गेवराई -बीड –
छत्रपती मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी लि. गेवराई येथील शाखेत डिपॉझिट म्हणून ठेवलेली नऊ लाखाची रक्कम देण्यास बॅन्केने टाळाटाळ केल्याने, खळेगाव ता. गेवराई येथील सुरेश आत्माराम जाधव [ वय वर्ष 45 ] यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या दारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार ता. 18 रोजी घडली आहे. सदरील घटनेने खळबळ उडाली असून, बॅन्केचे चेअरमन संतोष भंडारी यांच्या विरूद्ध
गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरेश जाधव बॅन्केत चकरा मारून पैशाची मागणी करत होते. मात्र, बॅन्केने त्यांचे पैसे दिले नाही. जाधव व त्यांची पत्नी दि. मंगळवार ता. 17 रोजी गेवराई येथील शाखेत येऊन थांबले होते. मात्र, सुरेश जाधव यांना मानसिक त्रास सहन न झाल्याने, मध्यरात्रीनंतर त्यांनी बॅन्केच्या दारातच गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी ता. 18 रोजी सकाळी घटना उघडकीस आल्याने, एकच खळबळ उडाली. दरम्यान, जाधव यांच्या पत्नी कविता सुरेश जाधव यांनी गेवराई पोलिसात तक्रार दाखल केली असून, चेअरमन संतोष भंडारी यांच्या विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी सन – 2020 पासून एकुण 11 लाख 50 हजार रु मुदत ठेव म्हणुन छत्रपती मल्टीस्टेट शाखा गेवराई ठेवलेले आहेत. मागील दोन वर्षापासुन आम्ही वारंवार आमची ठेव परत द्या, अशी विनंती करीत होतो. परंतू , ते आम्हाला पैसे परत देत नव्हते. आम्हाला आज देतो, उदया देतो असे म्हणून टाळाटाळ करीत होते. सहा महीण्यापुर्वी माझे पती सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट मध्ये आत्महत्या करण्यासाठी विषारी औषधाची बॉटल घेवुन गेले होते. संतोष भंडारी यांनी आम्हाला आमचे 2 लाख 50 हजार रुपये परत दिले होते. उर्वरीत 9 लाख रु पुढील दोन महिण्यात देतो, आश्वासन बॅन्केने दिले होते. आम्ही वारंवार छत्रपती मल्टीस्टेट शाखा गेवराई येथे जावुन पैशाची मागणी केली. आम्हाला पैसे परत दिले नाही. त्यामुळे, माझे पती सुरेश जाधव खुप तणावात होते. पैसे मिळत नसल्याने आमच्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची गरज होती. दिनांक 17.06.2025 रोजी दिवस भर छत्रपती मल्टीस्टेट शाखा गेवराई येथे पैसे मागण्यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांसह थांबलो होतो. शाखेचे मॅनेजर क्षिरसागर यांनी आम्हाला दिवस भर पैसे दिले नाहीत. माझे पती सुरेश जाधव यांना अर्वाच्च भाषेत बोलुन बाहेर काढुन दिले. मी तिथेच थांबले असतांना, त्या ठिकाणी
एक दारु पिणारा माणुस त्रास देवू लागल्याने, माझे पती सुरेश जाधव हे मुलांना घेवुन घरी गेले होते. मी बॅन्केत थांबले, त्यावेळी सोबत संभाजीनगर येथील दोन महिला तनया कुलकर्णी व प्रतिक्षा कुलकर्णी हया सुध्दा पैसे घेण्यासाठी शाखेतच थांबल्या होत्या. माझे पती सुरेश जाधव यांना मी फोन करुन मुलांसोबत घरी थांबण्यास सांगितले होते.
18.06.2025 रोजी सकाळी 03.00 वाजण्याच्या सुमारास छत्रपती मल्टीस्टेट बॅन्केचे शटर वाजविण्याचा आवाज आल्याने आम्ही उठुन बाहेर आलो. तिथे आम्हाला पोलीस दिसले. त्यावेळी शाखेच्या समोर लोखंडी अँगलला माझे पती सुरेश आत्माराम जाधव यांनी दोरीच्या सहायाने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेला छत्रपती मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीचे चेअरमन संतोष भंडारी जबाबदार आहेत. असे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, गेवराई पोलीसांनी मयत सुरेश जाधव यांच्या पत्नी कविता जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. घटनेने खळबळ उडाली असून, पतसंस्था, मल्टीस्टेट च्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे राहीले आहे. गेवराई शहर व ग्रामीण भागातील आणखी काही पतसंस्था, मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीच्या शाखा डबघाईस आल्याची चर्चा आहे.






