साप शब्द नुसता उच्चारला तरी, उरात धडकी भरते. त्रेधातिरपीट उडते. क्षणात माणसे सैरभैर पळातला लागतात. नागराजांची एवढी भिती वाटणे स्वाभाविकच आहे. विषारी साप चावल्याने मृत्युची गाठ पडते. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले की, माणसाचा जीव वाचतो. तेवढ्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. तरीही, माणसांचा जीव जातो. हे वास्तव आहे. वास्तविक पाहता, बिन विषारी सापांची संख्या सर्वाधिक आहे. तरी ही, नागराजा विषयी प्रचंड भिती आहे. त्यामुळेच, वन्यजीवांचा आणि माणसांचा संघर्ष होत आलाय. या संघर्षांत सर्पमित्रांची भूमिका महत्त्वपूर्ण राहीली आहे. वन्यजीव आणि मानसाच्या लढाईत सर्पमित्र एक दुवा म्हणून उभा राहीला आहे. तो निष्काम कर्मयोग करणारा मध्यस्थ आहे. कोणत्याही, कसल्याही अपेक्षा शिवाय तो सापाला आणि माणसाला वाचवून, हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आलाय. तो, आणखी ॲक्टीव होईल. राज्य सरकारचे वनमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक चांगला निर्णय घेऊन, सर्पमित्रांचा सन्मान वाढविला आहे. उशिरा का होईना, राज्य सरकारने सर्पमित्रांची दखल घेतली. त्यांना दहा लाख रूपयाचे संरक्षण कवच बहाल केले आहे. त्यांच्या साठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. त्यावर, त्यांची अधिकृत नोंद होईल आणि त्यांना अत्यावश्यक सेवेचा मान दिला जाईल. ही, खूप आनंदाची गोष्ट आहे. यामुळे, सर्पमित्रांची अधिकृत माहिती वनविभागाच्या पोर्टलवर राहील. गरजूंना सर्पमित्रांशी संपर्क साधता येईल. या, निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल आणि वन्यजीव संरक्षणात त्यांचा सहभाग वाढेल.
सापांना वाचविण्याची मोठी जबाबदारी, सर्पमित्रांनी आजवर पार पाडली आहे. एका फोनवर ते हजर असतात. सामाजिक बांधिलकीतून ते काम करत आलेत. शंभर-दोनशे रुपये कुणी दिले तर दिले. नाहीतर, ते कुणाकडून ही एक पई घेत नाहीत. दिवस असो की रात्र, फोन आला की, पोहचलेच. जिवाची भिती न बाळगता सापाला शोधून काढतात. त्याला पकडतात आणि जंगलात सोडून देतात. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, समाजऋण शाश्वत सत्य आहे. या अर्थाने, सर्पमित्र निष्काम कर्मयोग करीत असतील तर, समाजाने त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक का पाहू नये ? त्यांना कमी लेखू नका. त्यांना मानसन्मान द्या. आपुलकिने वागा. गरज सरो, या भूमिकेतून माणसे वर्तणूक करतात. त्यांना अनेकदा वाईट अनुभव येतो. या संदर्भात, एका सर्पमित्राने
एक उदाहरण देऊन, समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवले. तो सांगत होता, पावसाचे दिवस होते. त्या दिवशी पाऊस पडत होता. रात्रीचा एक – दिड वाजला होता. तेवढ्यात फोन वाजला. गेवराई [ जि.बीड ] शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बागपिंपळगाव परिसरातून फोन आलेला होता. तेवढ्या रात्री सर्पमित्र स्वतःची रिक्क्षा घेऊन घटनास्थळी गेले. रेस्क्यू करून सापाला सुरक्षित पकडून, जंगलात सोडून दिले. नागरिकांनी सर्पमित्राला केवळ शाब्दिक शाबासकी दिली. तो सर्पमित्र काहीही न बोलता घरी आला. ही मानसिक, सामाजिक विकृती आहे.
शहरात आणि ग्रामीण भागात अनेक सर्प मित्र आहेत. ते सापांना अलगद पकडतात. थोडे इकडे-तिकडे झाले, तर त्यांना ही धोका निर्माण होतो. सर्पमित्रांचा जीव जाण्याची शक्यता असते. साप पकताना, अनेक सर्पमित्रांचा जीव गेला आहे. आपल्या मुलांनी साप पकडण्याच्या भानगडीत पडू नये, ही तक्रार त्यांच्या घराघरात आहे. तरीही, तो आपले कर्तव्य पार पाडत आलात.
जगभरात सापांच्या अडीच हजार जाती आढळतात. महाराष्ट्रात सर्वसाधारण बावन्न जाती आहेत. त्या पैकी केवळ 12 जाती विषारी आहेत. हे समजून घेण्याची गरज आहे.
साप पाण्यात, जमीनीवर आढळून येतात. गोड्या पाण्यातील साप बिन विषारी असतात. धामण जातीचा साप सहसा चावत नाही. ती बिनविषारी असते. धामण सारखा भित्रा वन्यजीव नाही. या गोष्टी समाजात पोहचल्या पाहिजेत.
खर म्हणजे, वन्यजीवांशी मानवी संघर्ष, नेहमीच होत आला आहे. अधिकचा धोका नको म्हणून सापांना ठार मारले जाते. वास्तविक पाहता, तो शेतकर्यांचा मित्र आहे. अनेक शेतकरी सापांना मारत नाहीत. सापा विषयी समज-गैरसमज आहेत. तो डूक धरतो. तो वैर धरतो, चावून बदला घेतो. अशा समजूती अजूनही समाजात कायम आहेत. वन विभाग आणि मानवात जनसंपर्काचा अभाव होता. या निर्णयाने, सर्पमित्र, मानव आणि वन विभाग एकत्रित येईल, त्यांच्यातला संवाद वन्यजीवांसाठी गूड न्यूज आहे. समज-गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. साप कधीच जाणीवपूर्वक चावा घेत नाही. तो स्वतःच भित्रा वन्यजीव आहे. अचानक पाय पडला, त्याला चुकून धक्का लागला तर तो स्वसंरक्षणार्थ दंश करण्याची शक्यता असते. त्याचा, तो गुणधर्म आहे. असे असले तरी, माणूस चमत्कारिक वल्ली आहे. स्वतःच्या स्वभावातली वैशिष्ट्य, त्याने सापांवर लादली. बिचारा मुका साप बदनाम झाला. त्याला बोलता येत नाही. ही त्याची डावी बाजू आहे. सापाच्या औलादीचा, सापाची औलाद, अस्तिन मे सांप किंवा इतक्या दिवस सापाला दुध पाजले. अशी कित्येक विशेषणे लावून माणूस मोकळा झाला आहे. असो, वन्यजीव आणि मानसाच्या लढाईत सर्पमित्र एक दुवा म्हणून उभा राहीला आहे. तो निष्काम कर्मयोग करणारा मध्यस्थ आहे. कोणत्याही, कसल्याही अपेक्षा शिवाय तो सापाला आणि माणसाला वाचवून, हा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आलाय. तो, आणखी ॲक्टीव होईल. राज्य सरकारचे वनमंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक चांगला निर्णय घेऊन, सर्पमित्रांचा सन्मान वाढविला आहे. उशिरा का होईना, राज्य सरकारने सर्पमित्रांची दखल घेतली. त्यांना दहा लाख रूपयाचे संरक्षण कवच बहाल केले आहे. राज्य सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. सर्पमित्रांना या निर्णयाने आधार मिळेल. संत गाडगेबाबा यांनी सांगितलय, मुक्या प्राण्यांना अभय द्या..!
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई-बीड






