छावा का पहायचा. तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे मोगल साम्राज्याशी कसे लढले. एवढ्या कमी वयात त्यांना एवढी प्रगल्भता कशी लाभली. सर्व सामान्य माणसा विषयी जाणीव त्यांच्यात कुठून आली. जीवाभावाची माणसे जपण्याचे कसब कुणाकडून आले. कठीण यातनेत ही स्वराज्याचा कळवळा का आला. समाजभान राखून काम करण्याची उर्मी कशी मिळाली. धोरणी युवराज , कुटुंबवत्सल पती, मित्र, सखा, नात्यांची विण जपणारा योद्धा, राष्ट्रप्रेमाला जागणारा नायक, मातीशी इमान राखणारा भूमिपुत्र ,अष्टावधानी छत्रपती संभाजी महाराज वास्तवात होते कसे ? केवळ आणि केवळ, एवढ्या साठीच छावा चित्रपट पाहावा. जगदंब..जगदंब..!
छावा चित्रपटाची जगभर चर्चा आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. लक्ष्मण उतेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सुरूवात आणि शेवट, अगदी अप्रतिम स्क्रिप्ट आहे. कुठेही अगतिकता दाखवली नाही. एखाद्या विषयाचे अवडंबर नाही की, चिथावणीखोर भाष्य नाही.
चित्रपटात साजेसे पात्र शोभून दिसले आहेत. छावाची सुरुवात भारदस्त आवाजाने होते. तो आवाज लोकप्रिय हिरो अजय देवगण यांचा आहे. चित्रपटाच्या भाषेत त्याला ओव्हर व्हाईस म्हणतात. इतिहास वर्तमान काळातली साक्ष देत असतो. त्यातली सकारात्मकता महत्त्वाची गोष्ट आहे. थोड तारतम्य ठेवून इतिहास समजून घ्यावा लागतो. या अर्थाने, छावा एका उंचीवर नेऊन पाहता येईल. अनुभवता येईल.
संभाजी किसी धर्म के विरूद्ध नही है ! संभाजी को हर धर्म का आदर है..! कथा नायकाचा संवाद मनाला भिडतोच. त्या शिवाय , मराठा शोर नही करते. शिकार करते है..! पुस्तकात वाचलेले संभाजी राजे आणि छावा च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेल्या स्वाभीमानी संभाजीची तुलना करता येईल, म्हणून दिग्दर्शकाचे आभार मानले पाहिजेत. शिव पुत्र संभाजीचे व्यक्तिमत्त्व कलात्मक दृष्टिने हुबेहुब मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेत. शिवकालीन, इतिहासाची अमर गाथा नव्या तंत्राच्या सहाय्याने मांडताना आदर्श प्रतिभा उभी करून, नवा अध्याय कोरला आहे. छत्रपती संभाजी, राणी येशुबाई, हंबीरराव मामा, कवी कलश, राणी सोयराबाई, इ. भुमिका ताकदीच्या आहेत.
ऐतिहासिक चित्रपट उभा करणे अवघड गोष्ट असते. थोड ही डाव-उजव होऊ नये, याची काळजी दिग्दर्शक, निर्मात्याला घ्यावी लागते. ऐतिहासिक दाखले देताना तारतम्य ठेवून पुढे जावे लागते. खर म्हणजे, आव्हानाचे हे शिव धनुष्य असते. वाद विवाद होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी लागते. छावा, चित्रपट पडद्यावर झळकताच चित्रपटगृह गर्दीने फुलून गेल्याचे दिसून आले. वाद ही निर्माण झाला. बेसावध असताना संभाजी राजेंना, मोगली सत्तेने अटक केली. कुणी गद्दारी केली. यावरून, इतिहासकार वेगवेगळे दाखले देतात. या चित्रपटात शिर्के घराण्यावर आरोप करण्यात आलाय. त्यावरून ,वाद निर्माण झाला. बहुतांश कागदपत्रात शिर्के यांचा उल्लेख आढळतो. मात्र, याचा अर्थ सगळेच शिर्के वाईट होते, असा होत नाही. उदा - आग्रा प्रसंगात हिरोजी फर्ज॔द, मदारी मेहत्तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते. पुढच्या काळात तेच हिरोजी युवराज संभाजी यांच्या विरोधात गेल्याचा इतिहास आहे. ती एक प्रवृत्ती, विकृती आहे. तिला जात, धर्म नसतो. हे समजून घ्यावे लागेल. तरीही, समंजसपणा दाखवून दिग्दर्शक उतेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रख्यात लेखक शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या 'छावा' कादंबरीचा आधार घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. छावा कादंबरीने युवराजांचे वास्तवातले कर्तृव समाजा पर्यंत येऊ शकले. याचे सर्व श्रेय लेखकाचे आहे. वाचकांना, सांगायला पाहिजे की, छावा कादंबरी प्रकाशित होत असता, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण राहू द्या, अशी सूचना लेखकाला करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी होईल, असे काही करू नका. कारण, युवराजांचे कर्तृत्व हे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचा आधार आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. हे निरीक्षण वाचकांपर्यंत जावे, एवढेच सांगायचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचा शेवट झाला. असा विचार मोगलांनी केला होता. त्यामुळे, आपले साम्राज्य सुरू व्हायला आडकाठी नाही. हा मोगलांचा हेतू होता. मात्र, तसे काही झाले नाही. थोरले युवराज धोरणी निघाले. सावध होऊन त्यांनी स्वराज्य उभे करायला सुरुवात केली. त्यातूनच, बुऱ्हाणपूरवर मराठ्यांनी चढवलेला हल्ला
औरंगजेबच्या सत्तेला आव्हान देणारा ठरला. त्यानंतर, चित्रपटाने वेग घेतो. औरंगजेबच्या कुटील कारवाया, युवराजांचे सडेतोड उत्तर, स्वकियांचा बंदोबस्त, औरंगजेब पुत्र अकबर आणि संभाजी राजेंची भेट , इ. प्रसंग इतिहासातल्या राजकीय पटलावरचे गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.
या सगळ्या धावपळीत पत्नी येशुबाई यांच्याशी सल्लामसलत करतानाचा संवाद, बंधू राजाराम, सावत्र आई सोयराबाई, कवी कलश, हंबीरराव मोहीते यांच्याशी असलेले नाते. पत्नीशी हितगुज करते वेळी , राजे संभाजी यांची भावनिक जवळीकता. त्यातून आलेला संवाद..तुम साथ हो, तो जंग भी हमारे लिए एक उत्सव है..! किंवा कवी कलशाने केलेली स्तुती.
युवराज हम आपके स्वराज्य में “नमक” का काम करेंगे. संभाजी शिवराज, कवी कलश के मीत है..!
चित्रपटातले हे प्रसंग, संवाद प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. प्रेक्षकांचे सगळे लक्ष चित्रपटाच्या शेवटा कडे असणार, हे दिग्दर्शकाला पक्के माहीत आहे. दिग्दर्शकाने तो प्रसंग कसा मांडलाय, हे पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केली.
कुटील डाव टाकल्याने संगमेश्वरला
संभाजी राजेंना अटक झाली. या ठिकाणची लढाई शौर्याचे प्रतिक आहे. प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रतिकूल परिस्थितीत एक योद्धा कसा लढला, हे दृश्य अविस्मरणीय आहे.
प्रचंड यातनेत ही, डोळ्यात शेवटपर्यंत तेज आहे. तोच आवेश आहे.
संभाजी राजे केवळ..जगदंब एवढाच उच्चार करतात. मी धर्म बदलण्यापेक्षा, आप ही मराठा साम्राज्य मे आ जावो, धर्म बदलने की जरूरत ही नही पडेगी. यातून थेट संदेश जातो. प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या संभाजी राजेंनी धर्म सहिष्णुता शिकवली.
फितुरीने एका विकसित स्वराज्याला ब्रेक लागला. इतिहासात संगमेश्वर आणि छत्रपतींचे कौटुंबिक नातेसंबंध असल्याची नोंद आहे. त्या अर्थाने, कट, फितुरीचा उल्लेख झाला असावा. संभाजी राजेंना सहज अटक होईल, अशी परिस्थिती होती. युवराज बेसावध होते. कठीण घाटाचा रास्ता कोणी दाखवला हा यक्ष प्रश्न आहे. पोर्तुगीज-डच कागदपत्र, शकावली, जेधे शकावली, सभासद बखरी, विश्वकोश इ. कागदपत्रात दावे-प्रतिदावे सापडतात. याच आधाराने, लेखक-दिग्दर्शक उतेकर यांनी “छावा” मांडला आहे. त्यांनी शिर्के कडे अंगुलीनिर्देश केला. थेट नाव घेतले नाही.
चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा
विकी कौशल [ संभाजी राजे ] यांनी
जबरदस्त साकारली आहे. त्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांना छान मराठी बोलता येतय.
रश्मिका मंदानानं [ राणी येशुबाई ] अभिनय करते वेळी जबरदस्त शालीनता दाखवली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेब व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. रंगसंगतीत रमलेला हा अभिनेता भन्नाट दिसलाय. त्यांचा अभिनय, हावभाव, विशिष्ट संवाद लक्ष वेधून घेतात. छत्रपती संभाजी राजा जैसा पुत्र का दिला नाही. अशी, तक्रार वजा विनवणी ते अल्लाह [ इश्वर ] कडे करतात. तेव्हा त्यांची वेदना चेहर्यावर दिसते. त्यांच्या अभिनयाचे कौतुक करावेच लागेल.
पिळदार अंगाचा, डोळे अन भारदस्त आवाजाची देणखी मिळालेला आशुतोष राणा भाव खाऊन जातो. त्यांचे धारातीर्थी पडणे, राजे संभाजीची आठवण आणि शेवटी
जय भवानीचा नारा प्रेक्षकांचे डोळे ओले करतो. सोयराबाई [ दिव्या दत्ता ] भूमिका अप्रतिम आहे. मात्र, तिला आणखी वाढवता आले असते. त्या बरेच वर्ष रायगडावर होत्या.
दिग्दर्शक धाराऊ आईला विसरले नाही. हे फार छान झाले. त्या संभाजी राजेंच्या दुध आई होत. धाराऊ गाडे, मु.पो. कापुरहोळ ता. भोर जि. पुणे, अशी नोंद आहे. निलकांती पाटेकर [ धाराऊ ] यांनी धाराऊची भूमिका पार पाडली आहे.
अकबरच्या भूमिकेत [ नील भूपालम ] रायाजी बांदल [ संतोष जुवेकर ] बाळाजी [ मनोज कोल्हटकर ] किरण करमरकर , कवी कलश [ विनीत कुमारसिंग ] इ.
या कलाकारांनी दमदार अभिनय करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.
सौरभ गोस्वामी यांच छायाचित्रण डोळे भरून पाहावे , असे आहे.
परवेझ शेख यांची साहसी दृश्ये आहेत. शीतल शर्मा यांची वेशभूषा अव्वल दर्जाची वाटते. एआर रहेमान यांनी छान पार्श्वसंगीत दिलय. क्लायमॅक्स छान वाटतो. भूतकाळात घेऊन जाणे, एक वेगळा आनंद असतो. एकुणच, छावा चित्रपटात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मात्र, त्या सर्व घटना चित्रपट गृहात जाऊन पाहाणे वेगळे समाधान देणारे आहे. संवेदनशील मनाला “टच” करणारा छावा म्हणजे, राष्ट्रप्रेमाचा वारसा सांगणारा दस्तावेज..!
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिहितात. प्रथम मायभू च्या चरणा, छत्रपती शिवाबांच्या चरणा, स्मरोणी गातो कवना. जी.. जी..रं , जी. जी. रं ..जी.जी..!
[ चित्रपट समीक्षा ]
सुभाष सुतार पत्रकार, बीड – गेवराई