बीड – गेवराई :
सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये झाडांचे महत्त्व खूप मोठे आहे. झाडे लावा झाडे जगवा म्हणत फक्त झाडे लावून चालणार नाही तर ती जगवली देखील पाहिजेत.त्यामुळे वृक्षारोपण व त्याचबरोबर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व नागरीकांना पेटवून देण्यासाठी गेवराईतील सामाजिक कार्यकर्ते संदीप साळवे यांनी वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी शहर व परिसरामध्ये हजारो झाडे लावून त्यांचे संवर्धन करत एक आदर्श निर्माण केला आहे.
गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप साळवे हे गेवराईतील रायगड प्रतिष्ठान, व मांगिरबाबा वृक्ष लागवड समितीचे सदस्य असून सह्याद्री देवराई वृक्ष लागवड प्रकल्प या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत देखील संदीप साळवे यांनी वृक्ष संवर्धनाचे काम केले आहे. गेल्या १० वर्षांपासून वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये ते काम करत आहेत. त्यांनी शहरात शेकडो झाडे लावून त्यांचे संवर्धन देखील केले आहे. गेवराई व परिसरात कुठेही वृक्षारोपण मोहीम असेल त्या ठिकाणी ते जाऊन संदीप हे स्वयं स्फूर्तीने वृक्षारोपणाचे काम करतात. फक्त झाडे लावून चालणार नाहीत तर त्याचे संवर्धन देखील केले पाहिजे असा संदेश देत वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य संदीप साळवे यांच्या माध्यमातून केले जात आहे. याविषयी बोलताना संदीप साळवे म्हणाले की वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाच्या आयुष्यात झाडाचे खूप मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्या झाडाचे संवर्धन केले पाहिजे. फक्त झाडे लावा झाडे जगवा म्हणून झाडे लावायची व नंतर त्याकडे दुर्लक्ष करायचे असे होता कामा नये त्यामुळे प्रत्येकाने एक का होईना झाड लावले पाहिजे व त्याला नियमितपणे पाणी घालून त्याची निगा राखून ते जगवले पाहिजे तरच वृक्ष संवर्धन चळवळ अधिक बळकट होईल. त्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे व वृक्ष संवर्धन चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले. गेवराई शहर परिसरात झाडे लावून त्या झाडांचे संवर्धन करण्याचे काम संदीप साळवे व त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून होत असून त्यांच्या वृक्षारोपण व वृक्ष संगोपणाच्या कार्याला मित्रांची मोठी मदत होत असल्याचे सांगत ते मित्रपरिवारा विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुठलाही गाजावाजा न करता त्यांचे वृक्षारोपण व वृक्ष संगोपणाचे कार्य मागील १० वर्षांपासून सूरू आहे. तसेच सामाजिक कार्यात देखील संदीप साळवे हे सदैव अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.