बीड – गेवराई : रंगभूमीवर काम करणारा कलाकार केवळ कलेचा भुकेला असतो. रंगभूमीशी एकरूप होऊन तो आपला अभिनय सादर करतो. त्याला फक्त हवी असते प्रेक्षकांची दाद आणि पाठिवर कौतुकाची थाप. एका वेगळ्या अर्थाने, काम करणारा रंगमंच, कला आणि प्रेक्षकांशी बांधिलकी जोपासणारा कलावंत शोषिकच असतो. अशी वेदना गुणी कलावंत महेश कोकाट यांनी येथे व्यक्त केली.राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा-2025 आयोजित ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग, गेवराई जि.बीड येथील र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर मंगळवार ता. 18 रोजी आमदार विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशाही महानाट्य रंगभूमीवरच्या कलाकारांची पत्रकार परिषद पार पडली. या महानाट्याच्या रंगमंचावर शंतनू मोघे, अलका कुबल यांच्यासह 250 कलाकारांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, आईसाहेब जिजाऊ, सईबाई, राजे संभाजी, तुकाराम महाराज, अफजलखान, अनाजी पंत इ. च्या प्रमुख भूमिका आहेत.
यावेळी मुंबई येथील
गुणी अभिनेता म्हणून ज्यांचा
रंगमंचावर विशेष उल्लेख करण्यात येतो. ते अनाजी पंत अर्थात महेश कोकाट खलनायकाच्या
भूमिकेतून दिसणार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांनी भुरळ पाडली आहे. चाहते सेल्फी साठी गर्दी करून, त्यांचे कौतुक करत आहेत. 18 फेब्रुवारी रोजी त्यांनी
रंगमंचावर पत्रकारांशी संवाद साधला.घरातून कलेचा वारसा नाही. मात्र, त्यांना लहानपणापासून अभिनय आणि खेळाची आवड होती. त्यामुळे, त्यांनी रंगमंच जवळ केला. आजवर विविध मालिका, चित्रपट, नाटकातून आपल्या अभिनयाचा अविट ठसा उमटवून महाराष्ट्रभर नावलौकिक केला आहे. दूरदर्शन च्या माध्यमातून ते घराघरात पोहचले आहेत. दूरचे दिवे, हे विनोदी नाट्याचे महाराष्ट्रभर जवळपास दोन हजार प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्राचा आवडता अभिनेता
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर त्यांनी अठरा वर्ष रंगभूमीवर काम केले. मंगल गाणी, दंगल गाणी, ऑल द बेस्ट, खतरनाक, पछाडलेला, चिमणी पाखरं, या गाजलेल्या चित्रपट, नाटकातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले काल आणि आजच्या रंगमंचावर मोठा बदल झाला आहे. त्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन काम करावे लागते. सगळ्याच कलाकारांना ग्लॅमर मिळेल, याची शाश्वती नसते. पण, एक सांगू का, आमच्या सारखे कलाकार पैसा, प्रसिद्धी साठी काम करत नाहीत. रंगमंचाशी वेगळे नाते उभे राहते. तो पडता, ते व्यासपीठ आम्हाला बसू देत नाही. अलीकडच्या काळात आठवड्यात दोनच दिवस काम मिळते. रोजीरोटीचा प्रश्न असतोच. प्रेक्षकांना काय आवडते, हे खूप महत्त्वाचे असते. आता, मराठवाड्यात तमाशा, लावणीला प्रतिसाद मिळतो. त्या पेक्षा पश्चिम महाराष्ट्राने लावणीला जवळचे मानले. मुंबई-पुण्या सारख्या शहरात
नाटकाचा प्रेक्षक टिकून आहे. त्यामुळे, मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कलाकार उपेक्षित राहीला की, त्याची परवड होते. नाहीतरी, तो रंगभूमीवर शोषिकच राहीला आहे. ना सरकार ना निर्माते..! समाजाकडून अपेक्षा ठेवत आम्ही आजवर इथपर्यंत आलोय. तोच खरा मायबाप आहे.
त्यामुळे, अनंत अडचणी आहेत. उतार चढाव आहेत. तरीही,आम्ही आनंदाने या व्यासपीठावर कार्यरत आहोत. अशी भावना शेवटी महेश कोकाट यांनी व्यक्त केली.
सुभाष सुतार , पत्रकार गेवराई – बीड