विनंती विशेष पत्रास कारण की, शुक्रवार दिनांक २१/२/२०२५ रोजी राज्य परीक्षा मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरूवात झाली. अर्थात, पहिला पेपर मराठीचा होता. मराठी, आपली मातृभाषा, माय मराठी म्हणजे आपला जीव की प्राण, ज्येष्ठ कवी सुरेश भटांच्या शब्दात सांगायचे तर, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? एकी कडे मराठीचे गोडवे गायचे आणि त्याच पेपरला नकला करायच्या. हे लक्षण काही बरोबर नाही. त्यामुळे, पत्र रूपी अक्षर संवादातून तुमच्या हितगुज करायचा निर्णय घेतला. सामुहिक मंथन व्हावे, एवढाच उद्देश आहे.
अलीकडच्या काळात पत्र- प्रपंच भुतकाळ झाला आहे. हल्ली हरवलेले पत्र दिसत नाही. पोस्टमन काका, दादा ही नजरेस पडत नाहीत. नव्या जमान्यात नवी टेक्नॉलॉजी आल्याने बदल झालेत. बदलाचा स्वीकार करून पुढे चाललो आहोत. आनंद आहे. खर म्हणजे, हे पत्र खास तुमच्यासाठी आहे. पत्र लिहणे हा अक्षरसंवाद असतो. एकतर्फी बोलणे असते. मनातल्या भावनांना अक्षर रूप देता येता. म्हणूनच, हा पत्र प्रपंच केलाय. सध्या परिक्षेचा माहोल आहे. सगळीकडे धावपळ सुरू दिसते आहे. विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. तयारी करताहेत. उद्याच्या भवितव्याची पहिली पायरी म्हणजे दहावी..! पालकांना चिंता असतेच. ती असलीच पाहिजे.
२१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मराठीचा पहिलाच पेपर पार पडला आणि दुसर्याच दिवशी, पेपरात बातम्या आल्या. मराठीच्या पेपरला काॅप्यांचा सुळसुळाट, परीक्षा केंद्रावर काॅप्यांचा ढिग, परीक्षा की बाजार ? बातम्या वाचून वाईट वाटले. मराठीच्या पेपर साठी काॅपी करायची खरच गरज आहे का ? एवढा अवघड पेपर काढतात का, हे शिक्षणतज्ञ ? मुद्दाम असे करतात का ? असे अनेक प्रश्न मनात घोळत असतानाच, विद्यार्थी, पालकांच्या प्रेमा पोटी दुसर्याच दिवशी एका विद्यार्थ्याकडे जाऊन पेपर आणला. तो संपूर्ण पेपर दोन – तीन वेळा वाचून काढला. प्रथम भाषा मराठीचा
पेपर एकुण ८० मार्काचा आहे. पृष्ठे १६, वेळ तीन तासाचा आहे. पेपर वाचून काढताच आनंदच झाला. जास्तीचा आनंद होण्याचे कारण, या पेपराचा आणि पत्रकारितेचा जवळचा संबंध दिसून आला. बातमी लेखन, सारा॔श लेखन, कथा लेखन, जाहिरात लेखन, प्रसंग लेखन आणि पत्र लेखननाच्या संदर्भाने प्रश्न विचारलेत. अरे व्वा, किती सहज सुंदर प्रश्न आणि त्यातच उत्तरे..!
बातमीच्या संदर्भाने
एकुण २४ मार्काचे प्रश्न आलेत. विशेष बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी दहावीचे मराठीचे पुस्तक नुसते वाचून काढले तरी, डोळेझाकुन किमान ५० / ५५ मार्क पडतील. त्या पेक्षा ही जास्त मार्क पडतील, इतका सहज, सोप्या पद्धतीने पेपर सोडवता येईल. व्याकरण सोडले तर, संपूर्ण पेपर उताऱ्यावर अवलंबून आहे. उतारा वाचन करून ,विचारलेले प्रश्न सोडवायचेत. त्याच उताऱ्यात प्रश्न आणि उत्तर आहेत. मग प्रश्न पडतो की, मराठी च्या पेपरात काॅपी करायची गरज आहे का ? तर, अजिबात नाही.
पालकांनो आपली काही जबाबदारी आहे की नाही. मुलांनी अभ्यास करावा, त्यांनी थोड वाचन, लेखन करावे, या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना तास, दोन अभ्यासाला बसवले पाहिजे की नाही. तुम्हीच सांगा. शाळेची जबाबदारी शाळेत, ते काम शिक्षकांचे आहे. शाळेत शिकवले जाते. एखादा अपवाद सोडता, कुठे डावे-उजवे होत ही असेल; नाही असे नाही. काय आहे की , मराठी सारखी रसाळ, मधाळ भाषा जगाच्या पाठीवर नाही. फक्त त्यातला गोडवा जपता आला पाहिजे. याचा अर्थ, इतर भाषेला कमी लेखायचे, असा प्रश्न मनात आणू नका. सगळ्या भाषा चांगल्याच असतात. त्यातला भाव महत्त्वाचा असतो. भाषा आणि त्यातला भाव समाजाला जोडतो.
मातृभाषा निटपणे आत्मसात केली की, इतर भाषेवरचे प्रभुत्व आणखी सोपे होते. असे मला वाटते. आठवड्यातून किमान एकदा तरी पेपर [ वर्तमानपत्र ] वाचून काढला पाहिजे. रोज वाचला तरी हरकत नाही. शाळा काॅलेजात, घरी पेपरची उपलब्धता असतेच ना..!
मराठीच्या पेपरला काॅपी होऊ नये, या मतावर मी आलोय. त्यासाठी, आम्ही विद्यार्थ्यांना मदत करू, पत्रकार म्हणून त्यांना बातमी, जाहिरात, कथा, सारांश लेखन शिकवण्याची जबाबदारी घ्यायची तयारी आहे. अनेक पत्रकार त्यासाठी पुढाकार घेतील. नाही तरी, पत्रकार हा लोक शिक्षक म्हणून काम करतोच. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, समाजऋण शाश्वत सत्य आहे. या अर्थाने, मराठीच्या विषयात विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करता येईल काय, या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज वाटते. माय मराठीच्या पेपरला काॅपी करायची गरजच नाही. पुस्तक आणि प्रश्न पत्रिकेचे स्वरूप विद्यार्थ्यां पर्यंत, ज्या पद्धतीने जायला हवे, त्या मध्ये कुठे तरी गफलत होते आहे. कुठे चुका होतात. त्या दुरूस्त करता येतील का ? हे वास्तव अधोरेखित करून पुढे जाता येईल का ? हा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बातम्या विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. एवढा सोपा पेपर आहे, होता. मला वाटत, आपण कमी पडतोय. वाचन संस्कृतीला बळ देण्याची गरज आहे. ती सुरूवात घरातूनच झाली पाहिजे. ज्येष्ठ पत्रकार सुनिल माळी यांच्या बातमीदारी या पुस्तकात एक संदर्भ आलाय. ते म्हणतात, आधी वाचा, मग लिहा. याचा सरळ साधा अर्थ आहे. वाचले की, लिहायला सोपे जाते. मराठी भाषेचा इतिहास, तिचा पोत, सांस्कृतिक वारसा ज्ञानोबारायांच्या भाषेत अमृतांच्या पैजा जिंकणारा आहे. एवढा समृद्ध वारसा शाबूत ठेवायची जबाबदारी तरूण पिढीची आहे. मग, कशाला काॅपी, तिला एकत्र येऊन मुठमाती देऊ या..! अशी विनंती या पत्रातून आपणास नंम्र पणे करतो आहे. बघा पटतय का ?
सुभाष सुतार , पत्रकार बीड – गेवराई