त्यांचे शिक्षण जेमतेम नववी पर्यंत झाले आहे. घरातला एकुलता एक मुलगा म्हणून वडलांनी शेतीचा आग्रह धरल्याने, वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शेती करायला सुरुवात केली. पंचवीस वर्ष झाली ते शेतीत रमलेत. नुसते रमलेच नाहीत तर त्यांनी काळ्या आईची अशी काही ओटी भरली की, तिने दाभाडे कुटुंबाचा नावलौकिक केला. शेती संस्कृतीची पायवाट कायम राहील, यासाठी धडपड करणारा आणि काळ्या आईची ओटी भरणारा रियल हिरो म्हणून श्री. रामनाथ पांडुरंग दाभाडे, मुपो गेवराई जि.बीड, यांचा नावलौकिक झाला आहे. त्यांच्या पत्नी जयश्री रामनाथ दाभाडे यांनी अगदी पदर खोचून खंबीर साथ देऊन, शेतीत खऱ्या अर्थाने “राम” शोधला आहे.
रामनाथ दाभाडे यांची चिकाटी, मेहनत फळाला आली. काळी आई धन धान्य देई..! या अर्थाने शेतीला कष्टाने कोरून, शेतीत नवे मन्वंतर घडवून दाभाडे कुटुंबाने शेतकरी बापाचे नाव केले आहे. खर म्हणजे, त्यांना साक्षात “पांडुरंग” पावला आहे. दाभाडे कुटुंबाचा आदर्श घेऊन शेतकरी बाप स्वाभिमानाने नक्की उभा राहील. फक्त, त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. रामनाथ दाभाडे यांचा पंचवीस वर्षाचा शेतीतला प्रवास म्हणजे “मैलाचा दगड” आहे. त्यांचे शिक्षण किती, या पेक्षा त्यांचे शेतीतले कष्ट, त्यातुन आलेले अनुभव हिच त्यांची सर्वोच्च पात्रता आहे.
एक नोव्हेंबर 2022 रोजी दाभाडे यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. त्यांच्या घरी गेलो तर ते सकाळी आठ वाजता शेतावर गेले होते. त्यांचे थोरले चिरंजीव रवि दाभाडे यांनी चहा घ्यायचा आग्रह केला. परंतू , त्यांच्या बोलण्याकडे लक्षच गेले नाही. त्यांच्या टुमदार घराकडे पहाण्याचा मोह आवरता आला नाही. घरावर ठळक अक्षरात “पांडुरंग कृपा” लिहिलेले आहे. प्रचंड आत्मविश्वासाने, चिकाटाने आणि कष्टाने कोरून एका मेहनती शेतकर्याचे घर पाहून अनेकांना समाधान वाटेल.
गेवराई शहराचे ( ता. गेवराई जि.बीड) रहिवाशी असलेल्या दाभाडे कुटुंबाची शहरा जवळ पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर
वडिलोपार्जित पंचवीस एक्कर कोरडवाहू शेती आहे. आज रोजी ही कोरडवाहू सगळी शेती पाणीदार झाली आहे. रामनाथ पांडुरंग दाभाडे यांना पत्नी जयश्री, दोन मुले, सूना, नातलंड असा छोटेसा परिवार आहे. अमोल दाभाडे वकिली व्यवसायात आहे. ज्येष्ठ चिरंजीव रवि दाभाडे यांनी आपल्या मातीशी निगडित राहण्याचा निश्चय केला. त्यांच बीएस्सी पर्यंत शिक्षण झालय. सरकारी नौकरी मिळत असताना ही, त्यांनी शेती निवडली.
सौ. जयश्री रामनाथ दाभाडे यांचे ही शेतीसाठी योगदान आहे. शेतीच्या बांधावर जावून त्यांनी शेतीत कष्ट केलेत. त्या पाटील घराण्यातून आल्यात. दगडगाव ता. गेवराई जि.बीड येथे त्याच्या वाडवडिलांची शंभर एक्करावर शेती आहे.
शेती परवडत नाही. हा एक भाग आणि त्या शिवाय गत्यंतर नाही. हा झाला दुसरा भाग. जायचे कुठे आणि करायचे काय ? हा यक्ष प्रश्न उरतोच. म्हणून मग आपला गाव आणि आपली शेतीच बरी..! हे वास्तव दुर्लक्षित करता येत नाही. म्हणून, शेतीत नवे प्रयोग करून, शेती पुरक उद्योग करण्याची संधी आहे. ती संधी रामनाथ दाभाडे नावाच्या एका बहाद्दर शेतकर्यानी शोधली. शेतीला आकार दिला. हे सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणारे “सत्य” आहे. एखाद्याने फोन करून फळबागाची शेती करायची आहे. अस म्हणल्यावर, जेवणाचे ताट सोडून शेतीचा मंत्र सांगणारा हा सरळ साधा, संवेदनशील माणुस किती मोठा ठरतो. हे तुम्हीच ठरवायचे आहे.
रामनाथ दाभाडे यांनी 26 जुलै 2018 साली साडे बारा एकरावर सीताफळाची लागवड केली. फळबाग शेतीचे मार्गदर्शन तर घेतलेच , त्याशिवाय मराठवाड्यातल्या सतरा-अठरा फळबाग पाहिल्या. नवी वाट तुडवून ,या वैखरीच्या वाटेवरून जायचा पक्का विचार केला. संत तुकाराम महाराज म्हणायचे, माणसाची कर्म कौशल्य आणि परिश्रमाला न्याय देणारी “काळी आई”, कर्तबगारी सिद्ध करण्याची संधी देते. दाभाडे यांनी तिनशे, तिनशे क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले आहे. परंतु , कामगारांची वाणवा, नेहमीच अडचण निर्माण करायची म्हणून मग त्यांनी दुसरा पर्याय शोधून फळबाग शेतीकडे लक्ष दिले. पंचवीस एक्कर शेती पैकी साडेबारा एक्कर सीताफळ, सहा एक्कर मोसंबीची झाडे बहरू लागलीत. दाभाडे यांना
सुरूवातीच्या काळात खूप मेहनत घ्यावी लागली. नियोजन करून बाग सांभाळली आहे. झाडांना अगदी लेकरासारखा झाडांना जीव लावला. सुरूवातीला तसा त्रासच झाला. हे सांगतांना त्यांनी स्व अनुभव सांगितला. झाडे लावली त्या वेळची गोष्ट आहे. एका हंगामात पाणीटंचाई होती. उन्हाळ्यात झाडांना इजा होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत होतो. एकदा, दुपारच्या वळेत ठिबक द्वारे पाणी देत होतो. अचानक ठिबकचा पाईप निसटला…जसा पाईप निसटला तसा वरमावरून ढांगा टाकीत पळत सुटलो…अन पळता-पळता ठिबकच्या पाईप मध्ये अडकून धाडकन आपटलो…पून्हा तसाच धडपडून उठलो…पून्हा जोरात पळालो. निघालेला पाईप बंद केल्यावर हाता पायाला काही लागले आहे का ते पाहिले. पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य आणि पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा अनुभव, ते सांगत असतात.
2018 साली सीताफळीचा प्लाॅट तयार केला. फळबाग लागवड झाल्यावर तिसऱ्या वर्षी झाडे बहरत गेली. फुले, फळे आली. झाडे डौलदार दिसू लागली. झाडांना तरतरी आली. कष्टाला फळे लागल्याचा फिल खूप वेगळा असते. त्या सुखाला लांबी-रूंदी नसते. साडेबारा एक्कर शेतजमिनीत बेचाळीस टन सीताफळे निघाली. दाभाडे कुटुंबाच्या हाती “काळ्या आईने” चोवीस लाख रुपये ठेवले.
या वर्षीचा ( नोव्हेंबर 2022) बाग ही जबरदस्त आलाय.
साडेबारा एक्करचा सगळा परिसर दुचाकीवरून पाहता येतो. ही सगळी हिरवीगार, फळांनी बहरलेली बाग दाभाडे यांनी दाखवली. फळांना इजा करणारी माशी कैद करणारे डब्बे जागो जागो बसवले आहेत. साधी गवताची काडी शोधून सापडत नाही. एवढा परिसर नीटनाटका केला आहे. जीवामृत तयार करण्यासाठी उतारावर सिमेंटच्या टाक्या जागोजाग बसवल्या आहेत. शेताच्या बांधावर एक ओढा आहे. त्याची लांबी- रूंदी वाढविली आहे. त्याचा फायदा झाला. बोअर, विहिरीत पाणी वाढले. या परिसरात चार तास कसे गेले कळले नाही. रामनाथ दाभाडे यांना या विषयावर बोलते केले. तेव्हा ते सांगत होते. जवळपास पंचवीस एक्कर शेती सेंद्रिय खताच्या आधाराने उभी केली आहे. जिवामृत आणि शेणखत, या शिवाय कोणत्याही प्रकराचे रासायनिक पदार्थ झाडांसाठी वापरले नाहीत. पारंपरिक खतांचा वापर केला आहे. शेतात दोन गडी आहेत. शेत मशागत करायला महिला मजुरांचा राबता असतो. यंदाचा हंगाम सुगीचे दिवस दाखवणारा आहे.
या वर्षी जवळपास सत्तर – पंच्याहत्तर टन फळे निघतील. चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. एका झाडाला साठ-पासष्ट फळे आहेत. फळांचा आकार गेल्या वेळे पेक्षा मोठा आहे. हा सगळा शेणखत आणि जीवामृतचा चमत्कार असल्याचा उल्लेख ते करतात.
त्यांची स्वतःची काही गणिते आहेत. नियोजन करून कोणतेही काम करता येईल. पण, ते न करता ही शेतीत थोड थोड करायचा निश्चय केला की, अडचणी समोर येतात. प्रश्न निर्माण होतात. त्याकडे आव्हान म्हणून पहायचे. कोणतीही अडचण सोडविता येते. त्याकडे संधी म्हणून बघायची गरज असते. हतबल व्हायचे नाही. प्रश्न उभा राहत असेल तर मग उत्तर ही असेलच ना ? असा त्यांचा रोकडा सवाल असतो. सरळ साधे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. साधी राहणी आहे. कसलाही अहंकार नाही. त्यामुळे, खूप माणसे त्यांनी जोडली आहेत. गेवराई जि.बीड परिसरातील शेतकरी समृद्ध व्हावा, शेती संस्कृतीला बळकटी यावी,
असा शुद्ध हेतू ठेवून मैत्री सांभाळणारा त्यांचा स्वभाव त्यांची भेट झाल्यावर लक्षात येतो. कोणत्याही माणसाला अंतर्मुख व्हावे आणि त्यांचा हेवा वाटेल, असे हे व्यक्तिमत्त्व आहे. रामनाथ पांडुरंग दाभाडे यांना व त्यांच्या कष्टाळू कुटुंबाला मानाचा मुजरा, सॅल्युट..!
काही गोष्टी शक्य तितक्या सोप्या करता येतील का, या दृष्टिकोनातून त्याकडे आपणाला पहाता आले पाहिजे. असा सरळ, साधा आणि सोपा सिद्धांत आईन्स्टाईन यांनी मांडलाय. बघा, पटतोय का..?
सुभाष सुतार , पत्रकार
बीड