तीन वर्षांपासून योगाचे धडे

गेवराई -बीड :
धावपळीच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी शारिरीक, मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. योगाच्या बळावर महिलांचे आरोग्य संतुलित राहते. म्हणून, योग महिलांसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिजामाता योगा ग्रुपच्या संचालिका सौ. गिता भाभी पवार यांनी बोलताना केले. शनिवार ता. 21 रोजी सकाळी पाच ते सात , या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 21 जून जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर, जिजामाता योग ग्रुपच्या वतीने
गेवराई येथील गजानन मंगल कार्यालयातील भव्य सभागृहात सकाळी पाच ते सात, या वेळेत योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी, बोलताना सौ. गिता भाभी पवार म्हणाल्या की, धावपळीचे आयुष्य झाले आहे.

काळानुरूप बदल झाल्याने, माणसांचे आयुष्य घडाळाच्या काट्यावर पळते आहे. धावपळीत आरोग्याकडे दूर्लक्ष होते. त्याचे दुष्परिणाम होतात. महिलांचे आरोग्य खूप महत्त्वाचे असून, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी योगा महत्त्वाचा आहे. महिलांचे मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर, महिलांनी आपल्या आरोग्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. त्यासाठी, नियमित व्यायाम, योगा आवश्यक आहे. जिजामाता योगा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळ्या महिला, तीन वर्षांपासून नियमित योगा करीत आहोत. आम्ही एकत्र आल्याने, विचाराची देवाणघेवाण झाली. बचत गटा सारखी आत्मनिर्भर चळवळ उभी करता आली. हे सामुहिक यश आहे. या व्यासपीठावर विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेता आला.
महिलांची आरोग्य तपासणी, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासून काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. महिलांनी एकत्र येऊन योगा ग्रुप तयार करावेत, त्या माध्यमातून बचत गट स्थापन करावेत. योगा मुळे महिलांचे आरोग्य चांगले राहते. त्या शिवाय, स्वावलंबनाचा मार्ग आयुष्यात अंत्यत गरजेचा असल्याचे ही, सौ. पवार यांनी शेवटी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग गुरु अनुसया मुनेश्वर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ ऋतुजा मुंढे या होत्या. गायकवाड सर व चाळक सर यांनी योगा बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल टकले सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नमाला नानी मोटे, माधुरी कुरकुटे यांच्यासह जिजामाता योगा ग्रुपच्या महिलांचे सहकार्य लाभले.






