गेवराई – बीड : गेवराई तालुक्यातील मौजे कानडा पिंपळा येथील एक वयोवृद्ध शेतकी संदीपान रामकिसन ढोरमारे सिंधफणा नदी पात्रात वाहुन गेल्याची माहिती आहे. दरम्यान, गेवराई तहसील प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस व महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी नदी पात्रात वाहून गेलेल्या शेतकर्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, गेवराई तालुक्यातील हिरापूर जवळून वाहणारी सिंदफणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित शेतकर्यांचा शोध घेण्या संदर्भात
सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती उपसरपंच इलियास पटेल यांनी दिली असून, ते म्हणाले की ; संदीपान ढोरमारे हे आपल्या शेतात जाण्याठी सकाळी साडे अकरा वाजता निघाले होते. नदीपात्रातून जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे, दुथडी भरून वाहणार्या सिंदफणा नदीपात्रातील धारेत ते वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने त्यांचा शोध घेण्यात आला आहे. परंतु, त्यांचा शोध लागला नाही. अंधार पडल्यावर शोधकार्य थांबवण्यात आले असून,एनडीआरएफ चे आणखी एक पथक गुरूवार ता. 4 रोजी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे उशिरापर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते.






