गेवराई -बीड :
येथील इरा पब्लिक स्कूल ने आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या वेशभूषेत शहरातून दिंडी काढली. यावेळी विठू नामाच्या गजराने गेवराई शहर दुमदुमले होते. इरा पब्लिक स्कूलच्या या उपक्रमाने शहरात पंढरपूर अवतरले. भक्तांनी विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतील कलेचे कौतुक करून, मनोभावे हात जोडले.
गेवराई शहरातील विद्यार्थ्यांना सर्व सण, उत्सवांचा परिचय व्हावा, आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ टिकून राहावी म्हणून सर्व उपक्रम साजरे केले जातात. रविवारी इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याची दिंडी काढली. गेवराई नगर परिषद च्या प्रांगणात सकाळीच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी जमा झाले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गणेश क्षीरसागर व प्राचार्या वर्षा क्षीरसागर यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी ची पूजा करून विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. विठ्ठल नामाचा गजर करणारे दोन नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. तर एका ताला सुरात विद्यार्थ्यानी सादर केलेला हरिपाठ दिंडी चे मुख्य आकर्षण ठरले. यानंतर
विठ्ठल नामाचा गजर करत शहरातील मिरवणूक मार्गाने दिंडी काढण्यात आली. कोणी अभंग तर कोणी गवळण घेतली. विद्यार्थ्यांनी फुगडी , पावली आणि रिंगणाचाही आनंद घेतला. टाळ, मृदंग व चिपळ्यांच्या आवाजाने गेवराई शहर दुमदुमून गेले होते. बाल गोपालाची दिंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी दिंडी चे स्वागत करून भाविकांनी पालखी चे दर्शन घेतले.






