बीड : वाळुने भरलेले ट्रॅक्टर तडजोड करून सोडल्याचा ठपका ठेवत गेवराई पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचा आदेश पोलीस अधीक्षक नवनित काॅवत यांनी काढला होता. दरम्यान, प्राथमिक चौकशी केली असता त्यात त्यांचा दोष आढळला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेऊन कर्तव्यावर पून्हा हजर राहण्याचे आदेश काढण्यात आल्याने, अखेर पोलीस अधीक्षकांनी न्याय दिला, अशी भावना व्यक्त होत आहे.
सहायक फौजदार बलराम दामोदर सुतार व हवालदार अशोक बबन हंबर्डे • अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 27 जानेवारी रोजी त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले होते. त्यांच्यावर नियमानुसार ठाण्यात आणून गुन्हा दाखल करणे आणि नंतर वाळूसह वाहने जप्त करणे आवश्यक होते. परंतु , या दोघांनीही तडजोड करुन, ट्रॅक्टर सोडून देऊन, पैसे घेतल्याचा आरोप होता. या संदर्भात अहवाल येताच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 31 जानेवारी रोजी तडकाफडकी निलंबन करून प्राथमिक चौकशी माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे दिली होती. या संदर्भात, अहवाल प्राप्त झाला असून, त्यात दोष न आढळल्याने हंबर्डे व सुतार या दोघांनाही पुन्हा गेवराई ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईने उलटसुलट चर्चा झाली होती. ध चा म झाल्याने, या संदर्भात, पोलीस अधीक्षक कांवत यांनी ही, सविस्तर माहिती घेतली. तसेच, चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोघे पोलीस कर्मचारी दोषी आढळून आले नाहीत. त्यामुळे, निलंबन रद्द करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी न्याय दिल्याची चर्चा आहे. फौजदार बलराम सुतार गेल्या वर्षभरापासून गेवराई जि.बीड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एक मितभाषी, समंजस अधिकारी म्हणून ते शहरात परिचित आहेत.