बीड – गेवराई :
जगात फक्त दोन गोष्टी बलवान आहेत. एक काळ आणि दुसरं ज्ञान. म्हणून , या जगात काळ कुणालाच घाबरत नाही. तो फक्त संतांना घाबरतो. कारण , तिथे समाजाच्या हिताचे ज्ञान आहे. आपल्याकडे पद, पैसा, सत्ता, संपत्ती कितीही असू द्या , ते कामी येईलच असे नाही. म्हणून, आनंदी जीवन जगायचे असेल तर ज्ञानवंत व्हा आणि देवाचे नामस्मरण करा, असा उपदेश समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी येथे बोलताना दिला.
गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या भव्य कीर्तन महोत्सवात मंगळवारी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कीर्तनसेवा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या एक तत्त्व नाम दृढ धरीं मन । हरिसि करुणा तूझी ॥१॥ तें नाम सोपारें राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्गद जपें आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासी झणें ॥३॥ ज्ञानदेव मौन जप-माळ अंतरीं, धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥ या अभंगावर चिंतन केले. देव मिळवायचा असेल तर तत्व पाळा त्याशिवाय पर्याय नाही. संत भाऊ- बाबा समाजाच्या हितासाठी सतत भजन, कीर्तन, व देवाचे नामस्मरण करुन ब्रम्हरुप होवून देव झाले. संत भाऊ-बाबा यांनी जीवनात तत्व पाळले म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा हा भव्य सोहळा गेल्या 20 वर्षांपासून येथे होतो आहे. भागवत धर्माचे हेच खरे काम आहे, देवाचे भजन करुन पुण्य कमवा. काटे सहन करायला शिका सिध्द व्हाल अहंकार करु नका. लोकांना तीन गोष्टी लागतात स्वार्थ, पैसा आणि मान तर वाझ झाडांचे नाव संसार आहे म्हणून संसारात अडकून न राहता भक्ति भावाने ज्ञान मंडपात येवून स्थिर व्हावे तसेच शास्त्र सोडून वागणारे लोक सुखी राहू शकत नाहीत. तसेच शरिराला जपा, आपल्यामुळे सर्व आहे. याचा विचार करा शरिर सांभाळा शरिर हिच खरी संपती आहे. पोरांनो नवीन जमीन घेवू नका परंतु बापाची जमीन मात्र विकू नका. शुध्द शाकाहार घ्या अन् घरचं खा. सध्या अपघाताचे प्रमाण वाढले कारण दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चालली आहे. १८ ते २२ वर्षाचे पोरं दारु पिवून अपघातात जातात हे दुर्देव आहे. पाठीमागे कुटुंबाचे खूप हाल होतात. म्हणून तरुणांनो दारु पिवून आयुष्य बरबाद करण्यापेक्षा अभ्यास तसेच उद्योग, व्यवसाय करुन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असा मौलिक सल्लाही त्यांनी शेवटी बोलताना दिला. यावेळी त्यांना संगीत विशारद तुळशीराम म.आतकरे, रामनाथ म.सालपे, इंद्रजित म. येवले, नाना म. कवडे यांच्यासह आदींनी साथ दिली. मृदंगाचार्य नामदेव म.बेदरे व अजय म.काळे यांनी मृदंग साथ दिली तर हार्मोनियमवर राजेंद्र काळे यांनी संगीत साथ दिली. यावेळी गेवराई शहरासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
@ चौकट –
संत भाऊ – बाबा सेवा प्रतिष्ठानच्या धार्मिक कार्याचे ह.भ.प.इंदोरीकर महाराजांकडून कौतुक
गेवराई येथे संत भाऊ-बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हा भव्य सोहळा गेल्या 20 वर्षांपासून होतो आहे. हेच भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे खरे काम आहे. देव मिळवायचा असेल तर संताशिवाय पर्याय नाही. समाजाच्या हितासाठी सतत भजन, कीर्तन करुन ब्रम्हरुप होवून देव झाले त्यांना संत भाऊ-बाबा असे म्हणतात त्यांचे वैराग्याने शरिर पुर्ण झाले म्हणून हा संत भाऊ-बाबांच्या पुण्यतिथीचा हा भव्य सोहळा गेल्या 20 वर्षांपासून येथे होतो आहे. संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करुन प्रत्येकाने देवाचे भजन करुन पुण्य कमवा असा मौलिक सल्लाही शेवटी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिला.