16 जून 2025 रोजी, नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शाळेचा पहिला दिवस आहे.
सगळीकडे लगबग सुरू झाली आहे. सरकारी – खाजगी शाळांच्या परिसरात किलबिलाट पहायला मिळाला. बाजापेठेत गर्दी आहे. वह्या, पुस्तकांचे दालने गजबजून गेल्याचे चित्र पाहून समाधान वाटले. पालक ,आपल्या पाल्या विषयी किती जागरूक आहेत. याचा प्रत्यय येऊ लागलाय. सगळी कामे बाजुला ठेवुन, पालकांनी आपल्या पाल्यांसाठी वेळ दिला.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रशासनाने चांगली तयारी केली होती. एकट्या गेवराई [ जि.बीड ] तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 326 शाळा आहेत. हाजारो विद्यार्थ्यांनी शाळेची वाट धरली. रस्ते फुलून गेले होते.
शिक्षण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिवसभर शाळेत जाऊन आढावा घेतलाय. काळम पाटलांसारखे शिक्षण तज्ञ, आदर्श गुरूजी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देत फिरत होते. विस्तार अधिकारी संजय मोरे, शेळके, नांदूरकर, शेमे यांनी शिक्षण अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा पहिला दिवस अनुभवला. शिक्षकांशी हितगुज केले. शाळेत आलेल्या मुलांशी संवाद साधला. निरागस भाव घेऊन, भिरभिरत्या आशाळभूत नजरेने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पावलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गोड जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता. शाळेचे प्रवेशद्वार रांगोळ्यांनी सजले होते. शाळेच्या आवारात रंगबेरंगी फुगे डौलत होते. गावातून वाजतगाजत फेरी काढण्यात आली. गावकऱ्यांनी दारात उभे राहून, सहभाग नोंदवला.
शाळा प्रवेशाचा हा उत्सव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आहे. शहरातल्या बाजारपेठेत बाल गोपालांची – झुंबड उडाली होती. कुणी पायी, कुणी दुचाकी, तर कुणी चार चाकी वाहन घेऊन वह्या – पुस्तकांच्या खरेदी साठी आलेले होते. या वर्षी पालकांच्या खिशावर फार ताण पडणार नाही. वह्या-पुस्तकांचा भाव ठिकठाक आहे. त्यामुळे, ते ही एक समाधान आहे.
शैक्षणिक प्रवाहात गर्दी वाढते आहे. हे चांगले चिन्ह आहे. प्रत्येक घटकाला वाटते, आपल्या मुलांनी खूप शिकुन-सरवून मोठे व्हावे. शिक्षण काळाची गरज आहे. ही समजूत अधिक सजग झाली. याचा वेगळाच आनंद आहे.
शिक्षणाची वाट वैखरीची आहे. ती, कठीण आहे. पण, अवघड नाही. देवाने सगळ्यांना बुद्धी दिली. तिला आकार द्यायचे काम शाळेला करायचे आहे. शाळा तयार आहे. पालकांनी , कच्चा पाया मजबूत होईस्तोवर जागृत राहायचे आहे. सगळेच, शाळेवर सोडायचे नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, मुला-बाळांचे हित व्हावे म्हणून पालक धडपड करतात. मात्र, हे हित उपक्रम हाती घेतल्याशिवाय होणार नाही. साखरेतून गोडी निर्माण होईल. तोपर्यंत, तुम्ही चालत रहा. हा विचार मनात घेणे आणि तो अंमलात येत नाही, तोपर्यंत थांबू नका. या दृष्टिकोनातून पालकांनी उभे राहावे
अडाणी राहून काय उपयोग ? आम्ही शिकलो नाही. अर्धवट शिकलो. आमचं झाल गेलं, तुमची आबाळ होऊ नये. पोटाला चिमटा घेऊन, आम्ही कष्ट करूत. पण , तुम्ही शाळाची पायरी चढा. असा विचार करणारा माहोल तयार झाला. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलय. स्पर्धा प्रचंड आहे. स्पर्धा वाढली आहे. शिक्षणाला पर्याय नाही. मुलांच्या भवितव्याची नवी “उमेद” उराशी बाळगून, पालक धडपड करू पाहतोय.
प्राथमिक शिक्षण उद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पाया आहे. तो मजबूत व्हावा म्हणून, सरकारचा शिक्षण विभाग काम करतोय. नवीन शैक्षणिक धोरण आले आहे. नवा आकृतीबंध आलाय. दहा, दोन ,तीन [ पहिले ते दहावी, अकरावी ,बारावी , तेरावी, चौदावी, पंधरावी – म्हणजे पदवी ] हा आकृतीबंध कालबाह्य झालाय. वय वर्ष सहा पर्यंत च्या मुलांना समोर ठेवून, नवा आकृतीबंध तयार झाला आहे. तोच प्राथमिक शिक्षणाचा केंद्र बिंदू आहे.
नवा दृष्टिकोन ठेवून, नवीन शैक्षणिक धोरणात चिंतनशील बदल झाले आहेत. पाच, तीन, तीन आणि चार, असा नवा आकृतीबंध आखण्यात आला आहे. बालकांचा विकास कोवळ्या वयात होतो. हे मानसशास्त्रीय तत्व जगाला पटू लागले आहे.
त्यामुळे, प्राथमिक शिक्षणाची नवी वीट तयार करण्यात आली आहे.1986 चे शैक्षणिक धोरण लक्षात घेऊनच, 2021 चे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थ्यी सीबीएसई [ सेंटर बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन ] अभ्यासक्रमाचे धडे गिरवणार आहे. चाहुल भविष्याची आहे. आज पडलेल्या पहिल्या पावलांना बळ मिळू दे, त्यांच्या
शैक्षणिक पाऊलवाटेवर ज्ञानदीप उजळू दे..!
सुभाष सुतार
पत्रकार गेवराई-बीड






