बीड : सुभाष सुतार : पैठण नाथसागराच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या शून्य ते एकशे बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उजव्या कालव्याला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला उजवा कालव्याला मरणकळा आली होती. कालव्याचा मुळ उद्देश कालबाह्य झाला होता. सरकार आणि प्रशासनाचेदूर्लक्ष झाल्याने, कालव्यावर अवलंबून असलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, लोकप्रतिनिधी, जायकवाडी प्रशासन आणि सरकारच्या सकारात्मक धोरणाने उजव्या कालव्याला चांगले दिवस आलेत. कालवा नव्या नवरी सारखा नटला असून, सरकारच्या सकारात्मक कालवा धोरणाने, शेतकर्यांच्या दारावर सिंचनाचे तोरण बांधले आहे.पैठणच्या नाथ सागरावर ,अगदी पायथ्याला उजवा आणि डावा कालवा आहे. उजवा कालवा अहिल्यानगर [ अहमदनगर ] , बीड जिल्ह्य़ातील तालुक्यातील गावांमधून जातो. डावा कालवा संभाजीनगर [ औरंगाबाद ] ,जालना जिल्ह्यातील तालुक्यातून जातो. ज्या भागातून हे कालव्या जातात, त्या भागात उजव्या आणि डाव्या बाजुच्या शेती सिंचनासाठी , या कालव्याचा उपयोग होतो. त्या शिवाय, कालव्यातून ठिकठिकाणी, आवश्यक त्या ठिकाणी वितरिका [ चार्या ] काढलेल्या आहेत. त्यामुळे, हजारो हेक्टर क्षेत्रातील शेत जमीन ओलिताखाली आलेली आहे.उजवा आणि डावा कालव्याचे व्यवस्थापन, जायकवाडीच्या पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत केले जाते.या विभागाच्या देखरेखीत, उजव्या – डाव्या कालव्यातून रब्बी हंगामात पाणी [ आवर्तन ] सोडण्यात येते. त्या बदल्यात माफक दरात पाणी पट्टी आकारली जाते. शेतकर्यांची जीवनदायिनी म्हणून, पैठणचा उजवा – डावा कालव्याची ओळख निर्माण झालेली असताना, सिंचनासाठी लाभदायक असलेला हा कालवा, गेल्या काही दिवसांपासून शेवटच्या घटका मोजत होता. वीस वर्षांपासून सरकारचे दूर्लक्ष झाल्यानेकालवा नष्ट होईल की काय ? अशी भिती निर्माण झाली होती. कालवा जागो – जाग फुटला होता. कालव्याचे अस्तारीकरण उखडून पडले होते. वितरिका उद्ध्वस्त झाल्या. जायकवाडीची वैभवशाली यंत्रणाच ठप्प झाली. सरकारच्या धोरणात उन्हाळ्यात पाणी सोडण्यात येत होते.मात्र, त्या पाण्याचा फारसा उपयोग होत नव्हता. पाणी वाया जात होते. कालव्या शेजारच्या मोजक्याच शेतकर्यापर्यंत पाणी जात होते. ऐपत असलेले शेतकर्यांना लाभ होत होता. आजुबाजुच्या लाभक्षेत्रात पाणी पातळी वाढत होती.
कधी काळी कालव्यातून आलेले पाणी वितरिकेच्या सहाय्याने वीस पंचवीस किलोमीटर [ टेल पर्यंत ] अंतरावर जात होते. यंत्रणाच कोलमडून पडल्याने सिंचनाचा मुळ उद्देश बाजुला पडला. दरम्यान, वीस वर्षांनंतर सरकारने सकारात्मक विचार करून, कालव्याचे नवनिर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, कालव्याला नवे रूपडे आले आहे. उजव्या कालव्याने कात टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून पैठण [ संभाजीनगर ] ते माजलगाव जि.बीड, असा एकूण शुन्य ते एकशे बत्तीस किलोमीटर अंतरावरचा कालवा दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. कालव्याच्या दोन्ही बाजुचे अस्तारीकरण काढून घेऊन, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट चे नवीन अस्तारीकरण टाकण्यात आले आहे. राज्य सरकारने जवळपास साडे पाचशे कोटी रू खर्च करून, या कालव्याला नव संजीवनी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने, शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. सरकार, प्रशासन आणि कंत्राटदारांची एजन्सी कालवा दुरूस्तीच्या काम करत आहे. परभणीचा जायकवाडी विभागाचे प्रमुख या कामावर लक्ष ठेवून आहेत. [ भाग- एक ]