गेवराई – बीड : सुभाष सुतार : पैठण नाथ सागरावर अवलंबून असलेल्या 0 ते 132 किलोमीटर अंतरावरच्या उजव्या कालवा दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. राज्य सरकारच्या जायकवाडी प्रशासनाने जीर्ण झालेल्या कालव्याला अस्तारीकरण टाकून नवे रूप आणले आहे. मात्र, उजव्या कालव्याच्या दोन्ही बाजुला जवळपास 74 मुख्य वितरिका व त्या पेक्षा अधिकच्या उप-वितरिका आहेत. या वितरिका [ चार्या ] उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
या चार्यांचा उपयोग
पैठण [ जि. संभाजीनगर ] शेवगाव [ जि. अहमदनगर] ,गेवराई, माजलगाव जि.बीड येथील शेतकऱ्यांना आजवर झालेला आहे. कालव्यातून सोडलेले पाणी [ आवर्तन ] मुख्य वितरिकेतून सोडलेले पाणी टेल [ शेवट ] पर्यंत जात नाही. त्यामुळे, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमीनी पर्यंत पाणी जात नाही. कधी काळी रब्बी हंगामात पिंकाना फायदा व्हायचा. गहू, ज्वारी, उस क्षेत्रातील पिके उन्हाळ्यात ही हिरवीगार दिसायची. उन्हाळ्यात विहिर, बोअर , नदी, नाल्यांचे पाणी कमी होते. जायकवाडी धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर, त्या पाण्याचा वापर शेती साठी करता येत होता. सद्यस्थितीत वितरिकेचा उपयोग होत नाही. हे वास्तव चित्र कालवा परिसरात आहे.
मायबाप सरकारने, उद्ध्वस्त झालेल्या वितरिका दुरूस्त करून द्याव्यात, अशी मागणी कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पैठण धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून उजवा कालवा जातो. हा कालवा पैठण पासून 132 किलोमीटर अंतरावर असून, पैठण ते गेवराई मार्गै माजलगाव धरणा पर्यंत पसरलेला आहे. कालव्याकडे दूर्लक्ष झाल्याने कालव्याचे अस्तारीकरण उखडून गेले होते. कालव्यात गाळ, दगड, गोटे आणि दोन्ही बाजुने हजारो झाडे वाढली होती. त्यामुळे, सिंचन क्षेत्र घटले होते. कालव्याचा उद्देश कालबाह्य होऊ लागला होता. केवळ कालव्यातून वाहून आलेल्या पाण्यावर सिंचन होत होते. कालव्याच्या दोन्ही बाजुला मुख्य आणि उप वितरिका आहेत. दर दहा किलोमीटर अंतरावर कालव्यात चॅनल गेट बसवलेले आहेत. वितरिकेतून पाणी टेल पर्यंत जाऊन वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेली शेती सिंचनाखाली येत होती.
मुख्य वितरिकेतून सोडलेले पाणी उप वितरिकेतून गोरगरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात जात होते. परंतु , दहा बारा वर्षांपासून टेल पर्यंत पाणी जात नाही. नवे अस्तारीकरण टाकण्यात आल्याने कालव्याला नवे रूप आले आहे. कालवा दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, मुख्य वितरिका आणि उप वितरिका नादुरुस्त अवस्थेत आहेत. कालव्या शेजारी जवळपास 74 मुख्य वितरिका आहेत. या सगळ्या वितरिका नामशेष झालेल्या असून, त्या सर्व नव्याने करण्याची गरज आहे. मायबाप सरकारने, कालवा दुरूस्त करून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. तेवढ वितरिका दुरूस्तीचे काम करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी पैठण [ जि. संभाजीनगर ] शेवगाव [ जि. अहमदनगर] ,गेवराई, माजलगाव जि.बीड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
[ भाग – 4 ]