बीड – गेवराई : सुभाष सुतार : पैठण उजवा कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याने 0 ते ते 132 किलोमीटर परिसरातली डाव्या – उजव्या बाजुची जवळपास 15000 हेक्टर क्षेत्रातील शेत जमीन भिजायची. दिवस गेले तसे, ओलिताखाली येणारे क्षेत्र कमी झाले. कालव्याला गळती लागल्याने, वितरिकेतून पाणी घेणे अवघड होत गेले. अनेकवर्ष काळ्या आईची ओटी भरणारा कालवा हतबलता व्यक्त करू लागला. गोरगरीब, नियमित पाणी पट्टी भरणाऱ्या शेतकर्यांची अवस्था, धरण उशाला कोरड घशाला ; अशी होत गेली. अखेर, उशिरा का होईना, सरकारने कालव्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतल्याने, कालवा परिसरातील शेतकरी आनंदी झाला आहे.उजव्या कालव्याची निर्मिती झाल्यानंतर, या परिसरातील शेत जमीने ओलिताखाली आल्या. कालव्याचा 0 ते 132 किलोमीटरचा परिसर बारमाही हिरवागार झाला. गोरगरीब, मध्यमवर्गीय आणि सधन शेतकर्यांच्या जमीनीपर्यन्त कालव्यातून वाहणाऱ्या पाणी गेले. कालवा, दोन्ही बाजुच्या लांबच लांब वितरिका आणि कालव्याचा पाझर, असा तिहेरी फायदा येथील शेतीला झाला. कालानंतराने, ही सगळे लाभदायी चित्र भेसूर झाले. कालव्याला गळती लागली. अस्तारीकरण खराब झाले. चार्या [ लहान मोठ्या वितरिका ] उद्ध्वस्त झाल्या. मुळ उद्देश बाजुला पडला. हळूहळू प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. वैभवशाली यंत्रणाच कोलमडून पडली. हजारो कोटीची पाणी पट्टी कोणी भरायची ? सरकार, प्रशासन आणि शेतकर्यांमध्ये समन्वयाचा अभाव निर्माण झाला. पर्यायाने कालवा दुर्लक्षित होत गेला.सरकार , कालव्यातून पाणी [ आवर्तन ] सोडायचे. 100% पाणी कालव्यातून यायचे. मात्र, पन्नास टक्केच पाणी मध्येच वाया जात असे. सधन शेतकर्यांना काही प्रमाणात फायदा व्हायचा. अल्पभूधारक शेतकर्यापर्यंत पाणी घेऊन जाण्या साठीचे साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे, धरण उशाला, कोरड घशाला; अशी हतबलता शेतकर्यांच्या नशीबी आली.कालव्यात गाळ झाला. अस्तारीकरण निघून गेल्याने, झाडे-झुडपे वाढली. अनेकदा कालवा फुटला. कालव्याची लेन्थ बिघडल्याने, पाण्याची गती व्यवस्थित राहीली नाही. काही बहाद्दरांनी तर, कालवा फोडून पाण्याला वेगळी दिशा दिली. काहींनी कालव्याला जागो- जाग डॅमेज करून, पाणी जिरवण्याची सोय केली. अशा परिस्थितीत, ऐपत नसलेले, आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकर्यांना त्याचा फटका बसला. बळी तो कान पिळी, या दृष्टिकोनातून कालव्यावर अनागोंदीचे चित्र तयार झाले. सरकारचे दूर्लक्ष केल्याने, प्रशासन हतबल होऊन पाहत राहीले. हे वास्तव अधोरेखित होत असताना, एक आशेचा किरण पून्हा उभा राहीला आहे. सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ,उजव्या कालव्याकडे लक्ष देण्याचा निर्णय झाला. सध्या कालवा अस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. [ भाग – 2 ]