छत्रपती संभाजीनगर – सिडको च्या मैदानावरच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, प्रशासनाला अनेकदा विनंत्या, अर्ज करूनही, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सिडको प्रशासन झोपेत राहून सोंग घेत असल्याने, ज्येष्ठ नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.
सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटरजवळच्या क्रिकेट ग्राऊंडवर, या परिसरातील ज्येष्ठ नागरिक सकाळ-संध्याकाळ व्यायाम व खेळासाठी मोठ्या संख्येने येतात. यात ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले यांचा सहभाग असतो. या मैदानात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव जाणवत असून स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
मैदानाच्या समोरच्या गेटजवळ असलेले स्वच्छतागृह पूर्णपणे अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झाले आहे. त्यावरचे छप्परही गायब झाले आहे. मागच्या गेटच्या बाहेर कोणतीही सुविधा नसल्याने चिखल व अस्वच्छतेचे वातावरण तयार झाले आहे. या ठिकाणी छोट्या पत्र्याच्या स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरले. त्याचा वापरच होत नाही. त्यामुळे मैदानात येणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
कम्युनिटी सेंटरजवळील मैदानाच्या समोरच्या गेटजवळ असलेल्या स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे पसरली दुर्गंधी
- प्रशासनाने दखल घ्यावी – महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी अजिबात सुविधा नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. वर्षानुवर्षे असा त्रास सोसावा लागत आहे. ह या संदर्भात आता पर्यंत कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. महानगर पालिकेच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी. अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक तथा येथील नागरिक विजय भोसले यांनी केली आहे.





