चांगली माणसे आयुष्यभर लक्षात राहतात. त्यांचा चांगुलपणा नेहमीच आठवणीच्या हिंदोळ्यावर रुंजी घालतो. स्व. निलेश करांडे यांना जाऊन 22 वर्ष झाली. ते माझे जवळचे जिवलग मित्र होते. सुभाष म्हणून मला हाक मारायचे. आम्ही समवयस्क होतो. एकमेकांना अरे – तुरे करायचो. सोबत क्रिकेट खेळायचो. ही मैत्री वाढत गेली. पुढे ते नगरसेवक झाले. मी, पत्रकारितेत आलो. त्यामुळे, मैत्री वाढली. योगायोग म्हणजे निलेश नगरसेवक व्हायच्या आधी त्यांचे वडील आणि माझे वडील नगरसेवक होते. वडलांचा वारसा निलेश यांनी चालवला. तरूण वयात नगरसेवक होण्याची संधी मिळाली. निलेश म्हणजे अगदी,
युवकांच्या गळ्यातील ताईत. गेवराई [ जि.बीड ] शहरातील विविध भागात त्यांचा चाहता वर्ग होता. मैत्रीच्या मैफिलीत रमणारा दिलदार, जीवाभावाचा मित्र म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. नगर परिषदेचा सर्वात लहान वयाचा उपनगराध्यक्ष होण्याचा मान ही निलेश यांना मिळाला. हसतमुख,नंम्र आणि तेवढाच डॅशिंग स्वभाव असलेला युवा व्यक्तिमत्त्वाचा नेता ,अशी ओळख होऊ लागली होती. ते, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या अतिशय जवळचे होते. खर म्हणजे, निलेश करांडे सर्व समावेशक व्यासपीठावर कार्यरत राहणारे होते. पक्ष विरहित काम करायला त्यांना मनापासून आवडायचे. त्यांचा सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग पाहिला की, वाटायचे , हा युवा नेता लंबी रेस का घोडा आहे. त्यांना राजबिंडे व्यक्तिमत्व लाभले होते. कोण, कोणत्या गटाचा, या पेक्षा गरजूंची गरज लक्षात घेऊन मदत करण्यासाठी त्यांनी केलेली धावपळ आज ही आठवते. खाजा भाई [ मा.उपनगराध्यक्ष ] आणि निलेश करांडे यांची जानी दोस्ती होती. त्या जोडीचा हेवा वाटायचा. दोघे राजकीय पटलावर कर्तृत्वाने मोठे झाले. मात्र, निलेश अकाली गेले. मी पाश्र्वभूमी दैनिकात उप संपादक होतो. निलेश यांच्या मृत्युने एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते गेल्यावर दैनिक पाश्र्वभूमी मध्ये मृत्युलेखपर ब्लॉग लिहिण्याचा कठीण प्रसंग माझ्यावर आला होता. मी, जड अंतःकरणाने पानभर लेख लिहिला होता. आज ही तो लेख जपून ठेवलाय. लेखाचा मथळा होता. निलेश च्या मृत्युचा चटका..! 2025 –
जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात निलेश यांची आठवण आली. माझे सहकारी मित्र , पत्रकार भागवत जाधव [ सरपंच, बेलगुडवाडी ] , ज्येष्ठ विचारवंत बाबा घोडके आणि मी, एकत्र बसलो असताना त्यांचा विषय निघाला. मी म्हणालो, घरी कागदपत्रांची शोधाशोध करीत असताना, निलेश यांच्यावर लिहिलेला लेख सापडला. निलेश यांचा विषय निघताच, बाबा घोडके यांनी क्षणाचाही विलंब न लावता, 10 जानेवारी 2002 चा उल्लेख केला. अंगावर रोमांच उभे राहीले. बाबा, खरच तुम्ही ग्रेट आहात. बावीस वर्षा पूर्वीची तारीख, वार आणि साल तुम्ही सांगितलेत. भागवत जाधव यांनी ही बाबांचे कौतुक करून, निलेश यांच्या आठवणींना उजाळा दिला. निलेश करांडे तरूण वयात निघून गेले. बावीस वर्ष झाली. मात्र, अजून ही ते, त्यांच्या कर्तृत्वाने जिवंत आहेत. ते, गोरगरीब समाजातील समवयस्क मित्रांच्या गोतावळ्यात राहीले. त्यांना मदत केली. मला आजही आठवते, क्रिकेट खेळताना एका मित्राला खेळताना लागले. आम्ही त्या मित्राला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात जायच्या आधी, निलेश यांनी दहा-दहा रूपयाच्या नोटाचे बंडल माझ्या हाती दिले होते. तो आमचा मित्र आजही आहे. निलेश यांची आठवण आली की, तो निशब्द होतो. निलेश यांच्या अकाली एक्झिट ने अनेकांना वेदना झाली. त्या दिवशी शहरात सन्नाटा होता. जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला.निलेश यांनी
सत्ता-संपत्तीचा कधी रूबाब गाजवला नाही की, संपत्तीची कधी धुंदी दाखवली नाही. निगर्वी दिलदार मित्र म्हणून निलेश करांडे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांचा चांगुलपणा अनेक मित्रांना चटका लावून गेला आहे.
हिंदी चित्रपटात एक संवाद आहे. उम्र लंबी नही, बडी होनी चाहिए..! निलेश तुम्ही कायम आठवणीत राहणार आहात. भावपूर्ण श्रद्धांजली..!
सुभाष सुतार, पत्रकार
बीड