रूप, रंग, गंध या कशावर तरी एकदा जीव जडतोच. जन्म जन्मांतरीचं नातं बांधलं जातं. “तुझे जीवन की डोर से बांध लिया है…! “म्हणत म्हणत गुण-अवगुणांसह स्विकारायची पक्की मानसिकता तयार होते . एकदा का जीव जडला “तेरे जुल्मो सितम सर आँखों पर…” म्हणत ‘फॉल इन लव’, ‘मेड फाॅर इच अदर’ अशा अवस्थेत वेल्हाळ मन हिंदोळे घेत असतं. “प्रेम कुणावर करावं ? प्रेम कुणावरही करावं”..
कुसुमाग्रजांच्या साहित्यावर करावं ,पु.लंच्या लालित्यावर करावं, प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या उध्दवाच्या भारावून टाकणार्या अलगुजावर करावं ,भर श्रावणात दव पांघरलेल्या ओलेत्या पातीवर करावं ,आईच्या वात्सल्यावर करावं, मायेचे पाझर काळजात दडवून वरकरणी शुष्क होवून वावरणार्या बापाच्या करड्या नजरेवर करावं आणि झोकून देऊन निष्ठेने काम करावं वाटणाऱ्या आपापल्या पेशावर करावं.
तसं बघायला गेलं तर ‘प्रेम’ ही अगदी अलवार आणि निसर्गदत्त भावना आहे .तिचा उमलण्याला निश्चित काळवेळ नाही. निस्सिम, निर्व्याज प्रेम लाभणं हा खरं तर नशिबाचा भाग आहे पण एकदा प्रेम कुणावर करावं ? कशावर करावं? याचं गमक उमगलं ना मग दिसेल जळी -स्थळी ,काष्ठी -पाषाणी केवळ प्रेम नि प्रेमच ! तिरस्कार आणि अढीसारख्या विकलांग भावना देखील कुठच्या कुठे गळून पडतील.
कळीचं फूल होणं ,रात्रीच्या गर्भातून उषःकाल होणं हे जसं अगदी सहज सहज घडतं ना तशी प्रेम भावना हळुवारपणे ,नकळत मनात रुजत राहते. सदा सर्वकाळ बहरणाऱ्या प्रीतभावनेच्या राशी ठायी ठायी ओसंडताना आपलेही मार्ग सुगंधित होणार नाहीत यात मुळी शंकाच नाही.
“उधळून द्याव्या चराचरी या प्रेमाच्या राशी
प्रेमाविना रे एकलाच तू
कुठवर चालत जाशी
उभ्या जगाच्या काफिल्यातून घोंघावत जाताना…
सावरेल तुज प्रेमच केवळ
पैलतीरी जातांना…” प्रेम उच्चकोटीचं असावं .त्याग ,समर्पणाची सुंदर किनार त्याला असावी.
आज मात्र हरवलंय पूर्वीचं प्रेम नी त्याच्या सालस व्याख्या. आई-बाबाकडे रडून खाऊ मागण्याच्या वयात लेकरं हल्ली प्रेमात पडायला लागलीत. घरातल्या वयोवृद्धांच्या जागा फेसबुक ,इन्स्टाने घेतल्यावर दुसरं काय होईल ?ही अशीच थेरं बघायला मिळणार. कुठल्या ध्येय, महत्त्वाकांक्षा बाळगून ही मुलं शाळा-काॅलेजात येतात कुणास ठाऊक? अलीकडेच मिसरुड फुटलेले देशाचे भक्कम आधारस्तंभ( ? )आणि एकीकडे मर्यादा ,लज्जा या स्त्रीसुलभ भावना हरवलेल्या, निर्ढावलेल्या पोरी . क्षणिक आकर्षणापोटी कायमचा उंबरा ओलांडण्याचे निर्णय घेतात.केवळ तत्वांसाठी जगणार्या स्वाभिमानी मायबापाच्या विश्वासाला चकवा देऊन आत्मघात ओढावून घेतात. एरवी वज्राहून कठीण वाटणारा बापमाणूस लेकीच्या हट्टापुढे पुरता विरघळत असतो. तिच्या मनावर ओरखडे आणि डोळ्यातलं पाणी त्याला कधीच बघायचं नसतं. कवी बीं च्या कवितेतला बाप या ठिकाणी आठवतो.
“गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
का ग गंगायमुनाही या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त चोरटीला,
कोण माझ्या बोलले गोरटीला? “
बापाने लेकरांवर पंचप्राण ओवाळून टाकावे. आणि त्यांचे पंचप्राण त्यांच्या व्हॅलेंटाईनजवळ गहाण पडावेत.
गुरु ठाकूर म्हणतात, “घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धाप रं “पण आठ आठ तास ऑनस्क्रिन राहून हेडफोनने लिंपलेल्या कानांना बापाच्या काळजाची धडधड ऐकूच कशी येईल?
असह्य जाचाच्या सावटाखाली लेकीला ‘माहेर’ मिळावं म्हणून जिणं नकोनकोसं होईपर्यंत नांदणाऱ्या आयांना काय उत्तर द्यायचं? पोरीची तिपेडी वेणी गुंफताना वासनेने वखवखलेल्या जगाच्या कल्पनेनं तिच्या काळजाला सुद्धा असेच पिळोटे पडत असतील. हे कुठलचं गुगल दाखवत नाही. फक्त व्हॅलेंटाईन डे, हग डे , रोज डे आणि संमोहित झालेला मेंदू….
“त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी…”
सुन्न करून सोडणाऱ्या अशा कितीतरी उध्वस्त कहाण्या दररोज बघतो आपण पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली असते कि” या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या… “असं म्हणायची सोयच राहत नाही.
मृगजळामागे धावण्यापूर्वी खस्ता खाणाऱ्या आई बापाची जाणीव तर असायलाच हवी पण देशप्रेम ,देशाभिमान आणि राष्ट्राप्रती अस्मिता जपायची तुम्हीच. व्हॅलेंटाईन डे च्या नादात चॅटींग, डेटिंग, शॉपिंग, हॉटेलिंगच्या दलदलीत १४ फेब्रुवारी २०१९ ला तब्बल चाळीस जवानांना शहीद करणाऱ्या भ्याड हल्ल्याचा विसर पडतोच कसा? “झिंग झिंग झिंगाटच्या “हँग ओव्हरने आजची पिढी आजही तेवढ्याच बेहोशीनं झिंगत रहाते. पुलवामाचा थरार मात्र विस्मरणात जायला नको हा विचार अलिप्त ठेवून कसा चालेल ?
आज मिळालेला प्रत्येक गुलाब तुझं थडगं सजवायला कामात येईल पोरी! निसरड्या वाटेवर भूलथापांना बळी पडशील .तारुण्याच्या सीमारेषेवर तुझ्यावर भ्याड हल्लेही होतील. कर्तुत्व गाजवतांना अवेळी आलेल्या अशा कैक गुलाबांचा गुलकंद करून खायला शिक.
खरं प्रेम ही उदात्त असाधारण भावना आहे. उजाड आयुष्याला महन्मंगल करणारी . साजरा करायला ‘एक दिवस ‘ तेवढा ठेवावा एवढी संकुचित तर नाहीच मुळी. खऱ्या प्रेमाचं गोड गुलाबी स्वप्न
प्रत्येकाच्या आयुष्यात सत्यात उतरत असतचं. तुला मिळणारा जोडीदार चांगला असेल हे ठामपणे नाही सांगता येणार .पण आपल्या वाट्याला आलेलं कसं ‘ब्रँडेड’ आहे हे जगाला दाखवता आलं पाहिजे .हे व्हॅलेंटाईन बिलेंटाईन ‘असं काही नसतं बुवा !
वैशाली शिंदे ,बीड
९४०३७८८८१३