आपलं जगणं, आपणच मुश्किल करून टाकतो आहोत. ही, साधी गोष्ट आपल्या लक्षात येते. पण, कळत नाही. जेव्हा कळते, तेव्हा उशीर झालेला असतो. कर्जाचा डोंगर करून, माणुस सुखाचे दोन घास खाऊन संसार चालवू शकत नाही. कर्जाने जीवनमान उध्वस्त होऊ लागले आहे.
संभाजीनगर च्या सावकारकीने , सावकार प्रकाशझोतात आला आहे. सावकारीन बाईने केवढे घबाड जमा केले आहे. हे पाहून, सरकारी यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे.
खर म्हणजे, हे एक उदाहरण समोर आले आहे. आपल्या अवतीभवती कोण – कोण सावकार आहेत. याची इत्थंभूत माहिती सगळ्यांनाच असते. गरज म्हणून त्याकडे पाहिले जाते. हे वास्तव दुर्लक्षित करता येत नाही. समाजातल्या हरएक घटकात खूप अवघड चिंताजनक परिस्थिती आहे.
संत गाडगेबाबा म्हणायचे, रिन [ कर्ज ] काढून सण करू नका. या संत वचनाकडे काणाडोळा करून, सावकाराकडून कर्ज काढण्याला प्राधान्य देणारे, असे अनेकजण दुष्टचक्राचे धनी राहीलेत.
खर म्हणजे, संसारात अडचणी येतात. नाही अस नाही. मात्र, तारतम्य ठेवून कर्ज काढावीत, घ्यावीत. अधिकृत संस्थेकडून कर्ज घ्यावे. व्याज किती पडेल, याचा आधी हिशोब ठेवून कर्ज घ्यावे.
गरजवंताला अक्कल नसते. याच अर्थाने, सावकारकीच्या फासात लोक अडकतात. गल्ली ते दिल्ली सावकारकी आहे. सावकारकीच्या फासात अनेकजण अडकलेत. काहींनी घरे विकली, गाव सोडले. काहींनी, कुटुंबाची माफी मागून आत्महत्या केली. काहीजण, रक्कम दुप्पट करण्याच्या नादात बुडाले. खिशातली रक्कम गेली म्हणून काहींनी कर्ज काढले.
सावकारकीचा फास लई वंगाळ आहे. हा डोलारा भयावह आहे. माणूस लाचार होतो. व्यसनाच्या नादी लागतो. खाजगी सावकारकीने घरे उद्वस्त झाली आहेत. 2 ते 30 टक्क्यांपर्यंत व्याज घेऊन सावकारकी केली जाते. बचत गट, सरकारी बॅन्केचे कर्ज परवडते. मात्र, दहा ते 30 टक्के व्याज माणसाचा जीव घेतात. पून्हा , त्यामध्ये चक्री व्याज दराचा भयंकर प्रकार असतो. एकदा पैसे घेतले की, कितीही वर्ष तेवढेच पैसे राहतात. शेवटी नाकीनऊ येतात. माणुस खचतो आणि शेवटी हतबल होतो. हे सावकारकीतले कटू सत्य आहे.
भले पणा दाखवून सावकारकी करणारे ही आहेत. पण, यांना सावकार म्हणावे की नाही. असा प्रश्न पडतो. दोन, तीन टक्के व्याजाने पैसे देणारे काही सावकार, फक्त मुद्दल घेऊन खाते क्लोज करतात. काही रक्कम सोडून ही देतात. झंजट नको म्हणून अंग काढून घेतात.
अडचण हा संसारातला गतिरोधक आहे. गोरगरीब घटकांना अडचणी येतात. सुखदुःखात दहा-पाच रू घ्यावे लागतात. काही वेळा गरज म्हणून सावकार सांगेल तो व्याज दर द्यावा लागतो.
सावकारांना समाजात मोठा मान आहे. ते अब्जाधीश झालेत. ज्यांनी सावकारकीच्या आडून छळले त्यांचा ही नियतीने करेक्ट कार्यक्रम केल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्राचे आदर्श नेते
स्व. आर. आर. पाटील म्हणयाचे, गोरगरीबांना छळणारा सावकार सापडला की, कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलून काढू. सावकारकीचे भयावह वास्तव त्यांच्या लक्षात आले असावे. सरकारी यंत्रणा असून ही त्याचा फारसा उपयोग होत नाही. तालुका पातळीवर सरकारची संस्था कार्यरत असते. मात्र, त्यांना जोपर्यंत तक्रार येत नाही. तोपर्यंत, ते ही काही करू शकत नाहीत. हे सगळे असले तरी, अजून ही गाव पातळीवरची बडी आसामी व्याज न घेता गोरगरीबांना लग्न कार्यात मदत करतात. जेवढे पैसे दिलेत, तेवढेच आणून द्या. काहीजण बॅन्केचा जेवढा दर आहे. तेवढाच द्या, इमानदारीने वेळेवर पैसे आणून द्या. आम्ही मागणार नाही. अशी अट घालतात. दुसरी गोष्ट म्हणजे, वेळेवर मदत करून ही, काहीजण पैसे देत नाहीत. उलट, हमरीतुमरीवर येतात. भांडण उकरून काढतात. भल्याचा जमाना गेला. उपकाराची परतफेड अशी करतात. असा, वाईट अनुभव येतो. कालौघात सावकारकीचे अलिखित नियम बदलले आहेत. पैसे पाहिजेत तर, प्लाॅट, शेत जमीन नावावर करून द्या. नसता, खरेदीखत करून द्या. वाद विवाद नको म्हणून काळजी घेणारे सावकार आहेत.
दुसरी गोष्ट, इमानदारीचा जमाना राहीला नाही. एखाद्याने वेळेवर मदत केली तरी, त्याचे पैसे वेळेवर द्यायची गोष्ट लांब राहते. उलट, देणारालाच मुजोरी दाखवली जाते. ज्यांची वसूल करण्याची धमक तेच लोक सावकारकीच्या धंद्यात आहेत. मागचा पुढचा विचार करून, व्याजाने कर्ज घ्यायला हवे. तारतम्य आवश्यक आहे. आपल्या एखाद्या कृतीने आपले कुटुंब उघड्यावर पडणार नाही. याचा थोडा तरी विचार करायलाच हवा. अव्वाच्या- सव्वा व्याज देऊन कर्ज घेणे, नक्कीच शहाणपणाचे नाही. एक म्हण आहे. अंथरून पाहून पाय पसरावेत. बघा, पटतंय का…? [ छायाचित्र प्रतिकात्मक आहे]
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई [ बीड ]
			





