हसत – खेळत रमणाऱ्या माणसांचा हा समूह आहे. मनावर काजळी येऊ न देता, एकमेकांच्या गुणदोषांना स्वीकारून पुढे जाणाऱ्या बजरंग भक्तांचा, एकरूप संघ म्हणजे बजरंग ग्रुप आहे. पंचवीस वर्षाहून अधिक काळ सहवास लाभलेल्या “ग्रुप” च्या सदस्यांना एकमेकांना एका माळेत गुंफले आहे. एक मोत्याची माळ तयार झाली. दुर्दैवाने त्यातले काही माणिक-मोती गळाले. अकाली गेलेल्या सवंगड्यांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर बजरंग ग्रुप च्या थक्क करणाऱ्या प्रवासाला सलाम आहे. सामाजिक अडसरांचे निर्मूलन करून, नवा दृष्टिकोन, नवा माणूस उभा करणाऱ्या बजरंग ग्रुप विषयी…! शिकलेली चार डोकी किती काळ एकत्र राहतील, याचा भरवसा देता नाही. थोडाफार वादविवाद झाला की, वाटा वेगवेगळ्या व्हायला वेळ लागत नाही. मात्र, काहीजण या गोष्टीला अपवाद ठरतात. सार्वजनिक हित लक्षात घेऊन यशस्वीपणे वाटचाल करतात. आपल्या उद्दिष्टांवर ठाम राहतात.
बजरंग ग्रुप ची कहानी सुद्धा अशीच वेगवेगळ्या विचारावर टिकून राहीलेली. 25 वर्षांपासून बजरंग ग्रुपचा काफिला रोज सकाळी उठून एकत्र येतो. चार हिताच्या गोष्टींवर विचारमंथन करतो. हा सिलसिला अव्याहतपणे सुरू आहे.
अनेकांना हेवा वाटावा, असा छान प्रवास राहीला आहे. सब मेरे दोस्त, सुखा – दुखाचे आम्ही सारेच सोबती. या परिघात मावणारी आणि आदर्श मूल्यांवर टिकणारी मते, विचार एकत्रित राहीली आहेत. त्यांचा प्रवास “सिल्व्हर जुबली” च्या पुढे सरकतो आहे.
गेवराई पंचक्रोशीतील शिक्षक, पत्रकार, डॉक्टर, कामगार, शेतकरी, उद्योजक, विधिज्ञ, व्यापारी, अशा सगळ्या क्षेत्रातील मंडळींचे, हे व्यासपीठ आहे. दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्मोत्सव होता. देशभर बजरंग बली चा जयघोष सुरू होता. त्याच दिवशी, बजरंग ग्रुप च्या वतीने महाप्रसादाचे [ शिरा, कढी, भात ] आयोजन करण्यात आले होते. सकाळी बरोबर 9 वाजता कार्यक्रम सुरू झाला. बजरंग बलीचा जयघोष करीत,
ग्रुप च्या सदस्यांनी लगबग करून, महाप्रसादाचे वाटप केले. ग्रुप चे सगळे सदस्य एक-सारख्या भावनेने काम करतात. कुणी लहान नाही, मोठा नाही. गर्भ श्रीमंतीत लोळणारी मंडळी सुद्धा भक्ती भावाने श्रमदान करायला पुढे सरसावलेली दिसतात, तेव्हा खूप कौतुक वाटते.
हनुमान निस्वार्थ भक्ती-शक्तीचे प्रतिक आहेत. मैत्रीचे शक्ती स्वरूप आहेत. त्यांच्याच नावाने गेवराई जि.बीड येथील बहुजन समाजातल्या बजरंग भक्तांनी "बजरंग ग्रुप" ची स्थापना केली. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ विश्वनाथ खंडागळे यांच्या संकल्पनेतून हे व्यासपीठ सुरू झाले. माॅर्निंग वाॅक च्या माध्यमातून बजरंग ग्रुपला मुर्त स्वरूप आले आहे. हळुहळू हा ग्रुप वाढत गेला. खंडागळे सर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचा दबदबा होता. ते गणित, इंग्लिश शिकवायचे. ट्युशन्स घ्यायचे, पैसे असतील तर द्या,नसतील तर राहू द्या. असा त्यांचा स्वभाव होता. बांधिलकी जोपासून काम करणारा आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. निवृत्त झाल्यावर त्यांनी माॅर्निंग वाॅकच्या निमित्ताने सवंगडी गोळा करायला सुरूवात केली. दोनाचे चार झाले. चाराचे पाचपन्नास झाले. खंडागळे सरांनी बजरंग ग्रुपला सार्वजनिक व्यासपीठ दिले आहे.
सगळ्या विचाराची माणसं एकत्र करून, विधायक कार्याला सुरुवात केली. शरीर संवर्धना पासून ते वृक्षलागवडी पर्यंतचा त्यांचा प्रवास राहीला आहे. बजरंग ग्रुपच्या प्रवासाला खंड पडू देऊ नका, अशी अपेक्षा खंडागळे सरांनी व्यक्त केली होती. आज, ते हयात नाहीत. त्या शिवाय, आणखी एक नाव. डॉक्टर शिंदे यांची अकाली एक्झिट बजरंग ग्रुपला बसलेला धक्काच होता. त्या दोघांच्या आठवणीत बजरंग ग्रुपची जबाबदारी युवा पत्रकार सुभाष मुळे [ राजे ] यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. एका पत्रकाराचे नेतृत्व स्वीकारणे किती मोठी गोष्ट आहे.
बजरंग ग्रुप सांघिक जबाबदारीने चालतो. एखादी कल्पना
सुचली की, त्यावर सविस्तर चर्चा होते. खुल्या विचाराने, श्रद्धा आणि सबुरीने काम करणारे अनेकजण या व्यासपीठाला बांधुन ठेवायला सक्षम राहीले आहेत. दररोज पहाटे एकत्र येऊन, विविध विषयांवर चर्चा, मथन, चार चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण होत राहते. खंड पडू न देता, त्यांचा प्रवास सुरू आहे. वयाचे बंधन नाही. व्हावे लहानाहून लहान, हा विचार येथे रूजलेला आहे. अगदी भर पावसात चिंब भिजणारे ज्येष्ठ – श्रेष्ठ बजरंग ग्रुपची शान आहे. सगळ्या विषयांवर चर्चा होते. अगदी दिल्ली ते गल्ली, राजकारण, समाजकारण, हलका फुलका विनोद, टिका-टिप्पणी करून हास्यकल्लोळात रमणारा दिलदार ग्रुप आहे.सण-उत्सवाच्या माध्यमातून चार घास मुखात जावेत. त्यासाठी, स्वतःच्याच खिशाला कात्री लावून, कार्यक्रमाला सार्वजनिक स्वरूप देणारी समाज हिताची चळवळ बजरंग ग्रुप चे वैशिष्ट्य राहीले आहे.वृक्षारोपण, वाढदिवस, उपेक्षित, वंचित घटकांना मदत, वारीत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा, रक्तदान शिबिर इ. च्या माध्यमातून
सकारात्मक उर्जा पेरण्याचे काम बजरंग ग्रुप ने केले आहे. साने गुरुजी म्हणायचे, बलशाली भारताच्या हितासाठी, धर्म-पंथ सांभाळून एकत्र जोडून रहा. एकमेकांना जपा. या अर्थाने, बजरंग ग्रुप चे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
सुलतानपुरी यांचा एक शेर आहे. मैं तो अकेला ही चला था, जानिब-ए-मंजिल. लोग साथ आते गये, और कारवां बनता गया..!
सुभाष सुतार, पत्रकार
गेवराई-बीड






