तिनं गायलेले उडत्या चालीचे, तुझ्या लेकराला पदरात घे गं येडा माई…! हे लोक भक्ती गीत सध्या चांगलच गाजतय. तिने मस्त गायलय. तिच्यावर कोणताही, कसलाही दिसत तणाव नाही. युवा महोत्सवाने एका गायिकेला जन्म दिलाय. सध्या, नवरात्र महोत्सव सुरू आहे. अनुजा नावाच्या नवोदित गायिकेने जणू भक्ती गीताची पहिली माळ आई जगदंबेच्या चरणावर अर्पण केली आहे.
कलागुण उपजत असतात. त्या कलेला, योग्य वेळी व्यासपीठ मिळाले पाहिजे. शाळा, महाविद्यालयाच्या स्तरावर स्नेहसंमेलन, युवा महोत्सवात संधी मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत, गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महोत्सवात र.भ. अट्टल महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थ्यीनी कु. अनुजा गणेश राऊत हिने एका सामुहिक गायनात भाग घेतला होता. त्या मध्ये अनुजाचा गोड आवाज प्रेक्षकांना भावला. अरे व्वाह, मस्त आवाज आहे. अशा उत्स्फूर्त प्रतिसादाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यानंतर, महाविद्यालयाच्याच दोन विद्यार्थ्यांनी अनुजाच्या आवाजातले एक भक्ती गीत कंम्पोज करून यूट्यूब वर टाकले आहे. लोकगीत प्रकारातले हे भक्ती गीत भन्नाट वाजतय आणि गाजतय..!
कु. अनुजा, मु. पो. जवळा मासापूर ता. जि.बीड येथील रहिवाशी आहेत. तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच झाले. शाळा स्तरावर पार पडलेल्या स्नेहसंमेलनात एकदा तिने गाणं गायले होते. त्यानंतर, तिला कधी मिळाली नाही. तिला गाणं आवडतं पण घरून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राऊत कुटुंब अल्पभूधारक आहे. शिकुन-सरवून नौकरीत करिअर करता आले तर बघ, अशी अपेक्षा तिच्याकडून केली जायची. त्यामुळे, अनुजाने पोलीस व्हायचे ठरवले. तशी तयारी सुरू केली. ती, र.भ.अट्टल महाविद्यालयात बीएस्सी द्वितीय वर्षाच्या वर्गात शिकत आहे. प्रल्हाद खेत्रे तिचे मामा आहेत. त्यांच्या कडे अनुजा शिकायला आली. उद्योग – व्यवसायासाठी तिचे आई-वडील सुद्धा गेवराई शहरात आले. त्यांची भगवान नगर भागात खानावळ [ मेस ] आहे. ज्या संस्थेच्या शाळेत, मी काही काळ अध्यापन केले. त्या, रेवकी – देवकी, ता. गेवराई जि.बीड येथील खंडोबा शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून अनुजा बारावी उत्तीर्ण झाली आहे.
र.भ. अट्टल महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक इंगळे सरांनी अनुजाला प्रोत्साहन दिले आहे. अनुजा, तुझा आवाज गोड आहे. थोड लक्ष दे, अशी सूचना केली. गीत गा रहे है हम, या भारतीय समूह गीतात तिला सहभाग घ्यायला लावले. माधुरी पंडित, सोनाली बहीर, जयश्री औटे, तनुजा नवले या विद्यार्थ्यीनींनी समूह गीतात सहभाग घेतला होता.
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, प्रेरणेने उर्जा मिळते. या अर्थाने, युवा महोत्सवात अनेक विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यांना आपली कला, एक कलावंत म्हणून सादर करता आली. खर म्हणजे, गाणं गळ्यातून येत असत. गाणं आवडू लागले की गाण्याची समज वाढत जाते. त्यातील बारकावे महत्त्वाचे असतात. कान तृप्त करणारा आवाज लोकांना भावतो. फार टेक्निकली भानगडीत न पडता ही, अनेक गायकांनी लोक गीताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर मोहिणी घातल्याचा इतिहास आहे. गायकीत रियाज, नेमक्या वेळी घेतलेला ठेका भाव खाऊन जातो. त्यामुळे, अनुजा सारख्या नवख्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. त्या दृष्टीने अभ्यास करता येईल. अलीकड्या काळात, सोशल माध्यमांने जगाचे लक्ष वेधले आहे. त्यातला चपखलपणा शोधता आला, म्हणजे आपल्या पाऊलवाटा उजळून निघायला वेळ लागत नाही. महाराष्ट्रातील रसिकांनी लोक कलेला नेहमीच राजाश्रय दिला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ लाभले. त्याचा योग्य उपयोग होत असल्याचे दिसते. ही चांगली गोष्ट आहे. अनुजा सारखी गुणी गायिका लाभावी, अशी आशा व्यक्त करता यायला वाव आहे. इतका तिचा गोड आवाज आहे. तिने गायलेले पाच मिनिट अकरा सेकंदाचे हे भक्ती गीत थिरकायला लावते. नवोदित कलावंत अमोल काबळे आणि दीपक लांडगे या जोड गोळीने हे गीत बसवलय. त्यांचे ही कौतुक आहे. कु. अनुजा राऊत हिने गायनातले बारकावे समजून घ्यावेत. मेहनत करावी. जिद्दीने पुढे जावे प्रेक्षक पाठिवर कौतुकाची थाप मारतील. संत तुकाराम महाराज म्हणायचे, करिता सायास कारण अभ्यास..!
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई-बीड






