कंत्राटदार चुना घेऊन फिरतोय – अजय दाभाडे
गेवराई – बीड :
ॲन्यूईटी अंतर्गत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत सुरू असलेल्या गेवराई तालुक्यातल्या [ जि. बीड ] चकलांबा- गेवराई – सेलू-लोणाळा ते मारफळा, या जवळपास 30 किलोमीटर राज्य रस्ता कामाची कंत्राटदारांनी अक्षरश: वाट लावली आहे. या प्रकल्पावर देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदार एजन्सीला अभय दिल्याने राज्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे, सदरील रस्ता प्रकल्पाच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अजय भैय्या दाभाडे यांनी केली आहे. दरम्यान, अजमेरा कन्स्ट्रक्शन चा मालक अजमेरा चुना घेऊन फिरतोय, शासनाला लावायला, अशा खमंग प्रतिक्रिया व्यक्त होताहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोक प्रतिनिधी व्यस्त असल्याचा फायदा, कंत्राटदाराने घेतला. त्यामुळे, 122.40 कोटी रूपयांच्या रस्ता कामाचा दर्जा ढासळला असून, कंत्राटदारांनी मलिदा चाटल्याची
चर्चा होऊ लागली आहे.
शिवसेनेचे गेवराई तालुका अध्यक्ष अजय भैय्या दाभाडे यांनी या रस्ता कामा संदर्भात म्हटले आहे की, बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यात प्रथम जिल्हा मार्ग -16 ते चकलांबा राजपिप्री-गेवराई रोहीतळ-जातेगाव सेलु – लोणाळा-मारफळा ते राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्ता प्रथम जिल्हा मार्ग – 20 किमी 0/00 ते 64/00 मध्ये जवळपास 30 किलोमीटर अंतरावरचे रस्ता डांबरीकरणाचे काम गेल्या महिन्यानपासून सुरू आहे. सदरील कामास 2020 – 2021 मध्ये तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथून रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. चकलांबा, माटेगाव मार्गे गेवराई आणि जातेगाव, सेलू, लोणाळा, मारफळा मार्गे होत असलेला हा राज्य रस्ता थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातील दळणवळणासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकास गरजेचा असल्याने, हा रस्ता दर्जेदार व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतू , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय मिळाल्याने नियम ,अटीला तिलांजली देऊन,संबंधित कंत्राटदाराने कामाचा दर्जा न ठेवता काम केले आहे. निकृष्ट कामामुळे रस्त्याला जागोजागो तडे गेले आहे. दुतर्फा असलेल्या ड्रेनेजचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. सिमेंट, खडीचा वापर व्यवस्थित करण्यात आला नाही. नाली काम अनेक ठिकाणी ढासळले आहे. सिमेंट रोडची लेवल नाही. नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावरचे थर उडवलेत, अशी तक्रार ग्रामीण भागातील नागरिकांनी केलेली आहे. डांबरीकरण करायच्या आधी व्यवस्थित खडीकरण करून, त्याची दबाई करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी माती मिश्रित खडी वापरली आहे. पुलाचे काम वेळेवर करण्यात आलेले नाही. वळण रस्ता वापरताना, कंत्राटदाराने साधे डायव्हर्शन दाखवण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे, या रस्त्यावर अनेक अपघात होऊन, यामध्ये एका तरूणाचा बळी गेला आहे. कंत्राटदाराने अनेक ठिकाणी मनमानी केली आहे. तरी या सर्व कामाची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना तालुका अध्यक्ष अजय भैय्या दाभाडे यांनी केली आहे.






