विष्णुपंत साहेबराव बेदरे पाटील उर्फ जिजा [ वय वर्ष 78 ] यांची एक्झिट अचानक लागलेला चुटका आहे. दोन दिवसा आधी, त्यांनी शहरातल्या गजबजलेल्या शास्त्री चौकात येऊन अनेकांशी संवाद साधला, हितगुज करून चहा घेतला. मात्र, दुसर्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी समजली.
ते चालता-बोलता आनंदाने गेले. मुलंबाळ मोठी झाली. त्यांचा वेल मांडवावर गेल्याचं समाधान त्यांना लाभले. आयुष्याच्या वाटेत, कधी ही मोहाच्या बागेत ढुंकून ही न पाहता, आपल्या वाट्याला आलेले कर्म इनामदारीने करत राहणारे, जिजा चटका लावून गेले. अशा, माणसांचा मृत्यू एका अर्थाने आनंद सोहळाच म्हणता येईल.
तत्कालीन जिल्हाधिकारी तथा थोर विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी मृत्युच्या संदर्भात, ज्ञानोबा माऊलींचा
फार सुंदर असा दाखला दिलाय. ज्ञानोबा माऊली म्हणायचे, का झाकलिया घटीचा दिवा..! म्हणजेच, एखादा घट असावा, आत मध्ये दिवा असावा आणि तो सहज विझावा, या पद्धतीने, मृत्यू व्हावा.
अगदी तसेच झाले. बुधवारी [3 सप्टेंबर] सकाळी आठ वाजता दै. सामानाचे पत्रकार प्रदीप नाना जोशी यांचा फोन आला. नाना म्हणाले, बेदरे जिजा गेले. त्यांना र्हृदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. अरे यार…! एवढा एक शब्द पडला. जिजा,असे अचानक गेल्याने हुरहूर लागली.
विष्णुपंत साहेबराव बेदरे , हे गेवराई शहरातील मोठे घराणे. त्यांना जिजा नावाने ओळख मिळाली. बेदरे आणि पवार [गेवराई चे पाटील] यांच्या कुटुंबाचे आजोबा- पणजोबा पासूनचे ऋणानुबंध राहीले आहेत. हा वारसा अगदी चौथ्या-पाचव्या पिढीने पुढे जोपासला आहे. गेवराई नगर परिषदेत त्यांना नौकरीची संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचे सोने केले. अंगभूत गुणांच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वास्तविक पाहता, गेवराई शहरात बेदरे पाटलाचा आदरयुक्त दरारा होता. सधन कुटुंबातून असल्याने, त्यांना नौकरीची गरज ही नव्हती. परंतु, माजी आमदार माधवराव पवार कुटुंबाचा स्नेह राहील्याने त्यांनी नौकरी करायचा निर्णय घेतला.
जिजा, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख होते. पाणी पुरवठा विभागातल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना त्यांनी जीव लावला. त्या कालखंडात नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना फार परफेक्ट नव्हती. कधी लाईट असायची, नसायची. अनेकदा टाकीत पाण्याचा खणखणाट असायचा. एक वेळ तर, शहरात अठ्ठावीस दिवस पाणी आले नव्हते. गोदापात्राच्या पाण्यावर गेवराई नगर परिषदेचा पाणी पुरवठा अवलंबून होता. पाणी पट्टी थकलेली असायची. शेजारचा समर्थ सहकारी कारखाना जमेची बाजू होती. टोपे साहेबाच्या कारखान्याने पाणी पट्टी भरल्यावर गोदापात्रात पाणी यायचे. त्या पाण्याचा गेवराईकरांना फायदा व्हायचा. एवढ्या कठीण कालखंडात, विष्णुपंत बेदरे यांनी गेवराई शहरातील प्रत्येक वॉर्डातील जनतेशी समंजस पणा दाखवून सुसंवाद ठेवला होता. कधी कुणाशी वादविवाद घातला नाही. कोणी किती ही, रागात येऊद्या; आवाज चढवून बोलू द्या, जिजा अंत्यत संयम ठेवून बोलायचे. हे पहा, आज पाणी आलय, दोन गल्ल्या झाल्यात. उद्या सकाळीच तुम्हाला पाणी सोडतो. कुणाच्या घरी लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम असेल तेव्हा नाममात्र शुल्क भरून अग्निशमन दलाची गाडीने पाणी पुरवठा करता यायचा. काही वेळा तेवढे पैसे ही नसायचे. कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा एखादा कार्यकर्ता
जिजाकडे जाऊन हक्काने विनंती करायचा. जिजा, ऐका ना, गरीब कुटुंबाचे लग्न आहे. पाणी पट्टी भरायचीच का ? एवढा एक प्रश्नवाचक शब्द बाहेर पडायच्या आत, ते कर्मचाऱ्यांना समजेल अशा भाषेत इशारा करायचे. पाणी धर्माला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहणारे जिजा अफलातून होते. गेवराई शहरातल्या प्रत्येक गल्ली, वार्डाची त्यांना माहिती होती. कुठे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. कुठे जास्तीचा उतार आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष देऊन ,पाणी पुरवठा करायचे. ते चोवीस तास अलर्ट असायचे. पाईप लाईन फुटायची तेव्हा जिजा आणि त्यांच्या टीमची कसोटीच असायची. रात्री-अपरात्री पाईप लाईन फुटायची तेव्हा त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागायचा. मात्र, त्यांनी कधी ही साधी तक्रार सुद्धा केली नाही. उलट, पाईप लाईन दुरूस्त करायच्या आधी, कामगारांना स्वतःच्या घरून, पिठल – भाकरी घेऊन जाण्याची बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. नगर परिषदेचे मुख्याधिकारी असूदेत की विद्यमान नगराध्यक्ष. या दोन्हींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता.
माणसे नावाने, पैशाने मोठी होत नसतात. त्यांच्यातले व्यक्तीत्व मोठे असते. तेच जिवंत माणसाचे लक्षण आहे. आखडुपणा त्यांना कधी शिवला नाही. अहंकार खूप लांबची गोष्ट राहीली.
जिजा सरळमार्गी होते. कधी आडपडदा नाही. कुणाशी कधी वैर नाही. त्यांच्या संदर्भात न विसरता येणारी एक छानशी आठवण आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. मी, बीड वरून गेवराई कडे येताना आमचे सहकारी मित्र, पत्रकार धनंजय बजगुडे यांची भेट घ्यावी म्हणून पाडळसिंगी येथे थांबलो. मात्र, ते बाहेर गावी असल्याने, गेवराई कडे जायला निघालो. एखादी रिक्षा आली म्हणजे जाता येईल, म्हणून उभा होतो. अचानक एक चार चाकी गाडी थांबली. गाडीतून कुणीतरी आवाज दिला. मला क्षणभर समजलेच नाही. जवळ जाऊन पाहिले तर जिजा बसलेले होते. त्यांचे चिरंजीव जगदीश बेदरे यांनी दरवाजा उघडला आणि मला गेवराईला घेऊन आले. ते कुटुंबासह लग्नाला गेले होते. त्यांनी मला पाहिले, मी एकटाच उन्हात उभा होतो. स्वतःहून गाडी उभी केली. मला आवाज देऊन बोलावले, गाडीत घेतले. मोठी माणसे अशी असतात. हा, सुखद अनुभव आहे.पांढरा शुभ्र लांबलचक शर्ट, जुन्या पद्धतीची पॅन्ट , डोक्यावर गांधी टोपी आणि भारदस्त आवाज, हे जिजाच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. निवृत्तीनंतर त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी शास्त्री चौकात मारुती मंदिरात दर्शन आणि नगर परिषदेच्या अवतीभवती त्यांचा वावर ठरलेला. पत्रकारांशी बोलायचे, ख्याली खुशाली विचारायचे. अधूनमधून भेट व्हायची. आमचा कौटुंबिक जिव्हाळा होता. काय सुभाषराव, बरय का ? तुमची फारशी भेट होत नसली तरी, वैद्य यांच्या पेपरात [ बीड राज्यकर्ता ]
तुमचे लेख वाचत असतो. ते खूप कौतुक करायचे. त्यांचा मोकळा ढाकळा स्वभाव होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. सेवा निवृत्तीनंतर ही, त्यांचे मार्गदर्शन घ्यायला नवी पिढी त्यांच्याकडे यायची. आता येणे नाही, जाणे. त्यांचा मृत्यू , त्यांच्या आयुष्याला लागलेला पूर्ण विराम आहे. आता, केवळ आठवणी आहेत. जिजा, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने नेहमीच लक्षात राहणार आहात. बहिणाबाई म्हणायच्या, देवा, असे कसे रे, तुझे तंतर-मंत्रर , जगणे मरणे एका श्वासाचे अंतर, जगणे मरणे एका श्वासाचे अंतर…! जिजा, भावपूर्ण आदरांजली.
सुभाष सुतार, पत्रकार,
गेवराई – बीड






