छत्रपती संभाजीनगर : जनसंवाद, जनसंपर्क तज्ञ म्हणून नव्हे तर, एक कृतिशील शिक्षक म्हणून, डॉ. सुरेश पुरी सरांनी पत्रकारितेचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात ज्ञानदीप लावण्याचा इमानेइतबारे प्रयत्न केला आहे. डॉ. सुरेश पुरी सरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे, मोर पिसासारखे सुंदर पान आहे. अशी कृतज्ञता डॉक्टर रेखा शेळके यांनी येथे बोलताना व्यक्त केली. 18 मे 2025 रोजी सांय साडेसहा वाजता, छत्रपती संभाजीनगर येथील भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केन्द्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या, अमृतमहोत्सवी कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शेतकरी पुत्र अमर हबीब, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लुलेकर
यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात, विद्यार्थ्यांच्या वतीने,
एमजीएम [ महात्मा गांधी मिशन-स्वायत्त विद्यापीठ ] संचलित, वृत्तपत्र महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख डॉ. रेखा शेळके यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, पुरी सरांविषयी काय आणि किती बोलू , ज्यांना सरांचा सहवास लाभला ते सगळे विद्यार्थी ज्ञानाने,कर्तृत्वाने संपन्न होत गेले. मला ही त्यांचा सहवास लाभला. त्यांचे मार्गदर्शन मिळाले. जेव्हा अडचण येईल, तेव्हा सरांनी पाठिवर कौतुकाची थाप मारली.
गोरगरीब समाजातील सर्व घटकांना सरांच्या घराचे दरवाजेखुले असायचे. ज्यांच्या आयुष्याला पुरी सरांच्या कर्तृत्वाचा परीसस्पर्श लाभला, त्या विद्यार्थ्यांचे सोने झाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे, सुंदर असे मोरपीस आहे. नेहमीच सकारात्मक विचार सांगणारे, नवी उर्जा देऊन; पाठीवर कौतुकाची पाखरण करावी ती पुरी सरांनीच..!
त्या म्हणाल्या की, एक आठवण मुद्दाम आवश्यक वाटते, म्हणून सांगते. तो दिवस आज ही, आठवतो. पोळा सण होता. पाऊस सुरू होता.सगळीकडे वातावरणात चिडीचूप होते. विद्यार्थी म्हणून जिथे आम्ही राहत होतो. त्या रूमचा दरवाजा अचानक वाजला. आम्ही दार उघडले तर, दरवाजात पुरी सर आणि त्यांची पत्नी..! ते दोघेही, हातात पुरणपोळीचा डब्बा घेऊन भरपावसात उभे होते. डॉ. रेखा शेळके एवढेच बोलू शकल्या, त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्या दोन अश्रुंनी सभागृह गलबलून गेले. स्वतःला सावरून, त्यांनी पुढे बोलताना जे भाव व्यक्त केले, ते खूप महत्त्वाचे होते. त्या म्हणाल्या, आज ते चित्र दिसत नाही. कृतिम , नाटकी नात्यांचे रंग उभे राहू लागलेत.
आयटी च्या झगमगाटात तो भाव, ती बांधिलकी लुप्त होऊ लागल्याचे निरिक्षण ही डॉक्टर रेखा शेळके यांनी नोंदवून, पुरी सरांना दीर्घायुष्य लाभो,अशी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना इश्वराकडे केली.






