गेवराई दि. 5 :
(प्रतिनिधी) : गेवराई येथील जुन्या पिढीतील जेष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला सैफुल्ला यांचे दि. 5 एप्रिल 2025 रोजी निधन झाले. ते वय 88 वर्षे वयाचे होते. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या पत्रकारीतेमधील एक खरा दर्पणकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांचे ते वडील होत.
काझी हयतुल्ला यांचा जन्म गेवराई येथे एका सामान्य कुटुंबात झाला. काझी हयातुल्ला हे गेवराई तालुक्याचे पहिले पत्रकार असून त्यांनी दै.झुंजारनेता,मुंबई येथून प्रकाशित होणा-या दै.इन्कलाब,दै.उर्दू टाईम्स,दै.आश्कार औरंगाबाद येथून प्रकाशित होणा-या दै अजिंठा,दै.औरंगाबाद टाईम्स,दै.चपांवतीपत्र या दैनिकातून त्यांनी काम केले.काझी हयातुल्ला यांची मुंबई ,औरंगाबाद,परभणी, आकाशवाणी केंद्रावरुन बीड जिल्हा वार्तापत्रे अनेक वेळा प्रसारित झाली.भारत देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात आणिबाणीमध्ये पोलीसांच्या अन्याय,अत्याचाराविरुध्द लिखान केल्यामुळे त्यांना 17 दिवस कारावास भोगावा लागला होता.तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आदेशावरुन त्यांची सुटका करण्यात आली.त्याचप्रमाणे गेवराईच्या ज्वलंत पाणीप्रश्नी त्यांनी गेवराई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने लोकप्रतिनिधी,विधिज्ञ व पत्रकाराबरोबर नगर परिषद कार्यालयासमोर 3 दिवस आमरण उपोषण केले होते.दस्तूरखुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप बागची यांनी गेवराईत येवूुन त्यांचे उपोषण सोडवून पाण्याची व्यवस्था केली. काझी हयातुल्ला यांनी दुर्बल घटक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही दुर्बल घटकांसाठी कार्य केले असून महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर ते सतत 12 वर्षे या पदावर कार्यरत होते.काझी हयातुल्ला यांच्या निधनाचे वृत्त कळताच पत्रकारीते बरोबरच बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चाते काझी अमान,काझी शौकत,काझी शकिल ते तीन सुपुत्र तसेच दोन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज रविवारी सकाळी 9 वाजता मोमिनपुरा कब्रस्तान गेवराई येथे त्यांचा दफनविधी होणार आहे.






