बीड – गेवराई :
येथील संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दि.१४ जानेवारी पासून कीर्तन महोत्सवास प्रारंभ होत असून यावर्षीचा हा द्वी-दशक भव्य कीर्तन महोत्सव श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ, नगरपरिषद सर्व्हे.नं.६३ च्या सहन जागेवर होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.
समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाने भव्य कीर्तन महोत्सवाचा आज प्रारंभ होणार आहे. भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
वै.गुरुवर्य संत भगवानबाबा व वै. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानतर्फे मागील १९ वर्षांपासून भव्य-दिव्य अशा कीर्तन महोत्सवाचे नियोजनबद्ध आयोजन केले जात आहे. यामध्ये सर्व जाती धर्मातील भाविकांचा लक्षणीय सहभाग असतो. यावर्षीच्या कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ मंगळवार दि.१४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा.कलश पुजन व सायंकाळी ७ वा.दीपप्रज्वलन करुन ह.भ.प. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. रोज रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तने होणार आहेत. बुधवार दि.१५ रोजी पुणे विद्यापीठचे गोल्ड मेडलिस्ट ह.भ.प.प्रा.डॉ. प्रशांत महाराज ठाकरे, गुरुवार दि.१६ ह.भ.प. अंकिता ताई घुले, शुक्रवार दि.१७ विनोदाचार्य ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, शनिवार दि.१८ रामायणाचार्य ह.भ.प.उद्धव महाराज चोले, रविवार दि.१९ श्री क्षेत्र सिद्धेश्वर संस्थान, शिरूर (का.) चे मठाधिपती ह.भ.प. स्वामी विवेकानंद शास्त्री, सोमवार दि.२० परभणी येथील ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, मंगळवार दि.२१ आळंदी येथील विद्यावाचस्पती डॉ.श्री.रविदासजी महाराज शिरसाठ तर बुधवार दि.२२ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत दुर्गाशक्तीगड, भिलवडे चे मठाधिपती ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल व नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.भव्य कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, संत महंत तसेच गायक – वादक, टाळकरी हार्मोनियम वादक, विणेकरी, चोपदार आदि गुणीजन वृंद उपस्थित राहणार आहेत.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, सचिव तथा जेष्ठ पत्रकार शिवाजी मामा ढाकणे यांच्या सह प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.