गेवराई - बीड : वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रामध्ये अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांच्या कवितेतून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन प्रा. डॉ. संगीता आहेर यांनी केले. त्या महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाद्वारे आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय, गेवराई च्या मराठी विभागाद्वारे 'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्रा. डॉ. संगीता आहेर म्हणाल्या की, साहित्य समाजाचा आरसा असतो. वि. वा. शिरवाडकर यांनी कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता इत्यादी क्षेत्रांमध्ये विपुल असे लेखन करून मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रामध्ये मोलाची अशी भर घातली आहे. त्यांची कविता सामान्य माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देते. असे प्रतिपादन करून स्वलिखित 'कवि' या कवितेचा काव्यपाठ सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव शिनगारे यांनी केले. संचालन प्रा. रामहरी काकडे यांनी तर आभार प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.