गेवराई – बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी चौकात दोन गटाकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने, पोलिसांनी लाठीचार्ज करून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे, दोन गटातला मोठा अनर्थ ठळला. दरम्यान, प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह दोन्ही गटातील 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गेवराई शहरात शांतता आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी बॅनल लावल्याने, प्रा. हाके यांनी आमदार पंडित यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रा. हाके यांचा पुतळा जाळून निषेध केला. त्यामुळे, दोन्ही गट आमने सामने आले. मंगळवारी ता. 25 रोजी प्रा. हाके आणि आमदार पंडित यांच्या समर्थक एकमेकासमोर आले. जोरदार घोषणाबाजी झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, प्रा. हाके यांनी बायपास मार्गे बीडकडे जावे, अशी सूचना गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण बांगर यांनी केली होती. मात्र, गेवराई शहरातील शास्त्री चौकात चहा घेऊन जातो,अशी ताठर भूमिका घेतल्याने, दुपारी चार- पाचच्या दरम्यान दोन्ही गट, छत्रपती शिवाजी चौकात आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते एकमेकांना आव्हान देऊ लागले. अचानक चप्पल, दगडफेक सुरू झाली. पोलीसांनी आक्रमक भूमिका घेऊन, सौम्य लाठीचार्ज केल्याने, मोठा अनर्थ ठळला. पोलीस ठाणे गेवराई येथे गोपनीय शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार रामराव आघाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रा. हाके यांना कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव गेवराईत प्रवेश न करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करत हाके व त्यांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दगडफेकीत एक दोन दगड हाके यांच्या गाडीच्या दिशेने आले. एकाने भिरकावलेली चप्पल प्रा. हाके यांच्या जवळून गेली. पोलीसांनी व कार्यकर्त्यांनी हाके यांना सुरक्षित बाहेर काढले.
या प्रकरणी प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 190, 191(2), 191(3), 285, 223, 352 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर करत आहेत.






