक्षा होती का आणि तो मिळाला नाही म्हणून ते संस्थान वर नाराज आहेत का ? हे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.

एक तर, साई बांबाच्या नावाने आलेल्या भक्तांना मोफत दोन घास मिळतात म्हणून, या प्रसादालयात हजारो कोटीची संपत्ती असलेला, नसलेला, गरीब, श्रीमंत भक्त, मोठ्या भक्ती भावाने येतो आणि दोन घास खाऊन समाधानी होतो. साई बाबा, भक्ती-शक्ती चे आदर्श आहेत. साई बाबा जाती-धर्माच्या पलीकडचे तीर्थक्षेत्र आहे. हरएक भक्त जगभरातून येथे मोठ्या भक्ती भावाने येतो. संस्थाना कडून मोफत जेवण दिले जाते. केवळ २ रूपये घेऊन चवदार, क्वालिटी असलेला चहा येथे दिला जातो. माफक, मोफत राहण्याची सोय केली जाते. विविध सामाजिक संस्था साईच्या चरणस्पर्श करायला आलेल्या भक्तांसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन, सेवा भाव जपतात. एखाद्या देवस्थानात मोफत जेवण मिळते म्हणून कोणी ही भिकारी कसा होईल ? विखेंच्या विचारात दिवाळखोरपणा दिसतो किंवा जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर त्यांनी हे वक्तव्य केले असावे. सबका मालिक एक, अशी हाक देऊन ; भुकेल्या माणसाला दोन घास भरवणारे सच्चिदानंद म्हणजेच साई बाबा..! बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. या विचारावर गाढ श्रद्धा असणारे भक्तगण जगभरात आहेत. नित्य नियमाने त्यांची वारी शिर्डीच्या दिशेने वाटचाल करीत राहते. त्यात खंड पडत नाही. साईंचा महिमा अगाध आहे. शिर्डी पावनभूमीत सुजय विखेंना श्रद्धा, सबुरीने वागता आले नाही. त्यांचा पराभव त्यांनी साई चरणांवर ठेवायला हरकत नव्हती. मात्र, ते त्यांना जमले नाही. निलेश लंके खासदार झाले. माझ्या सारखे इंग्लिश मधून बोल बरं..! असे आव्हान विखेंनी देऊन स्वतःची अक्कल गहाण ठेवली होती. माय मराठीचे आपण लेकरे, इंग्लिश जगाला जोडणारी भाषा आहे. ती अनेकांना येते, आलीच पाहिजे. पण, ती भाषा येते म्हणून मर्दुमकी कशाला ? तिथे ही विखे चुकले. विखे यांचे घराणे उच्चभ्रू राहणीमान असलेले आहे. घरात मोठा राजकीय वारसा आहे. प्रचंड संपत्ती आहे. स्थावर जंगम मालमत्ता आहे. ते अब्जाधीश आहेत. शैक्षणिक, सहकार संस्थेचे जाळे आहे. मेडिकल कॉलेज आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असेल तर, किमान कोटीच्या वर पैका – अडका लागतो. या सगळ्या संस्थानचे अनभिषिक्त सम्राट सुजय विखे पाटील आहेत. सुजय विखें यांचे वडिल महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत. सुसंस्कृत नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. वडलांचा वारसा डॉ. सुजय यांना पुढे सक्षमपणे चालवायचा आहे. मात्र, हा वारसा पुढे टिकेल की नाही ? हा खरा सवाल आहे. ना. विखेंना पुत्राचा स्टॅन्ड आवडला नाही. मात्र, पुत्र आपल्या विचारावर ठाम आहे. अहंकाराने वेढलेली माणसे, स्वतःची चुक कधीच मान्य करीत नाही. हा इतिहास आहे. कबीरजी म्हणालेत, ऐशी वाणी बोल कोई न बोले झुठ,ऐशी जगह बैठ की कोई न बोले उठ..!
सुभाष सुतार, पत्रकार
बीड