बीड – अचानक आलेल्या किल्लारी भूकंपाच्या भयंकर संकटाचा सामना करताना आलेल्या आठवणी मनःपटलावर पून्हा एकदा उमटल्या. निमित्त होते, भान तरुणाईच्या शिबिराचे ; मानवलोकचे अनिकेत लोहिया यांनी किल्लारी येथील भुकंपाच्या आठवणी तरुणाई समोर जशाच्या तशा उभ्या केल्याने, अंगावर रोमांच उभे राहीले.
गेवराई जि.बीड येथील बालग्राम परिवाराच्या वतीने आयोजित भान तरुणाईचे या शिबिराचा उद्घाटन सोहळा शनिवार ता. 11 रोजी
मानवलोकचे अनिकेत लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी, लोहिया यांनी बाबा आमटेंची भारत जोडो यात्रा, किल्लारीचा भूकंप, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.
गेवराई येथील आई संस्था संचलित बालग्राम परिवाराच्यावतीने दरवर्षी भान तरुणाईचे या शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिबिराचे हे दशकपूर्ती वर्ष आहे.
शनिवारी सकाळी अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेचे
अनिकेत लोहिया यांच्या हस्ते पृथ्वीच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन झाले. पाच दिवसांच्या या निवासी शिबिरात विविध जिल्ह्यातील १३० हून अधिक तरुण, तरुणी सहभागी झाले आहेत. प्रारंभी बालग्रामचे संतोष गर्जे यांनी शिबिराची पार्श्वभूमी, उद्देश स्पष्ट केला.
अनिकेत लोहिया यांनी उपस्थितांसमोर आपला जीवन प्रवास मांडला. गतकाळातील अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. डॉ. द्वारकादास लोहिया उर्फ बाबूजी आणि शैला लोहिया अशा प्रगल्भ दाम्पत्याच्या पोटी जन्म मिळाल्याने अनेक दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला. आईच्या पदराला धरून अवघ्या बाराव्या वर्षी महामानव बाबा आमटे यांच्या श्रम संस्कार शिबिरात सहभागी होता आल्याचे सांगून पुढे फक्त सोळा वर्षांचा असताना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत बाबांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेतही गेल्याचे लोहिया यांनी म्हटले. जम्मू काश्मीर आणि पंजाब पेटले होते. सर्वत्र अशांतता निर्माण झाली होती. अशा नाजूक परिस्थितीत बाबांनी मोठ्या धैर्याने भारत जोडो यात्रा काढून शांतता स्थापित करण्यासाठी फार मोठे योगदान दिले. तेव्हा निघालेली भारत जोडो यात्रा आणि त्यातील स्वतःचा सहभाग या गोष्टींचे मोल अधिक वाटू लागल्याची भावना लोहिया यांनी व्यक्त केली. यात्रेदरम्यान पंजाबमध्ये अनुभवलेले काही चित्तथरारक प्रसंग व दिग्गज व्यक्तींना जवळून पाहता आले, अशी भावना लोहिया यांनी व्यक्त केली.
१९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपात मानवलोक संस्थेने फार मोलाचे मदत कार्य केले. आपण स्वतः सहा महिने राहील्याचे सांगून, भूकंपातील काही करून प्रसंग सांगितले. या आठवणीने उपस्थितांची मने हेलावून गेली. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सोबतच लोहिया यांनी आपले बालपण, शिक्षण, शेतीतील प्रयोग, पाणी चळवळ अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले.
शिबिराचा समारोप येत्या बुधवारी (दि.१५) असून दरम्यान ममताताई सिंधुताई सपकाळ, विनय सिंधुताई सपकाळ, अभिनेत्री गौरी देशपांडे, प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती आदी मान्यवर शिबिरार्थिंशी संवाद साधणार आहेत.