गेवराई – बीड : गढी जवळच्या पुलावर सहा तरुणांचे जीव गेलेत. याची जबाबदारी कुणाची आहे. टोल प्लाझा फक्त टोल वसूल करतो. सुविधा उपलब्ध करून देत नाही. लाईट बंद आहे. रस्त्यावर खड्डे पडलेत. खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होतात. लोकांचे बळी गेल्यावर, टोल नाका कंत्राटदाराला जाग येते. म्हणजे, टोलच्या सुविधा, त्यांची जबाबदारी, लोकांचे बळी गेल्यावर निश्चित होते का ? हा साधा सवाल आहे. रस्त्यावर बळी गेल्यावर, तुम्ही जागे होता. ही, शोकांतिका आहे.
पाडळसिंगी ता. गेवराई जि.बीड येथे असलेला टोल प्लाझा आणि त्यावर देखरेख करणारी संपूर्ण यंत्रणा मुजोर आहे. वाहनधारकांच्या जीवावर कोटीची वसुली करून, त्यांना माज आलाय. जनतेच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका बोटचेपी आहे. कर्तव्य शुन्य आहे. टोल द्या. मात्र, तुमच्या सुविधासंदर्भात ब्र काढायचा नाही. तक्रार करायची नाही. कुठेही जा, आमचं कोणीही काही करू शकत नाही. या आविर्भावात टोल प्रशासन वागत आलय. त्यांना कोणीही जाब विचारत नाही. रोज किती पैसा वसुल होतो ? त्या बदल्यात, तुम्ही किती आणि सुविधा देता ? या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही. टोल नाक्यावर साधी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. पाडळसिंगी ते गेवराईगढी, गेवराई पर्यंत एवईडी लाईट च्या नुसत्या रांगाच उभ्या आहेत. त्या कधी सुरू तर बंद असतात. राष्ट्रीय महामार्गावर अंधार असतो. स्वच्छतागृह कधी सुरू तर कधी पाणी नाही म्हणून बंद असतात. लाज सोडल्या सारखे, बाहेर बोर्ड लावला जातो. पाणी नाही म्हणून, स्वच्छतागृह बंद आहेत. टोल प्रशासनाला सहकार्य करा. केवढा हा विनोद आहे. या टोल नाक्यावर घाडगे नावाचे व्यवस्थापनातील एक अधिकारी आहेत. त्यांना साधा प्रश्न विचारला की, पाडळसिंगी टोल प्लाझा वर ये - जा करणाऱ्या वाहन धारकांकडून दररोज किती रुपये जमा होतात ? तर, त्यावर ते फक्त विचकट हसतात. उत्तर देत नाहीत. मुग गिळून गप्प बसतात. गाड्यांची नोंद ठराविक दिवसांत घेतली जात नाही. दररोज किती टोल जमा होतो. या संदर्भात मॅनेज आकडेवारी संबंधित सरकारी कार्यालयाकडे दिली जाते. टोल चा झोल बाहेर आला पाहिजे. सरकारी यंत्रणा बसवून, दररोज किती पैसा वसुल होतो. याची खरी आकडेवारी काढली पाहिजे. सरकारी आकडेवारी आणि टोल नाक्यावरच्या कंत्राटदाराची आकडेवारी मिळते की नाही. हे वास्तव चित्र समोर यायला हवे. अंदाज असा आहे की, महिन्याला अकरा कोटी रु टोल वसुल होतो. त्या बदल्यात ना पिण्याचे पाणी आहे. ना, नीट स्वच्छतागृह आहेत. गेवराई- पाडळसिंगी - ते हिरापूर राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा झाडे लावली होती. ती झाडे , आजच्या मितीला किती वाढलीत ? झाडे कुठे आहेत. पाच वर्षापूर्वी लावलेली झाडे किती वाढायला हवीत ? याचा जाब, या
माजोरड्या टोल प्लाझा वाल्यांना
कोण विचारणार आहे का नाही ?
सहा तरूणांचे बळी गेलेत
26 मे. 2025 रोजी रात्री अकरा वाजता सहा तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने त्या सहा तरूणांना अक्षरश: चिरडले. सहा जीव गेले. मात्र, ते सहा नव्हते. त्यांच्या मागे कुटुंब आह. आई-वडील, पत्नी, लहान मुले आहेत. सहा तरुणांचे संसार उध्वस्त झालेत. निमित्त काहीही असूदेत, त्या संदर्भात समाज काय तो निर्णय घेईल. मात्र,
गढी ते पाडळसिंगी पर्यंत खड्डे आहेत. म्हणजे, रस्त्यावर लवण तयार झालय. त्यावरून गाडी गेली की, आदळते. त्यात पाणी साचले की, गाडीवरचा ताबा सुटतो. हे नीट कोण करणार ? कुणाची जबाबदारी ? फक्त, टोलची मलाई चाखायची आणि चाटायची ; एवढीच तुमची जबाबदारी ? टोल नाक्यावर सगळा अलबेल कारभार आहे. टोल नाका कंत्राटदार आणि प्रशासन हातात हात घालून काम करताहेत. मात्र, हे काम जनतेच्या हिताचे नाही. तर, ते जनतेच्या खिशावर डल्ला मारणारे आहे. वास्तविक पाहता, गेल्या दोन तीन वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्र, सोशल माध्यमे, माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतू, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीच झाले नाही. काडीने मलम लावणाऱ्या टोल नाक्यावरच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे शक्य होते. इतका, त्यांचा कारभार भ्रष्ट आणि चीड निर्माण करणारा आहे.पाच तरुणांचे जीव गेल्यावर टोल नाक्यावर हालचाली सुरू झाल्यात. झाडांची कटींग सुरू झाली. बंद पडलेल्या लाईट चे काम हाती घेण्यात आले आहे. एकुणच काय तर, दुरूस्तीचे काम करायची भानगड केली जात आहे. हे म्हणजे, वरातीमागून घोडे. पाडळसिंगी ते गढी पर्यंतच्या फारा किलोमीटर अंतरावर टोल नाका कंत्राटदाराच्या दूर्लक्षा मुळे शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. अनेकांचा जीव गेला आहे. या सगळ्या आत्म्यांचा तुम्हाला शाप लागेल. एक ना एक दिवस, तुमच्या छाताडावर बसून ते जाब विचारतील. तेव्हा, तुमची वाचा ही बाहेर निघणार नाही. अजूनही वेळ गेली नाही. कोटीची उड्डाणे करा. पण, लोकांना सुविध द्या, गोरगरीबांचा तळतळाट घेऊ नका.
सुभाष सुतार, पत्रकार
[ गेवराई – बीड ]






