बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी नावाच्या संदर्भात क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. त्यांचा “तो” निर्णय चर्चेत आला आहे. पोलीस खात्यात, या पुढे खाकीच्या नेमप्लेटवर केवळ “नाव” दिसणार आहे. पूर्ण नाव किंवा नावासकट आडनाव दिसणार नाही. केवळ नाव असेल. या निर्णयाचे स्वागत झाले आहे. त्याची सुरूवात झाली आहे. कुलगुरू शिवाजीराव भोसले म्हणायचे, कामात “राम” असावा म्हणजे नावात “राम” येईल. या अर्थाने, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आडनावा वरून जात लक्षात येते. जात आली की, भेद निर्माण होण्याची शक्यता असते. खर म्हणजे, खाकी हीच एक जात आहे. खाकीचं ब्रिद वाक्य…सद रक्षणाय,खल निग्रहणाय..! कर्तव्या शिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. ना जात, ना पात, केवळ आणि केवळ पोलिसी धर्म. तो सत्यात उतरेल तेव्हा नवनीत कावत यांच्या निर्णयाचे फलित होईल.
जगविख्यात कवी सेक्सपिअर यांनी, नावात काय आहे ? असा सवाल केला होता. अजून ही त्यावर आणि विशेषत: त्यांच्या साहित्यावर चर्चा होत राहते. खर म्हणजे, नावात, सगळेच सामावलेले आहे. नावाने माणसाला ओळख मिळते.
नावाने, जात लक्षात येत नाही. जाती पेक्षा कर्तृत्व मोठ असतं. ते सिद्ध करता येत. त्यामुळेच, बीड जिल्ह्य़ाचे एसपी नवनीत कावत यांनी
दूरदृष्टीतून निर्णय घेतलेला दिसतो. वास्तविक पाहता, शैक्षणिक अभ्यासात, शैक्षणिक धोरणात सामाजिक अडसरांचे निर्मूलन, हा गाभा घटक समाविष्ट आहे. त्या संदर्भाने, गुरूजी [ शिक्षक ] वर्गात शिकवत असतात. जात हा सामाजिक अडसर आहे. किती ही झाकला तरी, पांढर्या डागा सारखा उठून दिसतो. त्यामुळे, शिक्षणाच्या पंढरीत जात आडवी येणार नाही. म्हणून, गुरूजींनी सातत्याने प्रयत्न केलेले आढळून येतात.
ज्येष्ठ लेखक बागुल यांच्या अनुभवातून जाता जात नाही ती “जात” आहे. ते म्हणाले, जेव्हा मी जात चोरली होती. जातीची जळमटं उराशी बाळगून जगणाऱ्यांचा ही सुळसुळाट आहेच. किमान सार्वजनिक ठिकाणी, विशेषत:सरकारी, निम सरकारी जागेवर कर्तव्य बजावताना, जात मनाला स्पर्शून जाऊ नये. अशी, माफक अपेक्षा असते. वास्तविक पाहता, आडनाव विचारून जातीचा शोध घ्यायचा आणि संदर्भ लावायचा उद्योग काहीजण करतात. हे वास्तव ही दुर्लक्षित करता येत नाही. जाती-धर्माची उतरंड एवढी घट्ट आहे की, आडनाव सोडा. केवळ नावावरून सुद्धा जातीचा शोध घेणारे काही महाभाग समाजात वावरताना दिसतात. कोरड्या बुद्धीच्या माणसात “जाती” च्या आधाराने काम करण्याची वृत्ती अधःपतनाला कारणीभूत ठरते. इतिहासात डोकवले म्हणजे,
नावापुढे आडनाव लावण्याची पद्धत ब्रिटिशांनी रुजवल्याने , बऱ्यापैकी गुंता झाला. जुने दस्तावेज तपासले असता, नावा पुढे जात लिहिल्याचा संदर्भ सापडतो. आडनावांमुळे अंदाजाने का होईना ; जात ओळखता येते. आडनाव समजल्याशिवाय व्यक्तीचे स्थान पक्के होत नाही, हा अलिखित खुळचट समज दृढ होत गेला. आडनाव माहिती नसेल, तेव्हा एकमेकांशी कसे वागायचे, या विषयी संभ्रम निर्माण होतो. दुर्दैवाने, जात नावाच्या अनावश्यक गोष्टींकडे आपला ओढा असतो. जात जाणून घेता येत नसेल, तर माणसे अस्वस्थ होतात. त्यांना चैन पडत नाही.
आपल्यालाच माणसाशी माणूस म्हणून वागता येत नाही. हे साधे भावतत्व न बाळगता, जात शोधण्याचा वेडेपणा का करावा, कळत नाही ? पत्रकार, हिच एक जात आहे. लोक जागृतीचा “धर्म” त्यांनी “जात” आडवी येऊ न देता सांभाळावा, अशी लोक धारणा असते. डॉक्टरांच्या बातमीत ही तेच सांगता येईल. अलीकडच्या काळात “जातीने” कट्टरता धारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. किमान, जात सांभाळून, बहुजना हिताय, बहुजन सुखाय, हा मंत्र आळवला तर, काहीच बिघडत नाही. माणुसकी धर्माला जागून, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. ते गुन्हेगारांना थारा देत नाहीत. आशाळभूत नजरेने पाहणार्या शेवटच्या माणसाला या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. त्याची सुरुवात झाली आहे. याचे सगळे श्रेय नवनिर्वाचित एसपी साहेबांचे आहे.
माणुस अमराठी, तरीही आपला वाटतो. यातच त्यांचा मोठेपणा आहे. पोलीस, हे लोक संपर्कातले व्यासपीठ आहे. अशा स्थितीत, सर्व तत्सम व्यासपीठावर “जात” न पाहता कर्तव्याला प्राधान्य देऊन, आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी. या चांगल्या हेतूने बीडचे पोलीस अधीक्षक कांवत यांनी घेतलेल्या निर्णयाने , वर्दीवर केवळ “नाव” दिसणार आहे. खाकी “धर्माशी” इमान राखून काम करा, कामात राम राहुद्या, या अपेक्षेवर पोलीसांनी काम करावे. अशी धारणा बाळगणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांना आपले ही पाठबळ आवश्यक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, अधिकार पदावर कार्यरत असलेला प्रत्येक अधिकारी, कर्मचारी माणुस जनतेचा “चाकर” म्हणून कर्तव्य पार पाडीन. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना ही तेच अपेक्षित असावे. खरय की नाही.
सुभाष सुतार , पत्रकार
गेवराई-बीड






