बीड – गेवराई –
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त निघालेली सहकार दिंडीचे २ जानेवारी रोजी गेवराई शहरात आगमन झाले. रात्रीच्या मुक्कामानंतर सोमवारी सकाळी ३ फेब्रुवारी रोजी या सहकार दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करुन रॅली गेवराई शहरातून काढण्यात आली. या रॅलीत विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकऱ्यांच्या वेषभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांसह सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध पतसंस्थेचे चेअरमन, संचालक, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पहिल्यांदाच सहकाराची दिंडी गेवराईकरांनी अनुभवली असून या सहकार दिंडीचे सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिपक पवळ यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान शहरातून निघालेल्या रॅलीदरम्यान दिंडीत सहभागी रथामधील कलाकारांनी कलेतून विविध सादरीकरण केले.
केंद्र शासनाने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याबाबत शासकीयस्तरावर निर्णय घेतलेला आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सर्व पतसंस्थांची सहकार परिषद महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या संयुक्तरित्या दोन सहकार दिंडी विविध भागातून शिर्डी याठिकाणी जात आहेत. यामध्ये नागपूर ते शिर्डी निघालेल्या सहकारमहर्षी स्व.वैकुंठभाई मेहता राज्य सहकार दिंडी क्र-२ चे रविवारी रात्री सोमवारी गेवराई शहरात आगमन झाले होते.
सोमवारी सकाळी १० वाजता भव्य स्वागत समारंभानंतर सदरील दिंडीची सुरुवात स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंख्या याठिकाणाहून होऊन नवीन बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, पंचायत समिती कॉर्नर, मोंढा नाका ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात या सहकार दिंडीचा समारोप झाला. यावेळी विविध मान्यवरांनी सहकारी पतसंस्थेचे कार्य याठिकाणी विशद केले. सदरील दिंडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी स्वरुपात व वारकरी यांच्या पोषाखात गुरुकुल इंग्लिश स्कुल शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता. सहकार दिंडीत सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी, गेवराई तालुक्यातील पतसंस्थांचे चेअरमन, पदाधिकारी, कर्मचारी, फेरडेशचे पदाधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र फेडरेशनचे पदाधिकारी, कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शहरातील कन्या शाळेत गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने तालुक्यात १००० वृक्ष लागवडीच्या उद्दिष्ठांचा शुभांरभ देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सहकार दिंडीचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती गमवराई येथे करण्यात आला. हि सहकार दिंडी यशस्वी करण्यासाठी गेवराई येथील सहकार विभागातील अधिकारी दिपक पवळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेतली.