[ भाग – 7 ]
गेवराई – बीड : सुभाष सुतार : पैठण धरणाच्या उजव्या कालव्याने अल्पभूधारक शेतीकरी कुटुंबाला आधार दिला आहे. कालव्यातून आलेल्या पाण्याने शेतीला संजीवनी मिळाली आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेलेल्या अनेक कुटुंबाच्या मदतीसाठी उजवा कालवा धावून आल्याने, शेतकर्यांच्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे.
संभाजीनगर जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यात, आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाचा इतिहास आहे. 1965 साली या धरणाचे काम सुरू करण्यात आले होते. अकरा वर्षांनंतर, 1976 साली तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीत जायकवाडी धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले होते. याच, धरणाखाली डावे - उजवे असे दोन कालवे आहेत. उजवा कालवा 132 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. डावा कालवा 208 किलोमीटर अंतरावर असून, तो जालना, परभणी जिल्ह्य़ातून जातो.
या दोन्ही कालवा क्षेत्रात एक लाख 41 हजार 640 हेक्टर 41 हजार 682 हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कालव्याला दोन्ही बाजुला मुख्य वितरिका आहेत. त्यातून , शेतीला टेल पर्यंत पाणी जाऊन, शेती भिजते. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. या संदर्भात, अनेक गोष्टी दुर्लक्षित राहील्या आहेत. त्यासाठी, शेतकरी आणि प्रशासना मध्ये नव्याने सुसंवाद होणे आवश्यक आहे. वीज न वापरता कालव्यातून वाहून येणारे पाणी शेतीला संजीवनी देत आले आहे. या शिवाय, कालव्याच्या वरच्या भागाला असलेल्या काही अल्पभूधारक शेतकर्यांनी कालव्यातले पाणी लिफ्ट करून शेतीला वापरले. अशा, हजारो शेतकर्यांना , उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर करता आला आहे. त्यांची शेती पाण्याखाली आली. कुटुंबाला अचानक सहन कराव्या लागणाऱ्या दुखद घटनेत कालव्याने, अशा निराधार कुटुंबाला
आधार दिलाय. हे वास्तव चित्र दिसून आले असून, कालव्याने शेतीला संजीवनी मिळाली, सुगीचे दिवस पाहायला मिळाले. असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख शेतकरी आजही करतात. पंधरा वर्षांपूर्वी मराठवाडा दुष्काळी उंबरठ्यावर होता. त्यामुळे, नाथसागरात पाणी नव्हते. त्याचा मोठा फटका उजव्या – डाव्या कालवा क्षेत्रातील शेतीला बसला. गेल्या काही वर्षांपासून चांगले चित्र आहे. धरणात पाणी आहे. शेती हंगामात पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. कालव्याच्या आधारावर शेती जिवंत राहीली आहे. त्याच कारणाने , उजव्या कालव्याशी एक भावनिक नाते निर्माण झालेले आहे. उजव्या कालव्याने अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला भक्कम आधार दिला आहे.






