तुझ्याशी बोलायचे आहे. पण, कळत नाही, कशी सुरूवात करावी..! नेमक काय बोलावं. तुझं सात्वंन करावं की, तुझी पाठ थोपटावी की, तुझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडावं..! तुझ्या कुटुंबावर झालेला आघात भयंकर आहे. तुझ्या डोक्यावरचं छत्र हरवल आहे. वैभवी, दु:ख वाटुन घेता नाही बघ..! तुझी, तुझ्या कुटुंबाची वेदना आम्ही समजू शकतो. तुझे "वडील" खरच खूप भारी होते. गावपण सांभाळून काम करत होते. हसत - खेळत गावगाडा सांभाळत होते. खंडणीखोर गुंडानी घात करून त्यांची [ 9 डिसेंबर 2024 ] निर्घृण हत्या केली. हालहाल करून मारले. ते दृश्य पाहून मानवी संवेदना जागच्या जागी गारठल्या. एखाद्या निर्जीव वस्तुला ही एवढ्या क्रुरतेने कुणी मारणार नाही. एवढं वैर धरावे, अशी गोष्ट ही नव्हती. बांधाचे भांडण नव्हते की, भावकिचा वाद नव्हता. पण, वैभवी तुला आणि तुझ्या कुटुंबाला धीर धरावा लागेल. न्यायासाठी सजग राहून पुढे जावे लागेल. आम्ही आहोत तुमच्या सोबतीला..!
खर तर, तुझ हसण्या- खेळण्याचं वय. या वयातली मुलं-मुली झोपाळ्या वाचुन झुलत असतात. त्यांचा तो नैसर्गिक अधिकार असतो. मात्र, तुझं हास्य निष्ठूर काळाने हिरावून घेतलं. एका निष्पाप जिवाला यातना देऊन संपवलय. महाराष्ट्र सुन्न झालाय. प्रत्येकाच्या मनात राग, चीड आहे. लोक म्हणतात न्याय झालाच पाहिजे. लोक भावना तिव्र आहे.
वैभवी, तू एवढ्या भयंकर संकटात सुद्धा, एखाद्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं वागलीस. तुझ्या कुटुंबावर आलेल्या भयंकर संकटाला धीराने तोंड दिलेस, देतेस. अख्खा महाराष्ट्र अचंबित झालाय. तुझ्या विषयी सहानुभूती व्यक्त करू लागलाय. तुझ्या पाठिशी उभा राहीलाय आहे. तुझा मोठेपणा, तुझ्या कारुण्यमय डोळ्यातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबात दिसलाय. त्या मध्ये, खोलवर असा एक अर्थ आहे. तुझा प्रत्येक थेंब ना थेंब, स्व. संतोष देशमुख यांच्या तडफडणार्या आत्म्यावर पडतोय. त्या थेंबाची किंमत हैवानांना चुकवावीच लागेल. तुझ्या भावना महाराष्ट्राने समजून घेतल्यात. त्यांनी तुला आपलसं मानलय. वैभवी, त्याचा प्रत्यय मला स्वतःला आला.
6 मार्च 2025 रोजी, संत तुकडोजी महाराज नागपूर, विद्यापीठाची पेट [ पीएच.डी ] परीक्षा होती. त्या निमित्ताने नागपुरला गेलो होतो. सुरक्षा रक्षकांनी गेटवर अडवले, विचारपूस केली. मी म्हणालो, बीड येथून आलोय. एवढेच बोललो आणि सुरक्षा रक्षकाने माझा हात धरून बाजुला केले. त्या हरामखोरांना फाशीच झाली पाहिजे. आणखी दोन – तीन सुरक्षा रक्षक गोळा झाले. वैभवी, तुझ्या वडलांची आठवण काढून, सहानुभूती व्यक्त केली. त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठिशी आहे. वैभवी, मला वाटत; ही भावना संबंध महाराष्ट्रभर आहे. मी , माझ्याच मनाला प्रश्न केला. कोण होते, संतोष देशमुख, आपलं नातं तरी काय त्यांच्याशी ? का वाटतय, आपल्याच घरातला माणूस गेलाय. फक्त आणि फक्त..एकच नात आहे. ते म्हणजे माणुसकीचं..!
वैभवी, तू सगळ्यांना जिंकलस. तुझ्यातला चांगुलपणा प्रत्येक वेळी दिसून आलाय. तू बोलावे आणि आम्ही फक्त ऐकत राहावे. तू बोलतेस तेव्हा अंगात मुंग्या येतात, मस्तकापर्यंत थयथयाट करायला लागतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी तू जेवढ्या वेळा व्यक्त झालीस. त्या सगळ्या प्रतिक्रिया माणसाला विचार करायला भाग पाडतात. तुझी भावना , तुझी स्वतःची मते ऐकणाराला आतून हलवतात.
वैभवी, आपण म्हणतो की, स्त्रियांनी खूप भोगलय. ती शोषिकच राहीली. हे, जरी खरे असले तरी, शोषिक स्त्रियांचा आदर्श शौर्य गाजवणारी “बाईच” राहीली आहे. भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा हाच खरा वारसा आहे. तिच्या वाटेत अनंत अडथळे आले. तिच्या वाटा अडवल्या गेल्या, तिच्या पुढे अडसरांचे बांध आडवे आले. पण, ती पुरून उरली. अगदी, कमरेला पदर खोचून उभी राहीली. आई – वडील, पती, मुलं – बाळं, सासू-सासरे, एकुणच काय तर, तिने जगाला आव्हान देत, कुटुंबाची पाठराखण केलीय.
वैभवी, तू ताई, माई, आई, बाईच्या रूपात माऊली दिसतेस. तुझा संयम पाहून मन गलबलून जाते. एवढ्या लहान वयात, एवढे शहाणपण कुठून आले. गर्दी दिसली की, माणसे बेभान होऊन बोलत राहतात. तू ,अपवाद ठरलीस. भान ठेवून बोलत राहिलीस.
जिच्या कुशीत तुझा जन्म झाला. ती, कुस सुद्धा धन्य झाली.
तू , भगवान गडावर गेलीस. तिथे न्यायाचार्य, महंत डॉ. नामदेव शास्त्रींशी संवाद साधलास. एका विद्या वाचस्पतीला निशब्द केलस. वैभवी, मी, त्यांच्या एका पुस्तकाचे परिक्षण केलय. माणूस म्हणून, खूप छान स्वभावाचे महंत, पण झाली चुक. त्याच क्षणी त्यांच्या विद्वत्तेला काजळी लागली. परमपूज्य भगवान बाबांच्या आत्म्याला ही वेदना झाली असणार…!
एवढे होऊन ही, तू त्यांच्याशी शांतपणे संवाद केलास. अगदी, हळुवार पणे स्वतःची भूमिका मांडलीस. केवढा संयम, पेशन्स ठेवून बोललीस. बा, महाराष्ट्र स्तब्ध होऊन पाहतच राहीला. तू , म्हणालीस,
बाबा..! तुम्ही महंत, महाराज आहात. आमचे गुरू आहात. तुमचा दर्जा खूप मोठा आहे. मी, खूप लहान आहे. माझ्या वडलांची हत्या झाली. वडलांच्या अंगावर एवढे वार झालेत. त्यांचे फोटो सुद्धा आम्ही पाहू शकलो नाही. बाबा, तुम्ही म्हणालात की, मारेकऱ्यांची मानसिकता कशी लक्षात घेतली नाही. बाबा, तुम्ही आमची मानसिकता आधी समजून घ्यायला हवी होती. आमचे एकदा ऐकून घ्यायला हवे होते. मला एवढंच वाटत..!
वैभवी, संत माय बाप असतात. भगवान बाबा मानव जातीचा आदर्श आहेत. महंत डॉ. नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबाच्या पाठिशी आहेत. त्यांचा आपल्याला राग नाही. तुझ्या वर्तनातून हे ही तू दाखवून दिलेस.
वैभवी, त्या हैवानांनी
तुझ्या वडलांच्या आत्म्याची विटंबना केलीय. ही विकृती गिधाड वृत्तीच करू शकते. असे, कुकृत्य थंड रक्ताचे गुन्हेगारच करू शकतात. या वृत्तीला ज्यांनी पोसले, ते ही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांना ही फेडावे लागेल.
वैभवी, तुझे वडील सदैव तुझ्या पाठिशी राहतील. त्यामुळे, खचून न जाता तुला उभे राहावेच लागेल. आमच्या सारखे असंख्य पत्रकार तुझ्या पाठिशी आहेत. रक्ताची फक्त नाती असतात बघ, मायेचं न तुटणारं बंधन असत..! नाहीतर, महाराष्ट्र तुझ्या पाठिशी कशाला उभा राहीला असता ? कोण अंजिली ताई दमानिया, काय संबंध त्यांचा आणि आपला. केवढी संवेदनशील बाई, केवढी आत्मियतेने बोलते.
तुझ्या वडलांचे फोटो पाहून त्या ढसाढसा रडल्या. एबीपी माझा च्या ज्येष्ठ पत्रकार कविता राणेंचे अश्रू महाराष्ट्राने पाहिलेत. ज्या दिवशी, फोटो व्हायरल झाले, त्या दिवशी प्रत्येकाचा जीव कासावीस झाला होता. वैभवी, तुला न्याय मिळेलच. एवढं होऊन ही, न्याय मिळाला नाही. तरी, घाबरू नकोस. निसर्गाचा चक्रव्यूह कुणालाच माफ करीत नाही. ज्यांनी-ज्यांनी गोरगरीब जनतेवर अन्याय, अनन्वित अत्याचार केलेत. अशा, सत्तांध, मस्तवाल, अहंकारी गुंड सत्ताधीशांचा “वध” झाल्याचा इतिहास आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणायचे, गुंडाना भीत जाऊ नका. त्यांना नमवणं खूप सोप असत. इतिहासातल्या या पाऊल खुणा म्हणजे, व्यवस्थेला बेडर होऊन प्रश्न विचारणारा “यक्ष” आहे. ज्या दिवशी अन्याय होईल, त्या दिवशी “यक्ष” यम होऊन उभा राहील. वैभवी, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात स्व. संतोष देशमुख यांच्यावर अन्याय होणार नाही. न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे. त्यामुळेच, निकालाची नव्हे , न्यायाची अपेक्षा आहे. सरकार वर विश्वास ठेवावा लागेल. त्यापेक्षा ही, माणुस म्हणुन , देवा भाऊ उर्फ देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर, त्यांच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास आहेच.
एका कवीने लिहिलय, ज्ञानियाचा पिंपळ झडू लागला. ज्ञानियाचा पिंपळ झडू लागला..! ज्ञानदेव समाधीत रडू लागला. ज्ञानदेव समाधीत रडू लागल….!
सुभाष सुतार,
पत्रकार , बीड – गेवराई