बीड – गेवराई :
शासनाकडून अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. ज्यांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होतो. अनेक योजनांमार्फत आर्थिक मदत मिळत असल्याने नागरिकांमध्ये समाधान देखील व्यक्त होत आहे. त्यामुळे आजकाल बांधकाम कामगार योजना खूपच जोर धरू लागली आहे. दरम्यान याच कामगार गर्दीचा फायदा घेत बीड येथील कामगार सुविधा केंद्रात कामगारांची सर्रासपणे लूट होत असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. शिवाजी धांडे नगर, रेणू हॉस्पिटल समोर, बार्शी रोड या कार्यालयातील कर्मचारी कामगारांची कामे न करता नियुक्त केलेल्या एजंटामार्फत कामे करुन त्यांच्याकडून कमिशन घेतात. त्यामुळे एजंट कामगारांची दिवसाढवळ्या लूट करत असल्याची तक्रार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कामगारांनी नोंदणी केल्यास त्यांना विविध योजनेचा लाभ मिळतो. त्यांच्या मुलांसाठी शिक्षण, आरोग्य अशा कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, यामध्ये बांधकाम कार्यालयातील कर्मचारी तसेच त्यांचे खाजगी नियुक्त एजंट मालामाल होत असल्याचे चित्र आहे. या योजनांमध्ये सामान्य नागरिकांची आर्थिक लूट देखील होतानाचे चित्र दिसत आहे. बीड शहरातील शिवाजी धांडे नगर, रेणू हॉस्पिटल समोर, बार्शी रोड या कार्यालय या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी खूपच गर्दी होत आहे. एक रुपया शुल्क घेऊन शासनाकडे कामगार नोंदणीचा कायदा असताना येथील इन्चार्ज सुरेश चव्हाण व शिपाई सचिन गधळे यांचा काही एजंटांना हाताशी धरून गोरख धंदा तेजीत आला आहे. पैसे न दिल्यास हे कर्मचारी कामगारांना अर्वाच्य तसेच अरेरावी करत असल्याचे देखील सांगितले जाते. योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी २ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यत वसुली केली जात आहे. त्यामुळे याठिकाणी कागदपत्रे रंगविण्यासाठी भ्रष्टाचार सुरू आहे. एक रुपयाऐवजी हजारो रुपये शुल्क आकारले जाते. जी आर्थिक मदत मिळते, त्यातील कमिशन देखील लाटले जाते. यामध्ये या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सामील आहे.
चौकट –
एजंटामार्फत काम, कामगारांची दिवसाढवळ्या लूट
कामगाराची नविन नोंदणी, नुतनीकरण, शैक्षणिक योजना, आर्थिक योजना, आरोग्य विषयक योजना अशा विविध योजनांचे अर्ज भरणे, अर्ज अपडेट करणे इत्यादी स्वरुपाचे संपूर्ण कामकाज विनाशुल्क करण्यात येते. याशिवाय मंडळाच्या सर्व योजना विनाशुल्क आहेत. मात्र शहरातील बार्शी नगर भागात नव्याने स्थापन झालेल्या कामगार सुविधा केंद्रातील इन्चार्ज सुरेश चव्हाण व शिपाई सचिन गधळे हे कर्मचारी कामगारांना सतत पैशाची मागणी करतात व पैशे न दिल्यास कामगारांची अडवणुक करतात, अरेरावीची भाषा करतात, काम करणार नसल्याचे स्पष्ट सांगतात. तसेच हे कर्मचारी काम करत नसून त्यांनी नियुक्त केलेले एजंटामार्फतच काम करण्यास सांगातात. त्यांना एजंटामार्फत कमीशन मिळते तसेच कर्मचाऱ्यांमार्फत इंचार्ज यांना कमीशन मिळते. त्यामुळे याठिकाणची ही साखळी वाढतच असून या साखळीवर प्रतिबंध करण्यात यावा, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश मुळे, परमेश्वर नगरे, रवी गुंजाळ यांनी केली आहे.