गेवराई – बीड :
स्वतःच्या कपड्याला इस्त्री करताना अचानक विद्युत प्रवाहाचा तिव्र शॉक बसल्याने एका 38 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा येथे सोमवार ता. 7 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने बंगालीपिंपळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश मोहनराव तळतकर (वय 38 वर्ष) रा.बंगालीपिंपळा ता.गेवराई जि.बीड असे, मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गणेश तळतकर या तरुणाचे बंगालीपिंपळा गावात सीएससी सेंटर तसेच फोटो स्टुडिओचे दुकान आहे. पिकविमा तसेच आँनलाईन कामे व फोटोग्राफीच्या माध्यमातून गणेश याची परिसरात मोठी ओळख होती. सतत हसतमुख व कधी कोणालाही न दुखावणारा व कायम मित्रांच्या गराड्यात वावरणारा गणेश तळतकर हा सोमवारी सकाळी आंघोळ करुन साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या कपड्याला घरीच इस्त्री करत होता. यावेळी अचानक इस्त्रीमधून विजेचा तिव्र शॉक बसल्याने गणेश जाग्यावर कोसळला. जखमी अवस्थेत गणेशला ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. गणेश तळतकर यांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर परिसरातील असंख्य नागरिकांनी बंगालीपिंपळा येथे धाव घेतली होती.
बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बंगालीपिंपळा येथे दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.
विद्युत डिपीची आर्थिंग फेल, गावातील अन्य चार जणांनाही बसला विजेचा धक्का –
गणेशला इस्त्री करताना शॉक बसला, याचवेळी गावातील गावातील वेगवेगळ्या ठिकाणी अन्य तीन जणांना देखील विजेचा शॉक बसल्याची घटना घडली. गणेश याचा चुलत भाऊ दादा तळतकर याला किराणा दुकानातील इलेक्ट्रॉनिक काटा साफ करताना, गंगाधर नवले यांना टिव्हीवर ठेवरेली बीपीची गोळी घेताना तर ज्ञानेश्वर तळतकर यांना बोर्डात मोबाईल चार्जर लावताना तसेच रुक्साना बाबू शेख या चार जणांना तिव्र धक्का बसून दूर फेकले गेले. त्यामुळे ते यामधून बचावले. मात्र गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान ज्या विद्युत डिपीवरुन विजेचा पुरवठा होतो, त्या डिपीची जमीनीतील आर्थिंग फेल असल्यामुळे हि घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर अशाचप्रकारे दोन महिण्यांपूर्वी दोन जणांना शॉक बसला होता, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले होते. यानंतर महावितरणकडे याबाबत माहिती देऊन डिपीच्या आर्थिंग दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत माने यांनी केला आहे.






