बीड : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी पाच कर्मचाऱ्यांना निलंबनाचा झटका दिला आहे. सोमवार ता. 6 रोजी निलंबनाचे आदेश निघाल्याची माहिती असून, मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले, तलाठी तुळशीराम बावस्कर, तलाठी गोविंद नरोटे यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य दोन नावे आहेत. त्यांची नावे समजली नाहीत.
गेवराई तालुक्यातील वळू घाटामध्ये वाळू माफियांचा नंगानाच चालू आहे याला खतपाणी घालण्याचे काम पोलीस व महसूल यांच्याकडून केले जाते हे वारंवार
समोर आले आहे. सोमवारी ता. 6 रोजी गोदापात्रात वाळू उत्खनन करणारे तस्कर आढळून आले. या संदर्भात, कर्तव्यात कसूर झाल्याचे दिसून आल्याने ,
जिल्हाधिकारी यांनी एक मंडळ अधिकारी व दोन तलाठी यांना निलंबित केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राक्षसभुवन येथील वाळू घाटाची पाहणी केली असता अशी आढळून आले की, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन झाले आहे. वाळूच्या उत्खननावर लक्ष ठेवणे ही मंडळ अधिकारी यांची प्राथमिक जबाबदारी असताना, सदरील जबाबदारी पार पाडण्यास अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. वाळू गस्त पथकावर हल्ला झाला याबाबत खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात मलीन झाली आहे. त्यामुळे, मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले, तलाठी तुळशीराम बावस्कर, तलाठी गोविंद नरोटे यांना तडकाफडकी जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे. या कारवाईने बीड जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.