गेवराई – बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्राच्या घराघरातून निषेधाचा आक्रोश बाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. निर्घृण हत्येचा निषेध म्हणून,
मंगळवार ता. 4 रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, गेवराई शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद पाळुन देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करून, कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटनांनी शहरातील मुख्य चौकातून मोटारसायकल रॅली काढून देशमुख हत्येचा निषेध करण्यात आला.
बीड जिल्ह्य़ातल्या
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे. मस्साजोग [ बीड ] येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ही गंभीर आरोप केले जात होते. मुंडे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर, मंगळवार ता. 4 रोजी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्या आधीच दि. 3 मार्च रोजी रात्री सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाले होते. फोटो पाहून, महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत होता. अनेकांना रडू कोसळले. विशेष म्हणजे, थेट वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांना ही रडू कोसळले होते. देशमुख हत्या प्रकरणात घराघरात संवेदनशीलता व्यक्त करण्यात येत असून, मारेकऱ्यांना भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी सर्व पक्षीय, सकल समाजाने केलेली आहे. दरम्यान, मंगळवार ता. 4 रोजी गेवराई शहरात बंद पाळण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळपासून शुकशुकाट होता. चौकाचौकात देशमुख यांच्या व्हायरल फोटो, व्हिडिओ चित्रीकरणाची चर्चा सुरू होती. फोटो पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. नागरीकांनी घटनेचा निषेध केला असून, आरोपींना भरचौकात फाशी दिली पाहिजे. अशी मागणी करीत आक्रोश व्यक्त केला आहे. [ टिम लोकसंवाद – लक्ष्मण उमाप ]