शब्दांचे शस्त्र करण्याची ताकद त्यांच्या बातमीत असते. हे,अनेकदा दिसले आहे. जीव ओतून बातमीला आकार देता देता, पस्तीस वर्ष अशी निघून गेली. मागे वळून पाहताना त्यांना ही त्याचे नवल वाटते. मुद्रित माध्यमा पासून ते आताच्या रंगसंगतीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी मिळते – जुळते घेत, इथपर्यंत आलेल्या त्यांच्या प्रवासाचे खरच कौतुक करावे लागेल. या पस्तीस वर्षाच्या कालखंडात अनेक चढउतार आहेत. खाचखळगे आहेत. खर म्हणजे, थोडे डावे – उजवे दुर्लक्षित करून, ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांनी सकल समाजाचे हित लक्षात घेऊन पत्रकारिता केली आहे. हे कटू सत्य कोणी ही नाकारणार नाही. त्यांनी नेहमीच वंचित, उपेक्षित घटकाला उर्जा देत पत्रकारितेचा धर्म सांभाळून काम केलय. ते, एका अर्थाने क्रांतीकारी पत्रकार आहेत. असे म्हटले तर , त्यांच्या बातमीला अधिक न्याय देणारे ठरेल. त्यांना नुकताच उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार, आमचे मार्गदर्शक, परखड विचार मांडणारे सहकारी मित्र काझी अमान यांच्या पस्तीस वर्षाच्या पत्रकारितेला सलाम करून, त्यांनी केलेल्या बातमीदारीचा आढावा घेतला आहे. ज्यांच्या विषयी भरभरून लिहावे, बोलावे अशी अनेक माणसे आपल्या अवतीभोवती असतात. न कळत, राहून जाते किंवा योग्य वेळ आली की, बरोबर घडते. यालाच दैव योग म्हणायचा. ज्येष्ठ पत्रकार म्हणून अमानजी यांच्या आयुष्यात जागा मिळाली. त्यांचा सहवास, मार्गदर्शन, चार हिताच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. ते मनाने अतिशय निरभ्र आहेत. अगदी, मोठ्या भावा सारखेच आहेत. ज्यांच्या पायावर पडावे, ते धरावेत, आशीर्वाद मागावा आणि त्यांनी तो मनातून द्यावा. या धाटणीतला त्यांचा स्वभाव आहे. 1983 साली, ते अगदी तरूण वयात पत्रकारितेत आले. त्यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला यांचा वारसा पुढे चालवायचा त्यांनी निर्णय घेतला. खर तर, त्यांना शिक्षक होण्याची संधी होती. मात्र, बातमीच्या माध्यमातून उपेक्षित समाजाचा शिक्षक व्हायचा निर्णय घेतला. दैनिक झुंजार नेता सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रात त्यांना संधी मिळाली. त्या संधीचे सोने झाले. मराठी – उर्दू वृत्तपत्रात त्यांचा वावर राहीला आहे.
35 वर्षांपासून ते प्रिंट मिडियाशी [ मुद्रित माध्यम ] संबंधित आहेत. त्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा फारसा परिणाम नव्हता. वार्ताहरांची संख्या फार कमी होती. त्यामुळे, वृत्तपत्रांचे वेगळे वलय होते. लिहणारे वार्ताहर – पत्रकार समाजाच्या नजरेत भरायचे. या अर्थाने, काझी अमान यांच्या लेखणीतून
गेवराई जि.बीड परिसरातले असंख्य विषय झुंजार नेताच्या पानावर आले. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बातम्या , विशेष वृत्त , नामंवतांच्या मुलाखतीने त्यांना सर्वदूर ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे , त्यांनी मनातून घातलेला “सप्रेम आदाब..! त्यांच्या खास शैलीतल्या सप्रेम आदाब च्या प्रेमाने वाचकांना ही भूरळ घातली आहे. पत्रकारितेच्या इतिहासाचा मागोवा घेताना, काझी अमान व स्व. संतोष भोसले यांच्या पत्रकारितेचा उल्लेख करावाच लागेल. राम- रहिम ची जोडी म्हणून, त्यांची ओळख झाली. पत्रकारितेतली ही जोडगोळी, स्व . गोपीनाथराव मुंडे यांच्या ही थेट संपर्कात असायची. स्वतः मुंडे साहेब दोघांनाही नावाने ओळखायचे. भोसले दै. सामनाचे पत्रकार तर काझी अमान दै. झुंजार नेताचे वार्ताहर म्हणून काम करायचे. काझी – भोसले यांच्या पत्रकारितेचा अनेकांना हेवा वाटायचा. ते जानी दोस्त होते. दोघांत तिसरा क्रमांक माझा राहीला. हे भाग्य मला लाभले. स्व. संतोष भोसले यांच्या कडून वाचनाचे महत्त्व अधोरेखित होत गेले. तसे , अमानजी यांच्या बातमीला जवळून पाहता आले. बातमीला दिलेले मथळे, उप मथळे, कोणत्या शब्दात र्हस्व – दीर्घ असले पाहिजे. या दृष्टिकोनातून सहवास लाभत गेला. त्यांच्या बातमीत इंग्रजी शब्द कधी आला नाही. इंग्रजी शब्द कटाक्षाने टाळण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केलाय. ही कृती म्हणजे,ज्येष्ठ-श्रेष्ठ कवी सुरेश भट यांची आठवण करून देणारी आहे. ते लिहितात, साय मी खातो, मराठीच्या दुधाची मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? अशा संदर्भाने, बातमी लिहून काढताना त्यांनी मराठीवर प्रेम व्यक्त केलय.
काझी अमान हे परिवर्तनवादी विचार सरणीचे पत्रकार आहेत. त्यांचे राजकीय चळवळीतले योगदान नोंद घेणारे राहीले आहे. परिवर्तनवादी प्रवासाचे ते सोबती राहीलेत. फळाची अपेक्षा न करता, बांधिलकी म्हणून काम करायचे, उर फुटेपर्यंत मागे हटायचे नाही. हा, त्यांचा स्वभाव राहीलाय. एखाद्या विषयावर ते मनातून व्यक्त होतात. मोलाची साथ देत राहतात.
गेवराई मतदारसंघात सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक व्यासपीठावरचा
एकुण – एक कार्यकर्ता त्यांना नावानिशी ओळखतो.
समर्थ रामदास स्वामींनी अखंड सावधपणाचा उपदेश केलाय. बातमीच्या संदर्भाने, सावधपण हा त्यांचा गुण म्हणता येईल.
निवांत बातमी लिहणे, चुका टाळणे, याकडे तारतम्य ठेवून लक्ष देत आलेत. अमान यांचा जनसंपर्क दांडगा राहीला आहे. कोणत्याही क्षेत्रातला माणुस भेटला की, त्यांचा काॅन्टॅक नंबर, पत्ता विचारण्याची एक चांगली सवय त्यांनी लावून घेतलेली आहे. या भल्या माणसाने फार अपेक्षा न ठेवता पत्रकारिता केली आहे. समाजातल्या तळागळातल्या घटकाला सजग केले. सुखा- दुखाचे ओझे वाहण्यासाठी लेखणीचा चपखलपणे वापर करून बांधिलकी जोपासली आहे. वैखरीच्या वाटेवरचा वाटसरू म्हणून ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांचा 35 वर्षाचा अनुभव, आजवरचा प्रवास थक्क करणारा आहेच. त्या पेक्षा , तो नव्या पिढीला खरोखर उर्जा देणारा आहे. त्यांनी कधी ही भिती बाळगली नाही. अनेक घटने मागील सत्य बाहेर काढले. शहरातील गुन्हेगारी विरूद्ध बातमीच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ चित्र मांडले. तत्कालीन अधिकाऱ्यांना जाब विचारून, कायद्याचा पट्टा कधी चालवणार ? असा लक्षवेधी सवाल केला. कुणालाच सोडले नाही. अनेकदा जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. समाजाच्या आड येणाऱ्यांना त्यांनी बातमीच्या फटक्याने आडवे पाडले. तर, कधी पुढारलेल्या तथाकथितांना अंतर्मुख करायला भाग पाडले. उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी पाजणार्या एका साध्या रिक्षाचालकाची ठळक पणाने दखल घेतली. श्रीमंत व्यापाऱ्याच्या नाटावर टिच्चून, सायकल रिक्षा वाला भागवतोय तहान..! अशी बातमी करून, डोळ्यात अंजन घालण्याचे काम ही त्यांनी केले. पंडिताची राजधानी दैठण [ गेवराई- बीड ] मध्ये विकास कधी दिसणार आहे की नाही ? असा ठेवणीतला खडा सवाल विचारला. या बातमीची स्वतः माजी राज्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव [ दादा ] पंडित यांनी दखल घेतली. दैठण ग्राम पंचायतीच्या कारभारात सुधारणा करण्याची ताकीद देऊन, वास्तव बातमी छापल्याबद्दल काझी अमान यांचे कौतुक ही केले. त्यांनी लिहिलेल्या बातम्या आणि बातमीचे मथळे गाजले. बोटावर मोजून बातमीला मथळा देण्याची खूबी त्यांनी आत्मसात केली आहे. डोक्यावर टोपी, पायजमा, गळ्यात मफलर, स्वेटर घालून, दोन पायच्या गाडीने प्रवास असायचा. त्यांना दुचाकी चालवता येत नव्हती. काळ बदलला, तसा त्यांनी ही नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात केले. त्यांचे
किंचित टोपी वर करून, बोलण्याची लकब, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसते. मुद्रित माध्यमांची सवय झाल्याने, सोशल नेटवर्किंग चा रंगमंच नको, या दृष्टिकोनातून त्यांनी अलिप्त राहायचा निर्णय घेतला होता. नव्या पिढीतील हितचिंतक मित्रांनी आग्रह केला. खर म्हणजे, सोशल मिडिया च्या बाबतीत ते निरक्षर होते. मात्र, सरावाने त्यांनी त्यावर मात करून स्वतःला सिद्ध केले. पत्रकारितेत त्यांचा, एका अर्थाने पूर्वजन्मच झाला.
“श्रीमंतांच्या नाकावर टिचून सायकल रिक्षावाला भागवतोय तहानलेल्यांची तहान” या विशेष वृत्तासाठी काझी अमान यांना दै. झुंजार नेता चा उत्कृष्ट वार्ता प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. कामाचे कौतुक झाल्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, मी खूप समाधानी आहे. होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील सर्व घटकांनी माझ्या पत्रकारितेला आशीर्वाद दिलेत. त्यांचे ऋणानुबंध कायम आठवणीत राहतील. अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
मला, ईश्वर – अल्लाहच्या कृपेने आणि आदरणीय वडिलांच्या पुण्याईने दैनिक झुंजार नेता आणि दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आदरणीय मोतीरामजी वरपेंच्या मार्गदर्शनाखाली मी झुंजार नेता चे काम सुरू केले होते.आता, संतोषजी मानूरकर यांच्या सूचनेनुसार गेल्या तीन वर्षांपासून दिव्य लोकप्रभाचा उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास माझ्या कामाची पावती आहे. पाठीवर हात ठेवून काम करण्यासाठी ज्यांनी- ज्यांनी प्रोत्साहन दिले, त्या सर्व घटकांचा कायम ॠणी राहील. अशी भावना ही ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांनी व्यक्त केली. 35 वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. खर म्हणजे, पुरस्कार उर्जा देत राहतो. एक वेगळे समाधान मिळते. अमानजी, आम्हाला तुमचा अभिमान आहे. आभाळभर शुभेच्छा. श्रेष्ठ कविवर्य विंदा करंदीकर यांनी लिहिलय, असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..!
सुभाष सुतार, पत्रकार
बीड