बीड – गेवराई : रंगभूमीवर एखादी भूमिका घेऊन, त्या भूमिकेला न्याय देणे; ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण असते. कसदार अभिनय करून रसिक – प्रेक्षकांची दाद मिळवण्याची ती एक संधी असते. महेंद्र महाडिक लिखित, ऐतिहासिक महानाट्य शिवशाही च्या भव्य – दिव्य रंगभूमीवर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पत्नीची, शिवपुत्र राजे संभाजीच्या आईची भूमिका मिळणे, खूप आनंदाची, अभिमानाची बाब आहे. अशी उत्फुर्त प्रतिक्रिया गुणी अभिनेत्री तृप्ती भोसले हिने येथे बोलताना व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा-2025 आयोजित ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग, गेवराई जि.बीड येथील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. मंगळवार ता. 18 रोजी आमदार विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशाही महानाट्य रंगभूमीवरच्या कलाकारांची पत्रकार परिषद पार पडली. शिवशाही महानाट्याचे लेखक महेन्द्र महाडिक यांनी कलाकारांची ओळख करून दिली. या महानाट्याच्या रंगमंचावर शंतनू मोघे, अलका कुबल यांच्यासह 250 कलाकारांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, आईसाहेब जिजाऊ, सईबाई, राजे संभाजी, तुकाराम महाराज, अफजलखान, अनाजी पंत इ. च्या प्रमुख भूमिका आहेत. संभाजीनगर येथील गुणी अभिनेत्री म्हणून जिचा रंगमंचावर विशेष उल्लेख करण्यात येतो.
त्या सईबाई च्या भूमिकेतून दिसणार आहेत.तृप्ती भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सईबाईची भूमिका साकार करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. साक्षात छत्रपतीच्या पत्नीची, राजे संभाजीच्या आईची भूमिका मिळणे खूप आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे. मला याचा मनस्वी आनंद असून, मी संभाजीनगरच्या परिसरात अभिनयातून ओळख निर्माण केली आहे. रंगभूमीवर काम करून करिअर करायचे असल्याचे ही त्यांनी सांगितले. तृप्ती भोसले उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचे शिक्षण बीसीएस.एमबीए झाले आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध लेखक, कवी आहेत. घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला असून, शिवपुत्र संभाजी, शिवशाही महानाट्य इ. व्यासपीठावर काम करतेय, काही मराठी मालिका, चित्रपटात संधी मिळाली आहे.
कला क्षेत्रात नाव करायचे असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. गेल्या पाच – सात वर्षांपासून ऐतिहासिक महानाट्य रंगभूमीवर काम करत आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या आरंभ नावाच्या ऐतिहासिक चित्रपटातून त्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना कला मंचावर उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ऐतिहासिक महानाट्य शिवशाही च्या भव्य रंगमंचावर दिसणार्या सईबाई प्रेक्षकांना किती भावतात, हे पाहता येईल. मायबाप प्रेक्षकांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.
सुभाष सुतार, पत्रकार – बीड