गेवराई – बीड : : शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर असा उपक्रम असून, गोरगरीब विद्यार्थ्यांना नवी उर्जा देणाराआहे. सामाजिक कार्यात सक्रिय राहून, शालेय साहित्य वाटपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानदीप पेटवून, गुरू आनंद महिला प्रतिष्ठानने सामाजिक भान राखले आहे. अशा स्तुत्य उपक्रमाला समाजाने तन मन धनाने हातभार लावला पाहिजे. असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी संजय मोरे यांनी येथे बोलताना केले आहे.
मंगळवार ता. 12 रोजी गेवराई येथील जिल्हा परिषद शाळेत, गुरू आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
गुरू आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई शहरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना
मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी संजय मोरे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती सीमाताई ओस्तवाल मुख्याध्यापक राजकुमार पोपळघट,
कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू सोळुंके ,पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर ज्येष्ठ पत्रकार विनोद नरसाळे, पञकार अँड.हारूण शेख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बापूसाहेब तारुकर सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी गेवराई शहरातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. सर्व
शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण 50 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गुरू आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन च्या वतीने तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शाळांना जवळपास एक कोटी रुपयांची शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. समाजातील मागास घटकातील मुले शैक्षणिक प्रवाहात यावीत ती टिकावीत व जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. विष्णू सोळुंके, राजकुमार पोपळघट , शिवाजी झेंडेकर यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
श्रीमती सीमाताई ओस्तवाल यांनी सांगितले की, सामाजिक कार्य आपली बांधिलकी आहे. गोरगरीब घटकांना होईल तेवढी मदत करत आलो आहोत. या पुढे ही, हा उपक्रम सुरूच राहणार आहे. पंधरा वर्षापासून जिल्ह्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना काळात धान्य किराणा वाटप तसेच दुष्काळग्रस्तांना मदत अशा प्रकारचे उपक्रम प्रतिष्ठानने राबविले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या प्रतिष्ठानने शैक्षणिक साहित्य वाटप केल्याचे त्यांनी सांगितले तसेच येणाऱ्या काळातही ही चळवळ अशीच चालू राहील अशा प्रकारची ग्वाही दिली. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हा परिषदच्या सर्व शाळातील मुले ही गरजवंत व गरीब परिस्थितीतील आहेत. विद्यार्थ्यांनी देखील सीमाताई यांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हा परिषद जायकवाडी वसाहत गेवराई या केंद्रातील सर्व शिक्षक बंधू , भगिनी , विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कवियत्री राजश्री मिसाळ मॅडम, श्रीमती केशर शिंदे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीमती मयुरी भंडारे यांनी मानले.






