त्यांचा डीएडला [सन १९८८ साली] नंबर लागला होता. मात्र, शासकीय फिस आणि महिना दोनशे रूपये खर्च अपेक्षित होता. तो कसा करायचा. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. नुकतेच बहीणीचे लग्न झाल्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे, आलेली संधी हुकली. दुसर्या वर्षी टक्केवारी वाढली आणि खाजगी संस्थेत पैसे देऊन प्रवेश घ्यायची ताकद नव्हती, अशी परवड त्यांच्या वाट्याला आली.
आठवीत असताना रोज सकाळीच ते वर्तमानपत्र वाटपाचे काम करायचे. शब्दांनी त्यांची सोबत केली. ते बातमी लिहू लागले. शाळेत शिक्षक व्हायचे स्वप्न अपूर्ण राहीले. परंतू ,समाजाचा शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. तीस वर्षे झाली बापू गाडेकर पत्रकारितेत रमले आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारितेचा आदर्श वारसा टिकवून ठेवण्यात त्यांना यश लाभले. ग्रामीण भागातल्या बातमीला जिवंत ठेवण्याची धडपड त्यांनी आजवर केली आहे. त्यांचा प्रवास म्हणजे सदैव तेवत असलेली मशाल आहे. एका अर्थाने, बापू ग्रामीण भागातील क्रांतिकारी पत्रकार आहेत. तीन दशकाचा अनुभव आणि त्या निमित्ताने त्यांचा झालेला आजवरचा आलेख शब्दपुष्पाच्या रूपाने गुंफण्याची संधी मिळाली. बहुजन समाजातला बापू , आलेल्या अडथळ्यांवर मात करून तावूनसुलाखून निघून, वाचकांच्या आशीर्वादावर यशस्वी झाला आहे.
पत्रकारिता समाजाच्या हितासाठी वापरता येणारे एक उत्तम आयुध आहे. त्याचा वापर करून, समाजाला सजग करता येते. महात्मा ज्योतीराव फुले सांगायचे, समाजकारण पवित्र कार्य आहे. त्याचा धंदा होऊ न देता, समाजाच्या प्रश्नांना मार्ग दाखवता येतो. या अर्थाने,महात्मा फुले यांचे विचार जोपासून,आहे त्या शेत जमीनीवर काबाडकष्ट करून पोट भरणारी आणि त्यांचा वारसा जपणारी हाजारो माणसे आहेत. बापू कुशाराम गाडेकर, मु.पो.तलवाडा ता.गेवराई जि.बीड येथील रहिवाशी आहेत. ( मो.नं. 9763028070 ) तीस वर्षे झाली वार्ताहर आहेत. अनेक दैनिकात काम केलंय. सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गाडेकर यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीशी एकरूप होऊन काम केलंय. मी १९९५-९६ साली औरंगाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता महाविद्यालयात शिकत असताना, बापूंच्या बातम्या वाचून काढल्यात. अनेकदा त्यांची प्रवासात बस मध्ये भेट झालेली आहे. फक्त तोंड ओळख होती. मात्र, त्यांच्या विषयी स्नेह होता. एवढी वर्षे झाली आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. घरच्या गरीबीने त्यांना लहान वयात व्यावसायाचे धडे घ्यायची वेळ आली. काही वेळा नाइलाज असतो. वयाच्या तेराव्या वर्षी, तलवाडा ता.गेवराई जि.बीड (मराठवाडा) च्या बसस्थानकावर ते वृत्तपत्र विकायचे, शिवाय घरोघरी वृत्तपत्र टाकायचे कामही करायचे. ग्रामीण भागातील शाळेत अजूनपर्यंत कमवा आणि शिका, ही योजना नाही. अशावेळी,खेड्यातली गरीब मुलं शाळा सुटल्यावर, सुट्टीत किंवा सकाळच्या वेळेत हाती पडतील ती कामे करून शिकत असतात. गाडेकर यांनी ही वैखरीची वाट तुडवून शिक्षण पूर्ण केले. दहावी झाली आणि त्यांचा नेकनूर जि.बीड येथे शासकीय डिएड ला नंबर लागला होता. मात्र, गरीबीचा गतिरोधक आडवा आल्याने त्यांना डिएड करता आले नाही. नाउमेद न होता ते शिकत राहीले. पेपर वाटता वाटता बातम्या पाठवू लागले आणि त्यांचा पत्रकार म्हणून प्रवास सुरू झाला. खरं म्हणजे, काहीवेळा शब्द घायाळ करतात. बापू मात्र अपवाद राहिले. बापूंना शब्दांनी आधार दिला.
शब्दांनीच त्यांना आपलेसे केले. वृत्तपत्र वाटणारा मुलगा शब्दांनीच घडविला. केवढा हा योगायोग. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणायचे, आम्हा घरी धन शब्दांनीच रत्ने, शब्दची आमच्या जीवाचे जीवन..! वार्ताहर म्हणून बापूंचा प्रवास सुरू झाला होता. बापूंनी अनेक वर्तमानपत्रात काम केले आहे. मात्र, पार्श्वभूमी
दैनिकाशी त्यांची नाळ टिकून राहीली आहे. अनेक वर्षे झाली ते या वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात इमानदारीने काम करणारा एक पत्रकार, सामाजिक, राजकीय वर्तुळात स्वतःची इमेज तयार करतो आणि तरीही, त्या भल्या माणसाला गाव सोडावे लागते. ही शोकांतिका, शल्य अनेकांच्या वाट्याला येते. असं म्हणतात की, ईश्वर कठीण प्रसंगात साथ न देता परिक्षा घेतो. बापूंनाही अशा निखार्यावरून चालावे लागले. न डगमगता त्यांनी गाव सोडले. पाच – सहा वर्षे बाहेरगावी राहून संसार उभा केला. कठीण प्रसंगात कोण कामी आले हे त्यांनाच माहित. पण त्यांना राग नाही आणि लोभही नाही. बापू क्रांतिकारी पत्रकार आहेत. ग्रामीण विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची राहीली आहे. एखाद्याचे चांगले ते अधिक चांगले म्हणायचे, बातमीतून ते लोकांपर्यंत पोहोचेल, यासाठी मनावर मळभ येऊ न देता सत्य मांडायचा प्रयत्न त्यांनी आजवर केला आहे. पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम केले. एखादा विषय हाती घेतला की, तो विषय तडीलाच न्यायचा प्रयत्न ते करत आलेत. त्वरिता देवीच्या ( तलवडा ता.गेवराई जि.बीड) डोंगर माथ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य रेखाचित्र ( ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी ) काढण्याची तयारी त्यांच्या नेतृत्वात पार पडली. मीही त्याठिकाणी तीन दिवस ये-जा करत होतो. सार्वजनिक कार्यात इतरांची काळजी घेणाऱ्या बापू गाडेकरांनी मनात घर केलं. बापूंशी संवाद साधून तीन दिवसात ३३ वर्षाचा पाढा समजून घेता आला. ते बोलत होते अन् मी ऐकत होतो. बापू म्हणाले, बातमीदार म्हणून काम करत असताना अनेक बरेवाईट अनुभव आले. बातम्यांमुळे चांगलाच त्रास झाला. काहींनी कौतुकही केले. सहा वर्षे गाव सोडण्याचा प्रसंग आला. गावाच्या बाहेर पाऊल न ठेवणारा हा “बापू” एकटा पडला होता. हमारे “नबीने” कहां है, बेशक मै तेरा इम्तेहान ले सकता हूं, क्यूं की, मेरा तेरे पर पुरा हक है..! याच न्यायने देवाने परीक्षा घेतली. त्यामुळे, स्वतःला विचलित होऊ दिले नाही. स्वाभिमानाने वाटचाल सुरू ठेवली. यातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. माणसांना वाचता आले. राजकारण-समाजकारणातले डावे-उजवे समजले. चटके सहन केल्याने, अनुभवात भर पडली. या सगळ्या प्रसंगात पत्नी अलका हिने धीर दिला. म्हणूनच, माझ्या खांद्यावरचा भार हलका होत गेला अशी कृतज्ञता बापू व्यक्त करायला विसरत नाहीत. बापूच्या आयुष्यात अलकाताईने संसार वेल फुलवली. त्या तिर्थपुरी जि.जालना येथील आहेत. बापू-अलका च्या संसारात दोन मुले, एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीने मेडिकल क्षेत्रात करिअर केलय. एक मुलगा बीएड करतोय तर एकाने परभणी कृषी विद्यापिठात बीएससी ॲग्री करून एमएससी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आता तो स्पर्धा परिक्षेची तयारी करतोयं. मुलीचा संसारही सुखाचा सुरू
झालायं. बापूंचा शेवट गोड होतोय, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. दै.झुंजारनेता, दै. मराठवाडा वर्तमानपत्रात, १९८९ ते १९९४ अशी सलग सहा वर्षे ते वार्ताहर होते. त्या नंतरच्या काळात त्यांचा स्नेह पार्श्वभूमी परिवाराशी राहीला आहे. १९९१ ते आजपर्यंत ते पार्श्वभूमी, बीड या वर्तमानपत्राचे वार्ताहर आहेत. ज्येष्ठ नेते खा.शरदराव पवार,
ना.रामदासजी आठवले, ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ, माजीमंत्री बदामराव पंडित, रिपाइंचे बाबुराव पोटभरे यांनी गाडेकर यांच्या पत्रकारितेचे कौतुक केलेले आहे. सन २००९ साली त्यांनी केलेल्या बातमीची दखल दस्तुरखुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतली होती. ती न्यूज दै.पार्श्वभूमी च्या अंकात पहिल्या पानावर छापून आली होती. बातमीची हेडलाईन्स अशी होती. “भुजबळांना” विरोध केला तर बीड जिल्ह्यात हात दाखवू..! आणखी एक विषय, त्यांच्या सजग बांधिलकीची साक्ष देत राहील. सन २००८ साली महाराष्ट्रात गाजलेल्या काठोडा ता. गेवराई जि.बीड येथील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत अत्याचार केले. त्यात एका व्यक्तीचा खूनही झाला होता. राज्याचे माजीमंत्री सुरेश नवले हे काठोडा येथे भेट देण्यासाठी आले होते. स्वतः गाडेकर, पत्रकार लक्ष्मण राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र विटकर यांनी सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. गाडेकर यांनी या प्रकरणात महत्वाची भूमिका घेऊन अत्याचारीत कुटुंबाचे समुपदेशन केले होते. प्रा. सुरेश नवले यांनी बीड येथे पत्रकार परिषद घेतली आणि काठोडा प्रकरण महाराष्ट्रात गाजले. गुन्हेगारांना शासन झाले. ही असते खरी बांधिलकी. सामाजिक जाण असलेला हा भला माणूस मनाने सरळ, साधा, मनमिळाऊ स्वभावाचा आहे. तलवडा ता.गेवराई जि.बीड पंचक्रोशीतल्या तसेच गेवराई तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी बातमीतून मांडले आहेत. बेडर होऊन सत्य मांडले आहे. प्रत्येक घटकाला उपयोग होईल, या धाटणीतले त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. हे त्यांच्या पत्रकारितेचे यश आहे. कवी दुष्यंत म्हणायचे, हंगामा खडा करना मेरा मकसद नही. मेरी कोशिश होगी, यह तसबीर बदलनी चाहिए..!
बापू ,ग्रामीण भागातल्या प्रश्नांना मनावर काजळी येऊ न देता मांडत रहा. सामान्य माणसाला विसरू नका. एवढीच माफक अपेक्षा आहे.
आपल्या पत्रकारितेला मनापासून शुभेच्छा..!
सुभाष सुतार
( पत्रकार ) ९४०४२५३३८६






