एक महिला बाळंतपणा साठी अवघडलेल्या अवस्थेत रूग्णालयात येते. तिला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते. तिचे नातेवाईक रूग्णालयाला विनवणी करतात. मात्र, रूग्णालय प्रशासन “त्या” महिलेवर उपचार करायच्या आधी, तिच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये भरायची सूचना करते. किती निष्ठूर औलादीचे ही माणसे. वाटेतला वाटसरू सुद्धा अडलेल्या माणसाला, जात – धर्म सोडून मदत करतो. ही आपली भारतीय संस्कृती. माणुसकीवर विश्वास ठेवणारा आपला धर्म. कधी काळी डॉक्टर देव होता. अडी-नडिला तो धावत – पळत यायचा. असतील तर द्या, नसता राहू द्या, असा ममत्व भाव कुठे गेला ?
गोरगरीबांची सेवा करायची आहे. म्हणून , डॉक्टर व्हायचय. या जाणिवेतून स्वप्न पाहणारी पिढी कालौघात टिकून राहीली नाही. ही खरी शोकांतिका आहे. अपवाद आहेत. हे ही नाकारता येत नाही. दुर्दैवाने संख्या होत चालली आहे.
पुण्यात घडलेल्या एका घटनेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा काळाकुट्ट चेहरा बाहेर आला आहे. बाळंतपणा साठी आलेल्या सौ. तनिषा भिसे यांच्या मृत्युला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने, रुग्णालयाचा कारभार चव्हाटय़ावर आला. संवेदनशील आमदार अमित गोरखे यांनी प्रकरण लावून धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार केली आहे. घटनेचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलय. रुग्णालयाच्या कारभाराचा नंगानाच चौकशीत बाहेर येईल.
पुणे तिथे काय उणे, पुण्याची माणसं दयाळू आहेत. तिथल्या संस्कृतीचा, माणुसकीचा महाराष्ट्राला अभिमान आहे. परंतू ,अलीकडच्या काळात पैसा मोठा झाला. गोरगरीब माणूस लाचार, हतबल झाला आहे. वैद्यकीय सेवा धर्माला व्यावसायिक, उद्योजकीय स्वरूप आले. कितीही नाकारले तरी हे कटू सत्य आहे. वैभवाने नटलेल्या पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका बाळंत महिलेचा जीव घेतला आहे. ती बाळंत होण्यासाठी आली होती. तिचे बाळंतपण करून तिला सुखरूप बाहेर काढायची जबाबदारी रूग्णालयाची. परंतू, आधी पैसे भरा म्हणून डॉक्टरांनी वेळ वाया घातला. या संदर्भात,
विधिमंडळातल्या सर्वोच्च सभागृहाच्या सदस्याने स्वतः विनंती केली. खर म्हणजे, लोकप्रतिनिधींनी आदेश द्यायचा असतो. तरीही, डॉक्टरांचा रिस्पेक्ट ठेवून
विनंती केली. मात्र त्यांच्या विनंतीला मुजोर डॉक्टरांनी लाथाडले.
दिन, दीन हे दोन्ही शब्द सारखे दिसतात. तस पाहिले तर उच्चार ही सारखाच. मात्र, त्या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. दिन म्हणजे दिवस आणि दीन म्हणजे गरीब, दुबळा, उपेक्षित, दुर्लक्षित, कष्टकरी, शेतकरी, कष्टाची भाकर खाऊन संसार करणारा घटक.
मंगेशकर रुग्णालयाच्या नावाची सुरूवात दीनानाथ आहे. उपेक्षितांचा पाठिराखा, गोरगरीबांचा कैवार घेणारा, दुर्लक्षित घटकांचा नाथ..! नावात राम असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कर्तृत्व बाहेर आले आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहे. याचा अनुभव महाराष्ट्राला आला आहे. पुण्यातले रूबी, जहांगीर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालये केवळ आणि केवळ श्रीमंतांसाठी आहेत का ? असा प्रश्न आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी आताची नाही. रुग्ण आला रे आला की, त्याचा खिसा कापायचा. हेच त्यांचे धोरण राहीले आहे.
ज्यांनी फुकटात जागा दिली, त्या खिल्लारे पाटलांच्या कुटुंबाला ही,
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने सोडले नाही. दहा लाख रूपये घेतल्यावरच खिल्लारे पाटलांवर बायपास सर्जरी करण्यात आली. त्या शिवाय, पोपटा सारखे बोलणाऱ्या विश्वस्त डॉ. केळकरांनी व्हिजिट दिली म्हणून, त्याचेही चार्जेस लावले होते. केवढा हा कृतघ्नपणा, केवढी निच्च प्रवृत्ती. देवा भाऊ, कृपया या आणि अशा मस्तावलेल्या, माज आलेल्या रुग्णालयाचा बंदोबस्त करा. विशेष म्हणजे, खिल्लारे पाटलांच्या जमीनीवर उभारलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रोज भाडं खाऊन मजा मारत आहे. वास्तविक पाहता, रुग्णालयाला जागा देताना, आम्हाला काही नको. एवढ्या मोठ्या वास्तुवर आमचं नाव ही नको. मात्र, महाराष्ट्रातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना 30% सवलत देण्यात यावी, अशी इच्छा, अपेक्षा खिल्लारे कुटुंबांनी केली होती. त्याकडे, या निगरगट्ट लोकांनी दूर्लक्ष केले आहे..
गोरगरीबांची सेवा करून पुण्य पदरात पाडून घ्यायच्या भानगडीत न पडता, आलेल्या रुग्णांचा आधी खिसा मारायचा. त्यानंतरच, रुग्णांवर उपचार करायचा अलिखित नियम दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने केलेला दिसतो. बाळंत महिलेच्या मृत्युची गंभीर दखल
मुख्यमंत्रीपद देवा भाऊंनी घेतली आहे. चार सदस्यीय समिती अहवाल, सरकारला सादर करणार आहे. त्या नंतर, या रुग्णालयावर सरकार कारवाई करेल. देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय संवेदनशील असून, रुग्णालयाच्या चुकीला माफी देणार नाही. असा शब्द दिला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चुक मान्य केली. दहा लाख रोख रक्कम घेतल्याशिवाय ॲडमिशन दिले जात नव्हते. महाराष्ट्र 400 च्या वर धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी जोडलेले दवाखाने आहेत. याचा अर्थ, सरकारच्या योजनेचा फायदा घेऊन, कर चुकवेगिरी होत असणार. हा, अक्षम्य गुन्हाच आहे. गेल्या दहा वर्षाचा हिशोब घेतला पाहिजे. त्याचे पारदर्शक ऑडिट झाले पाहिजे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे विश्वस्त डॉक्टर केळकर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेर्यासमोर थोडं लपवून निघून गेल्याचे दिसले. त्यांच्या
प्रश्नाला उत्तर न देता पाय लावून पळालेत. रुग्णांना कस्पटासमान लेखून, बेबंदशाही करणाऱ्या सडक्या आरोग्य यंत्रणेवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. आपण, समाजाचे काही तरी देणं लागतो. याचा त्यांना विसर पडलाय. त्यांना “व्यवस्थित” समजावून सांगण्याची गरज आहे.
बाळंतपणात, उपचारा अभावी बाळंत महिलेचा तडफडून मृत्यू झाला आहे. हे पाप
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या दोषी प्रशासनाचे आहे. त्याचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल. तरच, स्व. तनिषा भिसे यांच्या आत्म्यास शांती लाभेल.
सुभाष सुतार , पत्रकार , गेवराई [ बीड ]






