खरच, आमदार सुरेश अण्णा धस यांचे चुकलेच का ? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय. स्व. संतोष देशमुख प्रकरणा सारखा गंभीर विषय ऐरणीवर असताना आणि मिडियाचे सगळे लक्ष डॅशिंग आमदार सुरेश धस यांच्याकडे असताना, अचानक धस अण्णा आणि ना. धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीची बातमी आल्याने अनेकांना धक्काच बसला. बातमी आल्यावर, धस यांनी मौन सोडले. त्यांनी भेटीची गोष्ट कबूल केली. मात्र, त्यांची बाॅडी लँग्वेज गारठलेली दिसली. त्यांचे ओठ ही कोरडे पडले. बोलताना तत्…मम् झाले. याचे दोन अर्थ आहेत. एक तर, गुप्त भेट बाहेर येणार नाही. याची काळजी त्यांनी घेतली असावी. एवढे होऊन ही, बातमी लीक झाली. या गोष्टींने धस व्हायबल झाल्याचे झाले. खर म्हणजे, टाळू वरचे लोणी खाणार्या गिधाड टोळ्या सगळीकडेच दिसतात. सामान्य माणूस पाहतो आणि पुढे जातो. काय करणार, कुणावर विश्वास ठेवायचा. रिकाम्या पोटासाठी त्याला झगडावे लागते.
धस – मुंडे भेटीने, सब घोडे बारा टक्के, या कवितेची आठवण झाली. तुम्ही एक व्हा, आणखीन एक व्हा. मात्र , एक लक्षात ठेवा, तो बसलाय तिथे. दुखावलेल्या एखाद्या कुटुंबाचा आत्मा कळकळून तुटतो. तेव्हा घरावर नांगरच, हाजारो उदाहरणं आहेत.
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे नेतृत्व करणाऱ्या अण्णांच्या पावलांना प्रतिष्ठा प्राप्त झाली असताना, त्यांनी गंभीर चुक केली. परभणी प्रकरणात ही ते चुकले. त्यानंतर, त्यांनी दुसरी अक्षम्य चुक केली. सगळी भिस्त त्यांच्यावर होती. तेच पुढाकार घेत होते. नकळत महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष धस यांच्या भूमिकेकडे असायचे. धस, कुठेच चुकले नाहीत. ते टाळू वरचे लोणी खातील, अशी अजिबात शक्यता नाही. त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेता येणार नाही. ते, केवळ मराठा समाजाचे पुढारी नाहीत. सर्व समावेशक जाती धर्मातील लोकांना ते आपले नेते वाटतात. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आहे. धस यांनी ना. मुंडेची भेट घेतली, यात शंका घेण्याचे कारण नाही. त्यांची ती कृती योग्यच आहे. सुखादुखाला जावे- यावे लागते. फक्त, धस यांनी किमान देशमुख कुटुंबातल्या कुणा ही एखाद्या सदस्याला पुसटशी कल्पना द्यायला हवी होती.
नेमक्या वेळी त्यांनी ते केले नाही. काय असत, राजकारणात काही गोष्टी हेतूपुरस्सर केल्या जातात, पेरल्या जातात. त्यात कुणाचा तरी, फायदा असतो. तोटा ही असतो. स्व. संतोष देशमुख प्रकरणात धस यांच्या माध्यमातून मराठा समाजाला राजकीय धनी मिळाला, अशी चर्चा होऊ लागली होती. किमान, बीड जिल्ह्य़ाचा मराठा चेहरा म्हणून धस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. धस यांनी विधिमंडळात, विधिमंडळाच्या बाहेर छातीचा कोट करून देशमुख हत्या प्रकरणाला पेटते ठेवले. लाखो लोकांनी त्यांची भाषणे, मुलाखती कान-डोळे उघडे ठेवून ऐकल्या, पाहिल्या,वाचल्यात.
जनमत तयार करून, देशमुख हत्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशी, गर्जना केली. आता प्रश्न उरतो, तो असा की, धस यांनी गुप्त भेट का घेतली ? ही भेट गुप्त होती की नाही ? धनंजय देशमुख प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी भेटीचे पाऊल टाकायला हवे होते. या भेटीचा मराठा समाजाने धिक्कार केला आहे. मराठा समाजाचे नेते जरांगे-पाटलांनी तीव्र शब्दात समाचार घेतला आहे. एकेरी उल्लेख करून, आमदार धस यांना गद्दार, असे विशेषण लावले.
त्यामुळे, धस अण्णांची अडचण झाली आहे. विरोधक ही तुटून पडलेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा समाज एकवटला, त्या शिवाय सकल समाजाने ही, देशमुख हत्या प्रकरणात संवेदनशीलता दाखवली.
ज्या निर्घृणतेने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या घटनेचा निषेधच झाला पाहिजे. मारेकऱ्यांना फास लागल्याशिवाय, हे प्रकरण थांबू नये, अशी लोक भावना आहे.
धस आणि जरांगे-पाटील यांच्यात आज ना, उद्या वाद विवाद होणारच होता. कारण, देशमुख प्रकरणात प्रसार माध्यमांनी धस यांना अधिक प्रसिद्धी दिली. नाही म्हणले तरी,जरांगे-पाटलांना दुय्यम स्थान देण्यात आले. या मागे मोठी राजकीय खेळी असण्याची दाट संशय याहे. वातावरण असे तयार झाले की, मराठा लीडर म्हणून सुरेश अण्णांची प्रतिमा होत गेल्याने, अनेकजण अस्वस्थ झाले. एकतर, देशमुख प्रकरणात धस यांनी नेतृत्व केले. दुसरी गोष्ट, त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांना उघड विरोध केला. ना. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करून थेट नाव घेतले. त्यामुळे, धस कमालीचे प्रसिद्धीच्या झोतात आले. ते कुठे तरी चुकतील, या दृष्टिकोनातून काहीजण नेम धरून बसले होते. करेक्ट गेम करायच्या इराद्याने.आ. धस अण्णांची आणखी एक चुक झाली. ते मिडियाच्या फार आहारी गेले. तारतम्य ठेवून त्यांनी मिडियासमोर जायला हवे होते. त्यांनी मुद्रित , इलेक्ट्रॉनिक, यूट्यूब आदि प्रसारमाध्यमांवर मुलाखतीचा धडाका लावला होता. मिडियाच्या
आहारी जाऊ नये, त्यांना काय, बातमी हवी असते. त्यांचा तो नैतिक धर्म. या धर्माशी संबंध ठेवायला हरकत नाही. त्यामध्ये मर्यादा आवश्यक आहे. हे आता अण्णांच्या यांच्या लक्षात येईलच.
धस यांच्या गुप्त भेटीची बातमी बाहेर येताच, जरांगे-पाटील यांनी थेट एकेरी हल्ला चढवून धस यांचा समाचार घेतला. त्यांनी बोलतानाच, धस तर मराठा समाजाचा आयकाॅन व्हायला निघाले होते. एवढ्या लवकर गद्दारी, मी खपवून घेणार नाही. मी, आहे ना..! संतोष देशमुख हत्या प्रकरण ,कोण कसे दडपून टाकतो, बघतोच. कोणालाच सुट्टी नाही. यावरून, एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे, जरांगे-पाटलांना ही वाटत होते की, काही मराठा नेत्यांना हाताशी धरून, महाराष्ट्र सरकार आपली कोंडी करत आहे. त्यामुळे, जरांगे-पाटील संधीच शोधत होते. धस – मुंडे गुप्त भेटीने माहोल बदलला आहे. त्याचाच फायदा घेत, अनेकजण धस यांच्या अंगावर गेले. धस यांनी कुणालाच न सांगता गुपचूप जाऊन भेटीला जाणे, कितपत योग्य आहे. हे राजकारणी लोक असेच असतात. टाळूवरचे लोणी खाणारे आणि नाका तोंडात पाणी गेल्यावर कार्यकर्त्यांना पायाखाली घेणारे, हे पुढारी. यांच्यावर विश्वास ठेवून मोठी चुक झाली. अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे, धस यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी एक गोष्ट आहे. देशमुख प्रकरणात धस – जरांगे-पाटील असा वाद होईल का ? तो झाला पाहिजे, अशी खेळी ही असू शकते. तो होत नाही म्हणून, धस – मुंडे भेटीचे वृत बाहेर सोडले असण्याचा संशय आहे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सांगितलय,
पुढाऱ्यांनी धूर्त असायला हरकत नाही. मात्र, त्यांनी भलेपणा सोडू नये. नसता, लोकशाहीवरचा उडायला वेळ लागणार नाही. स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने माणसांची मने थरथरली आहेत. बीड च्या डर्डी पाॅलिटिक्सची त्यात आणखीन भर पडली. एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. राजकारण करा पण एखाद्या निष्पाप जीवाचा आधार घेऊन करू नका. टाळूवरचे लोणी खाऊ नका, संतोष देशमुखचा आत्मा न्यायासाठी तडफडतो आहे. त्यांच्या कुटुंबाची कुचेष्टा होणार असेल तर, नियती तुम्हाला कधीच माफ करणार नाही. गुन्हेगार कोण्या जातीचा नसतो. त्यांना जात नसते. तो गुन्हेगारच असतो. स्व. संतोष देशमुख ची लेक बघा, किती धीराने बोलते. तिच्या आवाजात खोलवरचे दु:ख आहे. ती बोलते तेव्हा दगडा ही पाझर फुटतो. किती साध्या शब्दात तिने वडलांचे दु:ख मांडले. बोलताना किती पेशन्स, किती तारतम्य. तिच्या डोळ्यातले भाव फक्त न्याय मारताहेत. ही आधुनिक मुक्ताई आहे. त्या निरागस भावनांना पायदळी तुडवून स्वतःचे बस्तान मजबूत करू नका. दोन समाजात तेढ नकोय. स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकाल नकोय, न्याय हवाय. तो होईल, एवढीच एक अपेक्षा आहे. बाकी, जळो तुमचं राजकारण..!
सुभाष सुतार, पत्रकार- गेवराई- बीड