शिक्षण वाघीणे दुध आहे. जो, ते प्राशन करीन, तो गुरगरल्या शिवाय राहणार नाही. असा ज्वलंत विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. या अर्थाने, सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे तोरण बांधणारे आहे. विद्यार्थ्यांना केन्द्र बिंदू मानून, विद्यार्थी अधिक ज्ञानवंत व्हावा, हा नवा शैक्षणिक दृष्टिकोन नव्या शैक्षणिक धोरणाच्या आकृतीबंधात दिसतो. गेवराई [ बीड ] चे विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉ. मेघारे यांनी नव्या आकृतीबंधा संदर्भात सुदंर मांडणी करून सरकारच्या धोरणाचा उहापोह केला आहे. सदरील लेख विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या ज्ञानकक्षा वाढविणारा आहे. – सुभाष सुतार, लोकसंवाद
1986 च्या शैक्षणिक धोरणा नुसार 10 + 2 अशी संरचना होती. यंदा 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणाची संरचना कशी असेल, हे जाणून घेणे उत्सुकतेचा विषय आहे.
1986 च्या शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण सहा वर्षे पूर्ण झाल्यापासून सुरू होत होते. ते पुढे उच्च प्राथमिक आणि माध्यमिक पर्यंत वयाच्या सोळाव्या वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. उच्च माध्यमिक शिक्षणाची दोन वर्ष, म्हणजे अकरावी बारावी पूर्ण होईपर्यंत मूल 18 वर्षाचे होईल. म्हणून ही संरचना 10 +2 अशी होती. नव्या शैक्षणिक धोरणाने ही संरचना बदलताना 6 ते 18 वयोगटा ऐवजी 3 ते 18 या वयोगटाला महत्त्व दिले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टिकोनातून
5 + 3 +3 + 4 अशी शालेय शिक्षणाची संरचना ठरवली आहे.
यामध्ये मूल तीन वर्षे पूर्ण झाले की पूर्व प्राथमिक शाळेत दाखल करून घ्यायचे निर्देश आहेत. वय वर्षे 3 ते 4 म्हणजे अंगणवाडी , 4 ते 5 म्हणजे पूर्व प्राथमिक आणि 5 ते 6 म्हणजे बालवाडी. वय वर्ष 6 ते 7 म्हणजे पहिली तर वय वर्ष 7 ते 8 म्हणजे दुसरी, असा हा पाच वर्षाचा पहिला टप्पा राहणार आहे.
दुसरा टप्पा, वर्ग तीन चार व पाचवीचा म्हणजे, तीन वर्षाचा राहणार आहे. तिसरा टप्पा हा पूर्व माध्यमिक स्तराचा म्हणजे इयत्ता सहावी सातवी व आठवीचा राहणार आहे. सदरील टप्पा देखील तीन वर्षाचा राहणार आहे. शालेय शिक्षणाचा चौथा टप्पा हा इयत्ता नववी दहावी अकरावी बारावीचा म्हणजे चार वर्षाचा राहणार आहे. हा शालेय शिक्षणाचा 5+ 3 + 3 + 4 ची सौरचना असणारा आकृतीबंध विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण 3 ते 18 म्हणजे तब्बल 15 वर्षाचा राहणार आहे. पूर्वीपेक्षा तीन वर्ष वाढलीत. बालकाच्या आयुष्यातील जन्मानंतर ची तीन वर्ष ते सहा वर्ष हा अत्यंत मौलिक काळ असून त्याच्या इसीसीई [ अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन ] चा पाया समाविष्ट केला आहे. हा पाया भक्कम असेल तर त्याची पुढील सर्व शालेय शिक्षण उत्तमपणे घडून येते. पहिल्या तीन वर्षांबाबत शिक्षण तज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञांच्या मध्ये लहान मुलाच्या मेंदूचा एकूण विकासापैकी 85% विकास हा वयाच्या सहा वर्षापर्यंत होतो. जुन्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे हे मूल 6 वर्ष शाळेबाहेर राहणे अयोग्य आहे. म्हणून , त्यातील किमान तीन वर्ष तरी शिक्षणाने वापरली पाहिजेत. या तीन वर्षात मुलांच्या मेंदूचा निकोप विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी या काळात मेंदूची योग्य काळजी घेतली जावी. या मेंदूला योग्य ती चालना व उत्तेजन मिळवून द्यावे. आपल्या देशात आज घडीला करोडो मुला-मुलींना खास करून सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या मुलांना दर्जेदार ECCE चे शिक्षण उपलब्ध नाही. ते उपलब्ध करून दिले तर ही मुले आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेत सहभाग घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यास सक्षम बनतील. म्हणून वय वर्ष तीन ते सहा या ईसीसीई च्या टप्प्यासाठी भरीव गुंतवणूक करण्यात आली तर सन 2030 च्या आत प्रत्येक प्राथमिक शाळेला हे तीन वर्ग जोडण्यात येतील. या तीन वर्गातील E C C E चा कृति कार्यक्रम मुळे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करणारे सर्व विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी सज्ज होतील . या ECCE मध्ये प्राधान्याने लवचिकता, बहुपैलू ,बहुस्तरीय खेळावर आधारित कृतीवर आधारित व जिज्ञासे वर आधारित शिक्षणाचा समावेश असणार आहे.
या अभ्यासक्रमात अक्षरे , भाषा ,संख्या , गणन ‘ रंग ,आकार , घरातील आणि मैदानी खेळ , कोडी आणि तार्किक विचार ,समस्या सोडवणे ,चित्रकला, रंगकाम, इतर दृश्यकला , हस्तकला . नाटक ,बोलक्या बाहुल्या , संगीत व हालचाली यांचा समावेश होतो. त्यामुळे, बालकांच्या सामाजिक क्षमता , संवेदनशीलता, चांगली वर्तणूक , सौजन्य, नैतिकता , वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता , सांघिक कार्य आणि सहकार्य यांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मुला मुलींचा शारीरिक विकास , कृती कौशल्याचा विकास ,आकलन विकास, सामाजिक भावनिक व नैतिक विकास , सांस्कृतिक विकास , संवाद व प्रारंभिक भाषा ,साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा विकास करणे आहे. एनसीईआरटीने पहिल्या पाच वर्षाच्या टप्प्यासाठी म्हणजे तीन ते आठ अर्थात अंगणवाडी ते दुसरी च्या मुला मुलींसाठी दोन उप आराखडे बनवले आहेत. पहिला उपआराखडा शून्य ते तीन वर्ष वयोगटासाठी तर दुसरा उप आराखडा तीन ते आठ वर्षे वयोगटासाठी असेल. पहिल्या वय वर्ष सहाच्या अगोदर प्रत्येक बालक ईसीसीई मध्ये दाखल झालेलेच असेल. ई सी सी चा अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांचे विशेष प्रशिक्षण दिलेले कर्मचारी तथा शिक्षक भरती करण्यावर देखील कटाक्ष असणार आहे. इ सी सी इ च्या सार्वत्रिक उपलब्धतेसाठी अंगणवाडी केंद्राचे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा ,खेळाचे साहित्य , प्रशिक्षित अंगणवाडी शिक्षक यांच्याद्वारे सशक्तीकरण केले जाईल. प्रत्येक अंगणवाडीची इमारत हवेशीर ,सुसज्ज ,मुलांसाठी अनुकूल योग्य बांधकाम असलेली आणि समृद्ध अध्ययन वातावरण असलेली असेल. अंगणवाडी केंद्रातील मुले क्रियाशीलता समाविष्ट असलेले दौरे करतील. अंगणवाडी केंद्र ते प्राथमिक शाळा हे संक्रमण सुरळीत व्हावे यासाठी त्यांच्या स्थानिक प्राथमिक शाळातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेटतील. शाळा समूहामध्ये अंगणवाडीचे पूर्णपणे एकात्मिक करण केले जाईल . आणि अंगणवाडीतील मुले ,पालक व शिक्षकांना शाळेच्या किंवा शाळा संकुलाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल . आणि त्याच प्रमाणे शाळा संकुल ही अंगणवाडी कडे जातील. वय वर्ष पाचच्या अगोदर प्रत्येक मूल पूर्व अध्ययन वर्ग म्हणजे प्रीपरेटरी वर्ग किंवा बालवाडी येथे जाईल. ज्यात ईसीसीई अहर्ता प्राप्त शिक्षक असेल. पूर्वाध्ययन वर्गातील शिकणे हे प्रामुख्याने खेळावर आधारित असेल. ज्यामध्ये आकलनात्मक ,भावनात्मक आणि सायकोमोटर क्षमता आणि पूर्व साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल . प्राथमिक शाळांमधील पूर्वा अध्ययन वर्गांना मध्यान्ह भोजन कार्यक्रम देखील लागू केला जाईल. अंगणवाडी व्यवस्थेत उपलब्ध असणारी आरोग्य तपासणी व वाढ यांची देखरेख अंगणवाडी व प्राथमिक शाळा मधील पूर्वाध्ययन वर्गाच्या विद्यार्थ्यां नाही उपलब्ध केली जाईल. आदिवासी बहुल भागातील आश्रम शाळांमध्ये आणि टप्प्याटप्प्याने पर्यायी शिक्षणाच्या सर्व स्वरूपामध्ये देखील ECCE ची सुरुवात केली जाईल . आश्रम शाळेमध्ये आणि पर्यायी शिक्षण व्यवस्थेमध्ये ECCE चे एकात्मिकरण आणि अंमलबजावणी प्रक्रिया वर तपशीलवार नमूद केल्याप्रमाणेच असेल. पूर्व प्राथमिक शाळेतून प्राथमिक शाळेत अभ्यासक्रमाचे सातत्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षणाच्या मूलभूत पैलू कडे योग्य लक्ष दिले जाईल. हे सुनिश्चित करण्यासाठी ECCE चा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक जबाबदारी MHRD कडे असेल व अंमलबजावणी मानव संसाधन विकास , महिला व बालविकास, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी व्यवहार या मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे केली जाईल. प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षणाचे शालेय शिक्षणात सुरळीतपणे एकात्मिकरण करण्यात मार्गदर्शन करण्यासाठी विशेष संयुक्त कृती गटाची स्थापना केली जाणार आहे. असा हा, नवीन शैक्षणिक आकृतीबंध समाज, शाळा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे.
डॉ. तात्यासाहेब मेघारे, गेवराई [ बीड ]
लेखक – जिल्हा परिषद शाळेतील प्रयोगशील शिक्षक म्हणून परिचित आहेत.